सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

IPL संघाचे मालक पैसे कसे कमवतात

ipl franchise income sources

पाहिलंच वर्ष होतं आयपीएल सुरु झालेलं. सगळ्यांनी आपापली टीम फिक्स केली होती. प्रीती झिंटा लय आवडायची म्हणून पंजाबच्या बाजूने आम्ही होतो. उरलेले मुंबईला सपोर्ट करत होते. पाहिलंच वर्ष होतं त्यामुळे चर्चा लय होती पण ज्याची चर्चा जास्त झाली ते एकदम बाद निघाले. आमच्या प्रीती झिंटाचा संघ काही केल्या जिंकतंच नव्हता. एका मॅच मध्ये शेवटी थोडक्यात मुंबईकडून पंजाब हरला. प्रेमभंग झाल्यासारखं झालं. पंजाब हरला म्हणून एकजण लय उड्या मारायला लागला. रागात त्याला मी संडासात कोंडूनच ठेवलं. प्रीती झिंटा जिंदाबाद केल्याशिवाय बाहेरचं येऊ दिलं नाही. बाहेर आल्यांनतर त्या मित्राचा चेहरा बघून कळलं असतं कि माझा खून होतोय आता. एकदम चिडून म्हणाला, ‘तू त्या लोकांसाठी मला कोंडून ठेवलं. मुंबई जिंकली तर मला काय भेटलं आणि हारली तर तुला काय भेटणार हे. ते तिकडे कमवतेत आपण इकडे भांडतोय थोडं तरी डोकं वापर. असं बोलून तो निघून गेला. पण ते काय कमावतेत हे डोक्यात गेलं. नंतर क्रिकेट बघणं थोडं कमी होत गेलं. पण आयपीएलच्या बाजारात किती उलाढाल होत असेल हा सारखं विचार डोक्यात यायचा. म्हणलं हाच विषय घेऊन आयपीएलचे संघ मालक पैसे कसे कमवतात यावर एक डीप विषय होऊन जाऊ दे !

संघ विकत घेण्याची प्रक्रिया काय आहे

आयपीएल ही बीसीसीआयची मक्तेदारी आहे. त्यामुळे बीसीसीआय तुम्ही संघ विकत घेण्यासाठी काय पात्रता आहे यासाठी नियमावली जारी करते. दोन पद्धतीने तुम्ही संघाची मालकी घेऊ शकता. एकतर आहे त्या संघाचे काही समभाग विकत घेऊ शकता. नुकतंच LIC ने चेन्नई संघाचे ६ टक्के समभाग विकत घेतले आहेत हे खूप लोकांनी ऐकलं असेलच. यानंतर दुसरा मार्ग म्हणजे नवीन संघाचा मालक व्हायचं असेल तर बीसीसीआय त्यासंबंधी सूचना जाहीर करते. बीसीसीआय नवीन संघ जाहीर केल्यानंतर त्यासाठी इच्छुकांना आमंत्रित करते. नियमात बसलात तर ही प्रक्रिया सगळ्यासाठी खुली असते. बीसीसीआय गुंतवकदारांना आमंत्रित करण्यासाठी एक नोटीस जारी करते ज्याला ITT (Invitation to tender ) म्हणतात. ITT भरण्यासाठी दहा लाख रुपये भरावे लागतात. हे पैसे पुन्हा मिळत नाहीत. दहा लाख भरून प्रवेश घेणाऱ्या व्यक्ती किंवा कंपनीची किमान तीन हजार कोटी इतकी किंमत असली पाहिजे. दहा लाख आणि इतर अटी पूर्ण झाल्यांनंर अर्जदारांना शॉर्टलिस्ट करून बोली लावायला बोलावलं जातं. प्रत्येक संघाची किमान किंमत १७०० ते १९०० कोटी पेक्षा कमी नसते. जास्त बोली लावणाऱ्यांना पाहिजेल तो संघ मिळतो. तीन हजार कोटीची तयारी असेल तर बिनधास्त पुढे व्हा लय पैसे आहेत. कसं आहे ते पुढे सांगतो.

संघ ठरल्यानांतर खेळाडू पण त्यांची नोंदणी करतात. यात मुख्यतः तीन प्रकार असतात. भारतीय क्रिकेट संघाकडून किमान एक आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले खेळाडू. त्यानंतर येतात विदेशी खेळाडू आणि शेवटी राज्यातील क्रिकेट संघांकडून पाठवलेले खेळाडू असे तीन प्रकार केले जातात. हार्दिक पंड्या हा राज्य क्रिकेट संघाकडून आयपीएल मध्ये आला होता. प्रत्येक खेळाडू त्याची २० लाख ते २ कोटी एवढी बेस किंमत ठरवतो. पुढे मग खेळाडूंवर बोली कशी लावली जाते हे तुम्हाला माहित आहेच .

