इंदिरा गांधींना हरवून सत्तेत आलेल्या जनता दलाने, १२ सप्टेंबर १९७७ ला दिल्लीच्या संविधान क्लब मध्ये जातीचा भेदभाव संपवण्यासाठी संमेलन बोलावले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते त्यावेळचे जायन्ट किलर ‘राज नारायण’. राज नारायण ते नेते होते ज्यांनी देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा रायबरेली मतदार संघात पराभव केला होता. मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळामध्ये आरोग्य मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली होती.
क्लब मध्ये ठरलेला कार्यक्रम होता तसाच झाला. सगळ्या वक्त्यांनी आपली आपली भाषणे दिली. प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या राज नारायण यांनी देखील त्यांचे भाषण दिले पण राज नारायण त्यांच्या भाषणात दलितांचा सतत हरिजन, हरिजन असाच उल्लेख करता होते. बसलेल्या श्रोत्यांमध्ये अनेक दलित पुढारी होते पण कोणीही राज नारायण यांच्या हरिजन शब्दावर आक्षेप घेतला नाही.
राज नारायण यांचे भाषण संपल्यावर उत्तर प्रदेशातून आलेली एक पोरगी मंचावर आली. राज नारायण यांनी केलेल्या भाषणावर तिने आक्षेप नोंदवला. आक्रमकपणे ती बाजू मांडत होती, “जनता दल आणि राज नारायण जाती भेदभाव संपवण्याच्या मंचावरुन भाषण करताना दलितांचा हरिजन असा उल्लेख करत आहेत, त्यांना माहिती असायला हवे आमचे दैवत डॉक्टर बाबासाहेबानी कधीही हरिजन शब्दाचा स्वीकार केला नाही मग ह्या राज नारायण यांची हिम्मत कशी होते आम्हाला हरिजन उल्लेखण्याची.” त्या पोरीचं नाव होत ‘मायावती’. मायावतींनी हरिजन शब्दावरून गोंधळ घातल्यावर दुसरे पण दलित नेते राज नारायण यांचा निषेध करू लागले आणि ज्या जनता दलाने जाती निर्मूलनासाठी संमेलन भरवले होते, त्यांच्याच विरोधात संमेलनांमध्ये घोषणा दिल्या गेल्या. मायावती त्या सगळया घटनाक्रमाच्या हिरो होत्या.
दिल्लीच्या संविधान क्लब मध्ये झालेल्या गोंधळामुळे मायावती प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांच्याबद्दल बातम्या येत होत्या. दलित नेते आणि बामसेफचे संस्थापक कांशीराम यांच्या वाचनात मायावती आल्या. मायावती निडर आणि हुशार आहेत. दलित चळवळीसाठी लागणारे सगळे गुण त्यांच्यात असल्याचे कांशीराम यांच्या लक्षात आले. कांशीरामजीनी मायावतींना भेटायचं ठरवले.
डिसेंबर १९७७ ला शेवटी तो दिवस आला. संध्याकाळची वेळ होती पोस्टात काम करणाऱ्या प्रभुदासच्या घरी सगळं काही रोजचंच चालू होत. मोठी मुलगी मायावती तिचा अभ्यास करतं होती. बाकीचे सदस्य झोपायची तयारी करतं होते. अचानक दाराची कडी वाजली. संध्याकाळी कोण आलं म्हणून प्रभुदासजीने दार उघडले तर समोर होते बामसेफचे अध्यक्ष कांशीरामजी ! प्रभुदासजींना विश्वासच बसेना पण मायावतींनी लगेच ओळखले. कांशीरामजी आपल्या घरी आले आहेत, कदाचित ते आपल्याला भेटायला आले असावेत. मायावतींचा अंदाज खरा होता. थोडा वेळ विचारपूस झाल्यावर कांशीराम त्यांच्या मूळ मुद्द्यावर आले त्यांनी मायावतींना विचारले ,”आम्ही ऐकलं आहे तू अभ्यास करत आहेस, कशाचा अभ्यास चालू आहे.” मायावतींनी उत्तर दिल,” मी UPSC चा अभ्यास करत आहे ,कलेक्टर होऊन समाजाचं भलं करायचं आहे.”. काशीराम मायावतींचे उत्तर ऐकून म्हणाले, “चूक करते आहेस आपल्या देशात किती तरी कलेक्टर झाले समाज सुधारला का ? माझ्या सोबत राजकारणात चल १००-१५० कलेक्टर तुझ्या मागे पुढे फिरतील.”
कांशीरामजी गेल्यावर मायावतींनी काही दिवस त्याच्या बोलण्याबद्दल विचार केला आणि कांशीरामजींच्या सोबत जाण्याचा निर्णय केला. कांशीरामजींच्या बहुजन समाज पक्षाच्या मायावती नेत्या झाल्या. कांशीरामजींनी जी ऑफर दिली होती ती खरी ठरली. मायावती चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?