१० मे १९३२ रोजी कोल्हापुरात त्याचा जन्म झाला. अभंगापासून लावणीपर्यंत, प्रेमगीतांपासून बालगीतांपर्यंत आणि शाहिरीपासून लोकगीतांपर्यंत सर्व प्रकार समर्थपणे हाताळणाऱ्या मोजक्याच गीतकारांमधील एक म्हणजे जगदीश खेबूडकर होय. वयाच्या सोळाव्या वर्षी ‘मानवते तू विधवा झालीस…’ ही पहिली कविता त्यांनी केली. येथून त्यांच्या काव्य प्रवासाला प्रारंभ झाला. नका सोडून जाऊ रंगमहाल…अशा ओळी लिहिणाऱ्या खेबूडकरांनी अष्टविनायक दर्शन घडविणारे पाच मिनिटांचे ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’, हे गाणेही लिहिले. भालजींच्या ‘साधी माणसं’ चित्रपटासाठी ‘ऐरणीच्या देवा तुला…हे गीत लिहिणारे जगदीश खेबुडकर दादा कोंडकेंच्या चित्रपटासाठी ‘कुठं कुठं जायाचं हनिमुनला.., असे गीतही लिहून गेले. चित्रपटातील प्रसंग उभा केला की त्यांच्या डोक्यात गाणं आपोआप भिनायचं. एवढा मोठा गीतकार पण साधा माणूस होता चित्रपटश्रुष्टीला या माणसाचं अमाप कौतुक होतं आणि आहे.
पेशाने शिक्षक असलेले आणि पाहताक्षणी किरकोळ वाटणारे खेबुडकर हे तसे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील अशी मराठी साहित्याची सेवा त्यांच्या हातून झाली आहे. ‘माझी गाणी म्हणणारी मराठमोळी माणसं ही माझी संपत्ती’, असे ते पहिल्यापासून म्हणत आले असून त्या अर्थाने कधीही न संपणारी संपत्ती त्यांनी खजिन्यात जमा करून ठेवली आहे. सुधीर फडके, पं. भीमसेनजोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. खेबुडकरांचे गाणे लावल्याशिवाय आजही आकाशवाणीचा दिवस संपत नाही. १९५६ रोजी त्यांचे पहिले गीत आकाशवाणीवर प्रक्षेपित झाले तर १९६० रोजी त्यांचे पहिले चित्रगीत प्रेक्षकांसमोर आले. विशेष म्हणजे ती लावणी होती, ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’! आजही ती रसिकांच्या ओठांवर असते. चित्रपट तपस्वी व्ही. शांताराम, भालजी पेेेंढारकर, अनंत माने, कमलाकर तोरणे आदींबरोबर काम करण्याची संधी खेबुडकरांना मिळाली. भालजींपासून यशवंत भालकरांपर्यंत ३६ दिग्दर्शक आणि वसंत पवारांपासून शशांक पोवारांपर्यंत ४८ संगीतकार आणि सुधीर फडकेंपासून अजित कडकडेंपर्यंत ३६ गायकांसमवेत खेबूडकर यांनी काम केले. या अफाट कामांद्वारे अनेक कलाकृतींवर जगदीश खेबूडकरांचा अस्सल गावरान ठसा उमटला.
१९६० साली वसंत पवारांनी ’रंगल्या रात्री अशा’ ह्या चित्रपटासाठी जगदीश यांच्याकडून तीन लावण्या लिहून घेतल्या आणि मग कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यातली गाजलेली लावणी म्हणजे ‘नाव गांव कशाला पुसता, मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हनत्यात लवंगी मिरची’. ह्या लावणीला १९६० सालचे रसरंग फाळके पारितोषिक मिळाले. तसेच “झुंज” चित्रपटातील “कोण होतीस तू काय झालीस तू” हे तरुणाईला वेड लावणारे गाणे लिहिणारे गीतकार म्हणजे खेबुडकरच.
