सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

दोन माणसं जोडली कि दारात BMW असेल..असा एक तरी मित्र भेटलाच असेल

network marketing information in marathi

एस टी स्टॅण्डवर कॉलेज सुटल्यावर सगळे सिनियर जुनिअर एसटीची वाट बघायचे. त्यातला एक जण आमच्या चांगल्या ओळखीचा झाला. दोन तीन वर्षाने मोठा असल्याने भेटलं तेव्हा काही तरी मोटिवेशनल बच्चन देऊन दयायचा. त्या वयात आम्हाला वाटायचं जगात जे काही चालू ते फक्त यालाच कळतंय. एकदा त्याने आम्हाला २७ हजार रुपयाचा चेक दाखवला. वरून म्हणाला, ही फक्त एक आठवड्याची कमाई आहे. चेक बघून सगळ्यांना स्वप्न पडायला लागलं. मग त्याने पुढचा डाव टाकला. एकदा तुम्ही आमच्या सेमिनारला या मग तुम्हाला सगळं समजणं. नाय काय तर तुमची पर्सनालिटी डेवलप होईल असं म्हणाला. काही जणांनी विषय थोडा मागे टाकला पण मी गेलो त्यांच्या सेमिनारला. सेमिनार रात्री होतं. चांगला अंधार पडला होता तरी गेल्या गेल्या मोठं मोठ्याने गुड मॉर्निंग म्हणायला लागले. रात्री ‘गुड मॉर्निग’ हे धोरण काय कळेना. मी आमच्या सिनियरला विचारलं तर म्हणाला आपण सतत जागृत असलं पाहिजे, नेहमी सकाळी उठल्यासारखं तयार पाहिजे म्हणून गुड मॉर्निंग म्हणायचं. नंतर एकेक करून एका वर्षात कमीत कमी आपण २४ लाख कमवू शकतो प्रत्येकजण सांगत होता. सेमिनारलाच वाटलं आता गरिबी संपली. डोळ्यात अशी एक चमक उभी राहिली जणू अंबानी पण मागे पडतोय का काय असं वाटायला लागलं. साडे सात हजार भरले कि करोडपती होण्याचा मार्ग मोकळा !

महिन्याचा एसटीचा पास सोडला तर आमच्या खिशात दहा रुपये पण जास्त नसायचे. पैशाची थप्पी आम्ही फक्त पिक्चरातच बघितलेली. एक दोन सोडले तर सगळेच असे होते. म्हणून कधी कधी वाटायचं अनिल अंबानी सारखं पळून जाऊन श्रीमंत होऊनच परत येऊ. अशा वातावरणात एखादा सिनियर रात्रीत श्रीमंत कसं व्हायचं हे ज्ञान पाजळून गेला तर खरं वाटणारचं. बरं हा सिनियर पण असा होता कि कॉलेज सुटल्या सुटल्या याला दारं धरल्याशिवाय पर्याय नाही. पण आपल्याकडे श्रद्धा आहे वयाने मोठे असणारे सगळेच शहाणे असतात. सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती काही नवीन ऐकून आयुष्य बदलेल या विचाराने काही पण ऐकून घ्यायला तयार असते. अशा परिस्थितीत वर्षाला २४ लाख सहज कमवू असं कोणी म्हणलं तर खोटं कसं वाटणार. हजाराच्या पुढेच ज्यांचा हिशोब कधी गेला नाही तिथं २४ लाख मिळणार म्हणल्यावर तोंडाला पाणी सुटणार. चैन मार्केटिंगच्या नकली दुनियेत फसायला यासारखी दुसरी अनुकूल परिस्थिती काय असणार?

बापाच्या हाता पाया पडून आणि थोड्या उधाऱ्या करून साडे सात हजार भरले. गल्लीतले माझे दोन तीन चांगले मित्र त्यांना पण तयार केलं. एकाने तर आईला दागिने गहाण ठेवायला सांगितले. आम्ही तीन जण ‘क्यू पैसा पैसा करती हे’ गाणं लावून अशा तोऱ्यात चालायला लागलो कि आता गावचं विकत घेतो. दिवस सरकायला लागले आम्ही तिघं सोडून चौथा माणूस आमच्यात आलाच नाही. हळू हळू समजायला लागलं कि आपला कार्यक्रम झालाय. तीन चार महिने झाले तरी एक रुपया रुपया आला नाही मग बाप शिव्या द्यायला लागला. कधी येणार पैसे सारखं विचारायला लागला. चांगले मित्र पण लांब जायला लागले. चैन मार्केटिंग करून दारात BMW उभी राहिल अशी स्वप्न आम्ही बघितली होती तशा बाता पण मारल्या होत्या. आता तोंडावर पडायची वेळ आली होती. BMW सोडा जे होतं ते विकून उधारी कशी द्यायची हा मोठा प्रश्न होता.
ही होती माझी वास्तव कहाणी. या निमित्ताने चैन मार्केटिंग हा फसवा धंदा आहे कि पैसे कमवण्याचा एक चांगला मार्ग आहे यावर थोडी सविस्तर माहिती बघू.

