सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

मुलीला थंडी वाजली म्हणून २० लाख डॉलर पाब्लो एस्कोबारने जाळले होते.

pablo escobar set money on fire

पाब्लो एस्कोबार हा काय साधा सुदा गुन्हेगार नाही. अख्या अमेरिकेला याने नशेला लावलं होतं. एकूण कोकेन उत्पादनाच्या ८० टक्के कोकेन एकटा पाब्लो जगभर आणि विशेषतः अमेरिकेत पाठवायचा. भुरट्या चोरांसारखा हा छाटमुठ धंदे करत नाही. याचा धंदा इतका मोठा होता कि जगातल्या १० श्रीमंत लोकांपैकी हा एक होता. पाब्लोने एवढा पैसे कसा गोळा केला असेल यावरून पाब्लोची ताकत ओळखून घ्या.

डिसेंबर १९४९ चा पाब्लोचा जन्म आहे. लहान असल्यापासून गरिबीचे चटके पाब्लो अनुभवत होता. पाब्लोला काही तरी करून मोठं व्हायचं होतं. कोलंबिया मध्ये त्यावेळेस कोकेनचा व्यापार जोरात होता. कमी वेळात जास्त पैसे देणारा पाब्लोसाठी हा धंदा एक नंबर होता. पाब्लो या धंद्यात छोटी मोठी कामे करू लागला. १९७० च्या दरम्यान आपल्या मित्रासोबत त्याने कोकेनची तस्करी करायला सुरवात केली. बघता बघता पाब्लो या धंद्यात पाय रोवू लागला.

१९७५ हे वर्ष होते जेव्हा पाब्लोने मेडेलिन कार्टेल नावाने मोठ्या प्रमाणात कोकेन ऑपरेशन सुरू केले. त्याच्याकडे दोन डझनहून अधिक विमाने होते, ज्यात एक लिअरजेट आणि सहा हेलिकॉप्टर होते, ज्याचा तो कोलंबिया, पनामा आणि संपूर्ण युनायटेड स्टेट्समधील मार्गांदरम्यान ड्रग्जची तस्करी करण्यासाठी वापरत असे. एस्कोबार पेरूमध्ये कोकेन पेस्ट विकत घेई जे नंतर परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवले जाई आणि नंतर विमानाच्या टायरमध्ये कोकेन भरून तस्करी केली जात असे. कोकेनची तस्करी करण्यासाठी पायलट प्रत्येक फ्लाइटसाठी पाच लाख डॉलर कमवायचा. ऐंशीच्या दशकाच्या मध्यापर्यंत, युनायटेड स्टेट्समध्ये कोकेनची मागणी जास्त होती आणि पाब्लोची एकटी मेडेलिन कार्टेल ८० टक्के अमली पदार्थांची तस्करी करत होते. कार्टेलकडून दररोज 15 टनांहून अधिक कोकेनची तस्करी केली जायची.

एस्कोबारच्या कार्टेलने लुईस कार्लोस गॅलन या उदारमतवादी राजकारणी आणि पत्रकाराची हत्या केली, ज्यांनी दोन वेळा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. सरकारने अखेर एस्कोबारला पकडण्यासाठी गंभीर हालचाली केल्या. सरकारने कठोर शिक्षेच्या बदल्यात सर्व गुन्हेगारी थांबवण्यासाठी आत्मसमर्पण आणि करारावर बोलणी केली. एस्कोबारने १९९१ मध्ये अधिकार्‍यांसमोर शरणागती पत्करली. आतापर्यंत त्याच्या गुन्ह्यांसाठी त्याला अमेरिकेकडे सुपूर्द केले जाण्याची कोणतीही शक्यता नव्हती कारण १९९१ च्या नवीन कोलंबिया राज्यघटनेने त्यास मनाई केली होती. एस्कोबारला त्याच्या स्वतःच्या खाजगी आलिशान “तुरुंगात टाकले” होते. इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे पाब्लोने आत्मसमर्पण केले खरे पण स्वतःच्या अटीवर. त्याला सोयीचे होते अशा ठिकाणी पाब्लोने तुरुंग बांधले. नावाला आत्मसमर्पण झाले. त्याने आतून मेडेलिन कार्टेल चालवणे सुरूच ठेवले. सरकारने त्याला जुलै १९९२ मध्ये पारंपारिक तुरुंगात हलवण्यास प्रवृत्त केले. पण त्या आधीच कोलंबियन ड्रग पोलिस, DAE एजंट या सगळ्यांच्या नजरेपासून पाब्लो त्वरित निसटला.