१९६३ साली भालजी पेंढारकर निर्मित ’साधी माणसं’ ह्या सिनेमात खेबूडकरांना एक गाणं लिहायची संधी मिळाली. भालजी म्हणाले, ”लोहारकाम करणाऱ्या एका जोडप्यावर आधारलेली ही कथा आहे. हे लोहार जमातीचं जोडपं कसं राहतं, काय खातं, काय पितं, नवऱ्याबद्दल तिला काय वाटतं आणि त्या लोहार जमातीचा देव कोणता आणि त्याला फुलं कोणती वाहतात, आपल्या धंद्याचा त्यांना अभिमान कसा वाटतो, गरिबीतसुद्धा ते आनंदानं कसे राहतात, हे सगळं वर्णन गाण्यात आलं पाहिजे; आणि जगदीश मुद्दाम सांगतोय, लोहार होणार आहे सूर्यकांत. त्याची बायको लोहारीण आहे जयश्री गडकर. नवऱ्याबद्दल तिच्या भावना ती कशा शब्दांत प्रकट करते, हे सगळं या गाण्यात आलं पाहिजे आणि हे “थीम सॉंग’ म्हणून वर्षानुवर्षं गाजलं पाहिजे.” भालजीनी सारांश सांगून संपवला. यावर खेबुडकर म्हणाले,” बाबा, तुम्ही सांगत असतानाच डोक्यात ओळी तयार झालेल्या आहेत. मी मोकळाच आलोय. मला एक कागद आणि पेन द्या.” त्यांनी नोकराला कागद आणि पेन द्यायला सांगितले. ते गाणे होते, ‘ऐरणिच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुजी आम्हांवरी राहु दे’ हे गाणेही तुफान गाजले आणि चित्रपट गीतलेखनात प्रस्थापित अशा ग. दि.माडगूळकर, पी. सावळाराम आणि शांता शेळके ह्यांच्या पंक्तीत जगदीश खेबूडकर जाऊन बसले. ’आम्ही जातो आमुच्या गावा’ ह्या चित्रपटासाठी लिहिलेली त्यांची सगळीच गाणी गाजली; पण ’देहाची तिजोरी’ ने ते थेट प्रत्येकाच्या देवघरात पोचले.
खेबूडकरंच्या अजरामर कलाकृतींपैकी एक म्हणजे “पिंजरा” चित्रपटातील गाणी. व्ही. शांताराम ह्यांच्या ’पिंजरा’ चित्रपटासाठी खेबूडकरांनी तब्बल ११० गाणी लिहिली. त्यातली ११ गाणी निवडण्यात आली. ह्याच चित्रपटातील ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल’ या लावणी विषयी सांगताना खेबूडकर म्हणतात “त्या प्रसंगासाठी शांताराम बापूंनी माझ्याकडून ४९ लावण्या लिहून घेतल्या. त्यातील एकही न आवडल्याने मी निराश होऊन घरी परतलो. झोप पार उडाली होती. डोक्यात लावणीचेच विचार घोळत होते आणि रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लावणी सुचली, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’. लगेच फोन करून मी ती बापूंना ऐकवली. ‘व्वा! झक्कास, खेबुडकरजी, गाणं खास जमलं बरं का’ अशा शब्दात बापूंनी मला शाबासकी दिली. अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.” अकरा लोकप्रिय गीते असलेला पिंजरा त्यांचा शंभरावा चित्रपट. येथून पुढेही त्यांच्या चित्रपटाचा ओघ चालूच राहिला. माहेरची साडी चित्रपटाने यशाचे शिखर गाठले. त्यातील सर्वच गाणी गाजली. विशेषत: ‘सासरला ही बहीण निघाली’ या गाण्याने तर रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला.
वयाच्या 73व्या वर्षी साडेतीन हजार कविता, अडीच हजार चित्रगीते, २५ पटकथा आणि संवाद, ५० लघुकथा, ५ नाटके, ४ दूरदर्शन मालिका, ४ टेलिफिल्म, ५ मालिकागीते त्यांच्या नावावर जमा आहेत. अलीकडे त्यांनी रचलेल्या अजय-अतुलनं संगीतबद्ध केलेलं ‘मोरया, मोरया’ या गणेशस्तुतीने तमाम आबालवृद्धांना वेडे केले. त्यांना सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हते; मात्र त्यांनी पान व विडा यांच्याशी संबंधित दोनशेहून अधिक गाणी लिहिली. तसेच अष्टविनायकाची एकदाही वारी न करता ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे खास गणेशभक्तांसाठी दिलेले अप्रतिम गाणे म्हणजे खेबूडकरांचा अजब महिमाच होय.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?