संघ मालकांची कमाई

आयपीएलचा मुख्य आर्थिक श्रोत कोणता असेल तर तो आहे ब्रॉडकास्टींग राईट्स. २००८ ते २०१७ हे दहा वर्ष तुम्ही सोनी टीव्हीवर आयपीएल बघितलं असेल. या दहा वर्षासाठी सोनी टीव्हीने आठ हजार कोटी बीसीसीआयला दिले आहेत. आठ हजार कोटी देऊन सोनी टीव्हीने ब्रॉडकास्टींग राईट्स विकत घेतले आहेत यावरून कमाईचा फक्त अंदाज घ्या. २०१८ ते २०२२ साठी हेच अधिकार स्टार इंडियाने १६३४७ कोटीला विकत घेतले. ५० टक्के हा पैसा बीसीसीआय घेते तर ५० टक्के आयपीएलचे संघ यांच्यात वाटला जातो. सुरुवातीला बीसीसीआय फक्त २० टक्के वाटा घायची हळूहळू वाढवून आता ५० टक्के रक्कम बीसीसीआयकडे जाते. ब्रॉडकास्टींग राईटस जेवढे महाग विकले जातात तेवढा प्रत्येकाचा फायदा होतो. सुरुवातीला हे ब्रॉडकास्टींग राईटस कमी किंमतीत विकले गेल्याने अनेक संघाना तोटा सहन करावा लागला. काही तर संघ तर कायमचे बंद झाले. स्टार इंडियाने एवढे पैसे देऊन राईटस विकत घेतले खरं पण परवडत असेल का, असं वाटलं असेल. आयपीएलच्या सामन्यात दहा सेकंदाच्या जाहिरातीचा दर दहा ते बारा लाख रुपये असतो. त्यातही शेवटचे काही षटकार शिल्लक असताना हा दर अजून वाढतो. जमलं तर एखाद्या सामन्यात किती जाहिराती येतात मोजून बघा आकडे मोजायला कॅल्क्युलेटर कमी पडेल.

टाटाने वर्षाला ३०० कोटी देऊन टायटल स्पॉन्सरशिप घेतली

Vivo IPL जाऊन Tata IPL झालं. पण टाटा नाव लावायला वर्षाला ३०० कोटी रुपये देतंय. आयपीएल सुरु झाल्यापासून एक नजर टाका. २००८ ते २०१२ DLF IPL साठी DLF ने २०० कोटी दिलेत तर
Pepsi IPL तीन वर्षासाठी पेप्सीने ३९६ कोटी रुपये दिलेत. २०१८ ते २०२२ Vivo IPL साठी विवोने २१९९ कोटी दिले होते. भारत चीन वादात हे टायटल स्पॉन्सरशिप टाटा कडे गेलं. कंपनी बदलली तरी नफ्यात काय एवढा फरक पडत नाही. यातून आलेल्या पैशातून ६० टक्के बीसीसीआय स्वतःकडे ठेवते तर उरलेले ४० टक्के आयपीएल संघांमध्ये वाटले जातात.

अजून एक महत्वाची कमाई म्हणजे तिकीट विक्री. कोणताही सामना असला तर प्रत्येक संघाचे चाहते मैदानावर जाऊन सामना बघायला उत्सुक असतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन असा नियम करण्यात आला आहे कि ज्या संघाचा सामना असेल तो संघ तिकिटाचे दर ठरवू शकतो. एका सामन्यात कमीत कमी पाच कोटीची तिकीट विक्री होते. यातील जवळपास २० टक्के रक्कम संघ मालकांना मिळते.

कमाईची साधने एवढ्यावर थांबत नाहीत. आयपीएल संघ ज्याच्या मालकीचा आहे त्यांना आयपीएल भरपूर अधिकार देतो. एकप्रकारे सर्व खेळाडू आणि त्याच्यासंबंधित सर्व गोष्टींवर त्या संघाचा अधिकार असतो. मैदानात खेळाडू उतरल्यानंतर टोपी पासून सगळ्या कपड्यांवर एक जागा मोकळी नसते जिथं जाहिरात नाही. मग हे सगळं फुकट तर होत नाही यासाठी भरपूर पैसे आकारले जातात. त्यात पण कोणत्या ब्रँडची जाहिरात कुठे लागणार यावरून दर ठरलेला असतो. शिवाय बाजारात त्या संघाचे टी शर्ट, टोपी आणि अजून बरंच साहित्य विकलं जातं. ही पण त्यांची मोठी कमाई आहे. खेळाडू संघाचे कपडे घालून एखादी जाहिरात करत असतील तर ती सगळी रक्कम संघाला मिळते. आयपीएलच्या काळात प्रत्येक संघ त्याच्या खेळाडूंकडून अनेक जाहिराती करवून घेतो. खेळाडू यावर आक्षेप घेऊ शकत नाहीत तसे नियम आधीच स्पष्ट केलेले असतात. काही कंपन्या त्यांच्या स्वतःच्या उत्पादनांची जाहिरात करून घेतात. यामुळे कंपनीला चांगला फायदा होतो. आयपीएलच्या खेळात संघ मालक किती कमावतात याचे अधिकृत आकडे सांगणं अवघड आहे. किती कमावले मालक लोक बघतील आपण फक्त सिक्स फोर गेला कि चेकळायचं !

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.