लंडनच्या सार्वजनिक बसेसवर कपिल शर्माचे फोटो लागले होते. कपिल शर्मा हा कदाचित पहिलाच भारतीय होता ज्याचे फोटो लंडन मध्ये लागले होते. दिग्दर्शक साजिद खान याने त्याचा लंडनचा अनुभव सांगताना कपिल शर्माच्या प्रसिद्धीबद्दल ही माहिती दिली. कॉमेडी करणारा कपिल शर्मा ही त्याची ओळख आता लय मोठी झाली आहे. कपिल शर्माने गेल्या काही वर्षात कॉमेडी करता करता स्वतःला प्रसिद्धीच्या एका उंच टोकावर घेऊन गेला आहे. २०१२ च्या फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटींच्या यादीत कपिल ६९ व्या स्थानावर होता. २०१६ मध्ये तो टॉप १०० सेलिब्रिटीच्या यादीत ११ व्या क्रमांकावर होता. इकॉनॉमिक टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक प्रशंसनीय भारतीय व्यक्तिमत्त्वाच्या यादीतही त्याने तिसरे स्थान मिळविले होते. सप्टेंबर २०१५ मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात स्वच्छ भारत अभियानातील योगदानाबद्दल कपिलचा गौरव केला होता. कपिलसाठी हे पुरस्कार शेवटचे नाहीत. आजही कोणत्या ना कोणत्या पुरस्कारावर कपिल मोहोर लावतोच. शिखरावर पोहचलेला कपिल सगळ्यांना दिसतोय पण शिखरे सर करताना हजारो वेळा घायाळ झालेला कपिल कोणाच्या नजरेसमोर येत नाही. कपिल शर्माच्या हसऱ्या चेहऱ्या पाठीमागची कहाणी एकदा वाचा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
२ ऑक्टोबर १९८१ ला अमृतसर इथे कपिलचा जन्म झाला. वडील जितेंद्र कुमार पुंज पोलीस कॉन्स्टेबल तर आई गृहिणी. सर्व साधारण मध्यम वर्गीय कुटुंब. कपिलने त्याचे शालेय शिक्षण श्रीराम आश्रम सीनिअर सेकंडरी स्कूलमधून पूर्ण केले होते. त्यानंतर त्याने हिंदू कॉलेज अमृतसर येथून त्याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते. अभिनय, नाटक, गायन याची आवड त्याला शालेय जीवनापासूनच होती. कॉलेजला असताना कपिल अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभाही व्हायचा. कॉलेज जीवनात कपिल अनेक पुरस्कार सहज मिळवायचा. कपिल आहे म्हणजे बक्षीस येणारच त्यामुळे कॉलेजवाले कपिलला आर्थिक मदत करायचे. सगळं त्यामानाने बरं होतंच पण अचानक वाईट बातमी आली. कपिलच्या वडिलांना कॅन्सर झाला होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबाकडे असणारी संपत्ती त्यांनी खर्चिली. स्वतः कपिल वडिलांना मुंबईत घेऊन आला. मुंबईच्या AIIMS हॉस्पिटल मध्ये वडिलांवर उपचार केले. पण दुर्दैवाने कपिलचे वडील वाचले नाहीत. वडिलांचं छत्र हरवल्यावर काय दुःख असतं जास्त सांगायला नको. कुटुंबाची आर्थिक चणचण निर्माण झाली. आईचं म्हणणं होतं कि कपिलने एखादी नोकरी करावी पण कपिलला नोकरी करायची नव्हती. अभिनय, गायन या क्षेत्रात त्याला काही तरी करून दाखवायचं होतं. कौटुंबिक जबाबदारी मोठी होती अशा परिस्थितीत कपिल मुंबईला आला. काही कार्यक्रमात छोटं मोठं काम करून उदरनिर्वाह चालू होता. तेवढ्यात एक संकट दत्त म्हणून उभं राहिलं.