वस्तू विकून नाही माणसं जोडून पैसे कमवा म्हणतात

२००८-०९ ला Ebiz आणि DewSoft या दोन कंपन्या कॉम्पुटर कोर्सेस विकतात असं सांगून चर्चेत होत्या. यातल्या Ebiz मध्ये मी स्वतः पैसे गुंतवले आहेत. थोडाफार फरक सोडला तर दोघांमध्ये विशेष फरक नाही. कॉम्पुटर कोर्सेसच्या माध्यमातून शिकता शिकता माणसे जोडा आणि पार्ट टाइम मध्ये पैसे कमवा ही यांची संकल्पना. या दोन्ही कंपनीमध्ये कॉम्पुटर कोर्सेस शिकून आजवर एकही माणूस असा भेटला नाही कि ज्याने काही तरी कामधंदा मिळवला. थोडक्यात काय तर पैसे भरून कॉम्पुटर कोर्सेस शिकायला मिळतील हे हळू आवाजात सांगितलं जातं तर तुमच्या नंतर दोन माणसे जोडली तर तुम्हाला मस्त कमिशन मिळेल हे मोठ्या आवाजात आणि सतत सांगितलं जातं. यावरून एक गंभीर गोष्ट लक्षात घ्या मुळात या कंपन्यांकडून विकत घेण्यासारखी कोणती गोष्टच नाही. माणसे जोडून पैसे मिळवणे यातच मुलांना जास्त गुरफटवलं जातं. एवढंच नाही तर त्यांना अशी स्वप्न दाखवली जातात जे वास्तवापासून खूप दूर आहेत. जाणूनबुजून अशाच मुलांना टार्गेट केलं जातं ज्यांचं वय १६ ते २० आहे. या मुलांना काही तरी करायचं असतं, लवकर पैसे कमवायचे असतेत. गरीब मुलं मोठ्या कष्टाने पैसे गोळा करून यात पैसे गुंतवतेत पण मिळतं काय तर शून्य. यात कमावणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असेल पण गमवणाऱ्यांची संख्या मोजता येणार नाही. तरी सुद्धा फसलेली मुलं पुढे येऊन ‘आम्ही फसलो आहोत’ हे स्पष्ट सांगत नाही. कारण तसं बोलले तर तोंडावर पडतील किंवा इज्जत जाईन या गोष्टीची त्यांना भीती असते.

चैन मार्केटिंग म्हणजे फसवा धंदा ?

चैन मार्केटिंगची पहिल्यांदा सुरुवात कशी किंवा कोणी केली हे अजून समजलेलं नाही. अमेरिकेत नेटवर्क मार्केटिंगची सुरुवात झाली असावी असा काही लोकांचा अंदाज आहे. चैन मार्केटिंग न म्हणता काही जण याला थेट विक्री म्हणतात. अमेरिकेत आजही मोठी लोकसंख्या नेटवर्क मार्केटिंगशी संबंधित आहे. जगात सगळीकडे अशा मार्केटिंगबद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत. यामुळेच खूप देशात याबद्दल नकारात्मक वातावरण तयार झालं आहे. चीनने त्यामुळेच थेट विक्रीवर बंदी घातली आहे. थेट विक्रीचा पारंपरिक अर्थ घेऊ नका. भारतात आयुर्वेदिक वस्तू, सौंदर्यप्रसाधने, वजन कमी करणे ते कॉम्पुटर कोर्सेस विकणे अशा जवळपास सगळ्याच क्षेत्रात नेटवर्क मार्केटिंग करून कंपन्या व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. नेटवर्क मार्केटिंग करणे गैर नाही हे अगोदर समजून घ्या. मार्केटिंगचा खर्च वाचवून ग्राहकांनाच विकायला लावणे किंवा त्यांना वितरक बनवणे अशी ही कल्पना आहे. यामुळे कंपनीला इतर खर्च होत नाही शिवाय कामाला माणसं फुकटची मिळतात म्हणजे त्यांना ठराविक पगार देण्याऐवजी काम करेल तेवढे पैसे दिले जातात. वरून हीच माणसं दिवसभर तुमची प्रचारक म्हणून काम करतात. शहरात रस्त्यावर एक पोस्टरला हजारो रुपये खर्च होतात तिथं ही माणसं दिवसभर तुमच्या कंपनीची जाहिरात करत बसतात. नेटवर्क मार्केटिंग मध्ये वस्तूचे वितरण थेट होते मध्यस्थी वितरकाची गरज भासत नाही. शिवाय वस्तू विकल्यानंतर एजन्टला मिळणारे कमिशन जास्त असते त्यामुळे कंपनीचा एजन्ट खरेदीदाराला जीव तोडून पटवून सांगतो. हे इथपर्यंत ठीक आहे पण मुख्य अडचण अशी आहे कि एजन्ट वस्तू विकण्याऐवजी माणसं जोडण्यावर जास्त भर देतो. खालचा माणूस जेवढे काम करेल तेवढी त्याची जास्त कमाई होईल. ‘खाली दोन माणसं जोडली तर आयुष्यभर बसून खा’ हे त्यांचं आवडतं वाक्य आपला घात करतं.