पाब्लोची कीर्ती कालांतराने त्याच्या मूळ देश कोलंबियासाठी दहशतीच्या राजवटीत बदलली. एस्कोबार १९८२ मध्ये कोलंबियाच्या काँग्रेसमध्ये निवडून आला होता परंतु तो त्याची संपत्ती आणि इतर कारनाम्यांमुळे दोन वर्षांनंतर त्याला राजीनामा द्यावा लागला. पाब्लोची पार्श्वभूमी उघड करणाऱ्या न्यायाधीशाची नंतर हत्या करण्यात आली. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष होण्याचे आपले स्वप्न पूर्ण होणार नाही हे लक्षात येताच पाब्लो एस्कोबारने आपल्या राजकीय शत्रूंवर रोष ओढवून घेतला; कित्येक राजकारणी, पत्रकार, नागरी सेवक आणि अनेक निरपराध लोकांच्या हत्येसाठी तो जबाबदार होता. उच्च पदस्थ लोकांचं अपहरण करणे हा पाब्लोचा आवडता विषय यामुळे तो सरकारवर दबाव आणून काहीही साध्य करत होता. कोलंबियाच्या अध्यक्षाला मारायला त्यानं कमी केलं नाही यावरून समजून घ्या पाब्लो काही असा तसा तस्कर नाही.

तस्करीच्या दुनियेत पैशाचा व्यवहार सगळा रोखीने होतो. त्यामुळे रोख रक्कम सांभाळणे हे एक मोठं काम होतं. पाब्लोने घराच्या भिंतींमध्ये पैसे ठेवलेले असायचे. पाब्लोची संपत्ती इतकी होती कि दरवर्षी करोडो रुपये उंदराच्या नासधुसीमुळे वाया जायचे. महिन्याला नोटा बांधण्यासाठी लागणाऱ्या रबराचा खर्च दोन अडीच हजार डॉलर इतका यायचा. पैसे कुठे कुठे ठेवलेत यासाठी पाब्लोने नकाशा तयार करून ठेवला होता. दरवर्षी पाऊस, उंदीर यामुळे होणारं नुकसान करोडो रुपये होतं. अधिकृत संपत्ती किती होती हे सांगणं जरा कठीणच आहे तरी सुद्धा ३० बिलियन डॉलर एवढी संपत्ती त्याच्याकडे असावी असा अंदाज आहे. पाब्लो पोलिसांपासून बचाव करत त्याच्या एका नवीन घरात आश्रय घेतो. दरम्यान त्याच्या लहान मुलीला थंडी वाजते तेव्हा पाब्लो भिंतीमध्ये लपवलेल्या नोटा बाहेर काढतो आणि सरळ पेटवतो. मुलीला थंडी वाजते म्हणून जवळपास २० लाख डॉलर इतक्या नोटा तो जाळतो. पाब्लोची जास्त संपत्ती नोटांच्या स्वरूपात होती त्यामुळे पाब्लो जाईल तिथे पैशाच्या बॅगा सोबत असायच्या. याच कारणामुळे पाब्लो गरीब लोकांमध्ये खूप पुजला जायचा. पाब्लो स्पर्धा भरवणे, घर बांधून देणे यासाठी पैसा वाटायचा म्हणून तो सुरुवातीला कोलंबियाच्या लोकांसाठी देवदूत होता.

प्रत्येक पर्वाचा अंत असतो तसा पाब्लोचा पण होता. पाब्लोला जनतेचा प्रतिसाद कमी कमी होत गेला. पोलिसांना पाब्लोला पकडणे अवघड जायचे कारण जिथे कुठे असेल तिथे लहान मुलांपासून सगळेजण पाब्लोची मदत करायचे. नंतरच्या काळात पाब्लोला सामान्य लोकांची मदत कमी होत गेली. एकेक करून पोलीस पाब्लोचे साथीदार संपवू लागले. यातून पाब्लोची धावपळ वाढली आणि याच परिस्थितीचा फायदा घेऊन पाब्लो घरच्या छतावर पळताना गोळीबारात मारला गेला. पाब्लो मेला तेव्हा अधिकाऱ्यांना सुद्धा क्षणभरासाठी विश्वास बसेना कारण पाब्लोने अनेक वर्षे पोलिसांना चांगलीच हुलकावणी दिली होती.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.