कपिलच्या बहिणीचं लग्न ठरलं होतं. तिच्या होणाऱ्या सासूची इच्छा होती कि साखर पुडा कपिलच्या घरच्यांनी करावा. साखर पुडयासाठी सोन्याची अंगठी आणि इतर खर्च करायचा म्हणजे कपिलसाठी खूप अवघड होतं. वडील असताना सहा लाख रुपये कपिलच्या कुटुंबाकडे शिल्लक होते. वडिलांच्या आजारात त्यातील साडे तीन लाख रुपये खर्च झाले. उरलेल्या अडीच लाखात सगळा खर्च उरकणे शक्य नव्हतं. सगळं झाल्यानंतर मुख्य अंगठी घ्यायलाच पैसे नव्हते. कपिलसाठी हा दिवस खूप वाईट होता. संख्या बहिणीसाठी आपण अंगठी विकत घेऊ शकत नाही, ही भावना त्रासदायक होती. कपिल लहान सहान कार्यक्रम करून पैसे कमावत होता ती रक्कम तुटपुंजी होती. प्रत्येक वाईट परिस्थितीत संधी शोधणारी माणसं पुढेच जातात कपिलसाठी ही संधी साधून आली.
‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमात कपिलने धमाकेदार अभिनय करून प्रेक्षकांना आणि परीक्षकांना खळखळून हसवलं. कर्तृत्व असेल तर यश नाकारत नाही. कपिलने हा शो जिंकला. विजेत्याला दहा लाखाचं बक्षीस होतं. दहा लाखाचा चेक हातात आल्यावर कपिलचे डोळे भरून आले. त्याने पैसे आल्याबरोबर बहिणीच्या हातात चेक ठेवला आणि ‘जा तुझ्यासाठी अंगठी घे’ असं म्हणाला. कपिल आजही हा किस्सा लोकांना हसवून सांगतो पण ते सांगत असताना या घटनेपाठीमागचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतं. दहा लाखाची मोठी रक्कम हातात आल्यांनतर कपिल थांबला नाही. पुढच्या काही दिवसातच त्याने एका कार्यक्रमाचे तीस लाख रुपये घेतले.
कपिलचा कॉमेडीचा प्रवास असा सुरु झाला
कपिल शर्माने मनोरंजन क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात MH1 च्या कॉमेडी शो ‘हसी रहो हंसाते रहो’ द्वारे केली. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ च्या रूपाने पहिला मोठा ब्रेक मिळाला होता ज्यामुळे त्याचं आयुष्य बदललं. हा त्याचा नववा रिअलिटी टेलिव्हिजन शो होता जो त्याने जिंकला. या शोच्या तिसऱ्या सीझन साठी पहिली ऑडिशन त्याने अमृतसरमध्ये दिली होती. पहिल्या ऑडिशन मध्ये त्याला नाकारलं गेलं होतं. पुन्हा ऑडिशन देण्यासाठी तो दिल्लीला गेला जेथे त्याची निवड झाली आणि २००७ मध्ये तो जिंकला आणि १० लाखांचे बक्षीस मिळवले. कॉमेडीच्या प्रवासाबद्दल बोलताना कपिल सांगतो की, तो खरं तर गायक बनण्यासाठी मुंबईत आला होता. मात्र नंतर त्याचा प्रवास कॉमेडीच्या क्षेत्रात सुरू झाला. नंतर कपिलने सोनी हिंदी वाहिनीवरील कॉमेडी सर्कस या शोमध्ये सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या शोचे सलग सहा सिझन कपिल जिंकला होता. २००८ मध्ये कपिलने ‘उस्तादों का उस्ताद’ मध्ये भाग घेतला होता. ‘झलक दिखला जा’ चा सहावा सीझन आणि ‘छोटे मियाँ’ हा कॉमेडी शोही त्याने होस्ट केला आहे.
२०१५ मध्ये हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कपिलने त्याच्या १५ वर्षांच्या संघर्षाबद्दल सांगताना तो म्हणाला, “ यश एका रात्रीत मिळाले नाही. मी माझ्या कौशल्यांचा आदर केला आणि काय काम करावं हे जाणून घेण्यासाठी पुरेसा अनुभव घेतला. माझा शो लोकप्रिय आहे कारण आमच्याकडे कंबरे खालचे विनोद होत नाहीत. वास्तविक तसे विनोद करणे सर्वात सोपी गोष्ट आहे. कौटुंबिक प्रेक्षकांना पेच निर्माण न करता आनंद देतील असा स्वच्छ विनोद आम्ही करू शकतो असा लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. प्रेक्षक आमच्या विनोदांशी स्वतःला संबंधित समजतात. माझी टीम दर आठवड्याला दर्जेदार आशयपूर्ण विनोद वितरीत करण्यासाठी खरोखर कठोर परिश्रम घेतात.”
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?