सगळेच नालायक आहेत असं नाही पण बऱ्यापैकी अविश्वासू आहेत. Amway सारख्या काही मोजक्या कंपन्यांना चांगल्या उत्पादनांच्या जोरावर नेटवर्क मार्केटिंग करून यश मिळालं आहे. Amway ला जमलं कारण फक्त माणसं जोडत राहा ही एक गोष्ट त्यांनी केली नाही तर उत्पादनांच्या दर्जावर अधिक लक्ष दिलं. वस्तूचा दर्जा ठरवून विकत घेणारा ग्राहक माणसं जोडून पैसे कमवण्याच्या फंद्यात पडत नाही. त्यामुळे ज्या कंपन्या माणसं जोडून पैसे कमव म्हणतात त्याच्या वस्तू वापरून बघा. त्याच्या उत्पादनामध्ये दम असेल तर घाबरायचं काही कारण नाही. यात पण एक काळजी घ्या एकदम दहा वीस हजार किंवा लाखभर रुपयांच्या वस्तू घेऊ नका. अनेक कंपन्या त्यांच्या एजन्टलाच दोन लाखाचा माल घ्यायला लावतात आणि नवीन येणाऱ्यांना सांगतात बघा याने दोन लाखाची विक्री केली. रिक्षावाला, होमगार्ड, वॉचमन यांच्या यशोगाथा ठरवून मोठ्या दाखवल्या जातात. वजन वाढवण्याच्या एक सेमिनार मध्ये गेलो तर अख्या सेमिनार मध्ये वजन कमी करण्यावर कोणी बोललंच नाही. सगळे हेच सांगत होते कि कोणी किती पैसा कमावला. ज्या कंपनीचा दावा आहे कि ते वजन कमी करतात तर त्यावर बोलणं त्यांना महत्वाचं वाटतं नाही, ही साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. मंतरलेल्या वातावरणात हे लोक नकली नोटांचा पाऊस दाखवतात ज्यामुळे डोक्यात बाकीचे प्रश्न पडतच नाही.

झटक्यात श्रीमंती असा कोणता मार्ग नाही एवढं पटलं तर नेटवर्क मार्केटिंग वाले तुम्हाला काय फसवू शकणार नाहीत. थोडा तर्क लावला तर लक्षात येईल कि माणसं जोडून एकदम कोणी टाटा किंवा अंबानी झाला नाही. नेटवर्क मार्केटिंग मध्ये एक प्रक्रिया असते त्याचे काही नियम असतात, या नियमांना डावलून काही काळ तुम्ही लोकांना वेड्यात काढू शकता पण याचा दीर्घकालीन परिणाम होतो. आज अशी वेळ आहे कि लोक चैन मार्केटिंगवाल्या मित्राला बोलायला तयार नाहीत. ‘स्कीम आली आहे’ असं चार चौघात बोलून बघा लोक बोलणं मधेच थांबून पळ काढतात. ज्यांना नेटवर्क मार्केटिंग करून पैसे कमवायचे आहेत त्यांना विरोध नाही पण लवकर पैसे कमवायचे म्हणून स्वतः फसू नका आणि फसले आहेत म्हणून इतरांना गंडवू नका.

हे पण वाचा

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.