सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

खसखस खायला परवानगी आहे मग पिकवायला महाराष्ट्रात परवानगी का नाही ?

why-poppy-cultivation-illegal-in-maharashtra

घरात आल्याबरोबर पायाला खसखस चिकटली नाही आणि किचनवट्यावर जिरा, मोहरी पडलेली दिसली नाही तर समजून घ्या या घरात जेवणाला तडका नाही. मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणजे जिरा, मोहरी आणि खसखस या किचन मधल्या दोन चार गोष्टी. जिरा मोहरीला किचन मध्ये ठसठसीत स्थान आहे. त्यामानाने बिचाऱ्या खसखसला पाहिजे तेवढी इज्जत मिळाली नाही. दिवाळीत मात्र हिला जास्त किंमत मिळते. वर्षभर खसखसची सोडचिट्टी झालेलं किचन दिवाळीत मात्र चांगलं जुळवून घेतं. जाळीदार अनारसेवर खसखसची नक्षी दिसली नाही तर काहीतरी चूकल्यासारखं होतं. नंतर भले तुम्ही खसखस झटकून अनारसे खाल्लं तरी चालतंय पण अनारसे वर खसखस टाकायलाच पाहिजे, एवढं गोंडस रूप आहे तिचं. गोंडस रुपाला जास्त भुलू नका तिच्याबद्दल एक गोष्ट ऐकल्यावर ठसका बसल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आमच्या किचन मध्ये दिसणारी खसखस खायला परवानगी आहे पण पिकवायला परवानगी नाही !

खसखस अशी काय डेंजर आहे कि पिकवायला परवानगी नाही, बरं पिकवायला परवानगी नाही मग किराणा दुकानात सहज कसं काय मिळते? पहिल्यांदा ऐकलं तेव्हा काही तरी चुकलं असेल म्हणून एक दोन शेतकरी मित्रांना फोन केला तर त्यांना काही आयडिया नव्हती. त्यात एक तज्ञ मित्र सापडला त्याने सांगितलं अरे खरचं खसखस पिकवायला परवानगी नाही. गांजा, चरस सारखी खतरनाक खसखस दिसत नाही मग तरी परवानगी का नाही ? विषय खोलात जाऊन समजून घेतल्याशिवाय कळणार नाही.

जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात एका शेतकऱ्याने युट्यूब वर बघून अफूची शेती केली. पोलिसांना या गोष्टीची खबर लागली. त्यांनी तातडीने धाड मारली. प्राथमिक चौकशी सुरु झाली. शेतकऱ्याला विचारण्यात आलं कि महाराष्ट्रात अफूची शेती करायला परवानगी नसताना का केली. शेतकरी बोलला, ‘साहेब मला काय माहित हे अफू काय असतं मी तर खसखस उत्पादनासाठी ही शेती केली.’ आता विषय थोडा स्पष्ट झाला असेल. ज्या झाडापासून अफू बनवला जातो त्याच झाडापासून खसखस बनवली जाते. एखाद्या प्रामाणिक शेतकऱ्याला खसखस पिकवायची जरी असेल तरी कुणाला खरं वाटणारा नाही. खसखसच्या नावाखाली अफू पिकेल म्हणून महाराष्ट्रात अफूच्या शेतीला परवानगी नाही. मग तरी महाराष्ट्रात खसखस येते कुठून ?

भारत हा कायदेशीररीत्या अफूची खसखस ​​पिकवणाऱ्या काही देशांपैकी एक आहे आणि कायदेशीररित्या अफूचे डिंक उत्पादन करणारा एकमेव देश आहे. अफूची खसखस ​​(पॅपव्हर सोम्निफेरस) वनस्पती अफूच्या डिंकाचा स्त्रोत आहे. ज्यामध्ये मॉर्फिन, कोडीन आणि थेबेन सारख्या अनेक अपरिहार्य अल्कलॉइड्स असतात. मॉर्फिन हे जगातील सर्वोत्तम वेदनाशामक आहे. अत्यंत आजारी कर्करोगाच्या रुग्णांचं मॉर्फिनशिवाय दु: ख कमी होत नाही. कोडीनचा वापर सामान्यतः कफ सिरपच्या निर्मितीमध्ये केला जातो. अफूला अंमली पदार्थ म्हणून जगात बघितल जातं पण त्यापेक्षा त्याचं औषधी महत्व तेवढंच आहे. पण हेही तितकंच खरं आहे कि काही देश एकूण उत्पादनाच्या केवळ काही अंशी उत्पादन हे खसखस आणि इतर उपयोगी पदार्थांसाठी करतात.

NDPS (THE NARCOTIC DRUGS AND PSYCHOTROPIC SUBSTANCES, ACT, 1985) कायदा केंद्र सरकारला वैद्यकीय आणि वैज्ञानिक हेतूंसाठी अफू खसखसच्या लागवडीला परवानगी आणि नियमन करण्याचा अधिकार देतो. भारत सरकार त्या पत्रिकांना सूचित करते जिथे अफूच्या लागवडीचा परवाना मिळू शकतो. तसेच परवाना जारी करण्याच्या सामान्य अटी दरवर्षी सांगितल्या जातात. या सूचनांना सामान्यतः अफू धोरणे असे संबोधले जाते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये अधिसूचित प्रदेशांमध्ये अफूच्या लागवडीला परवानगी आहे. पुढील वर्षात परवाना मिळवण्याला पात्र होण्यासाठी या तिन्ही राज्यांतील शेतकऱ्यांनी निविदेत नमूद केलेल्या किमान पात्रता अटींची पूर्तता केली पाहिजे. सर्व अटींच्या पूर्ततेनंतर शेतकऱ्यांना अफूची शेती करता येते.

सेट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स (CBN), ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) अंमली पदार्थ आयुक्तांच्या अखत्यारीत शेतकऱ्यांना अफू खसखस ​​पिकवण्यासाठी परवाने जारी केले जातात. प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक शेताचे वैयक्तिकरित्या मोजमाप CBN च्या अधिकाऱ्यांद्वारे केले जाते. परवानाकृत क्षेत्रापेक्षा जास्त अफूची शेती होऊ नये म्हणून स्वतः अधिकरी जागेची तपासणी करतात. लागवड करणाऱ्यांनी उत्पादित केलेली संपूर्ण अफू CBN ला द्यावी लागते. सरकारने ठरवलेल्या दरानुसार अफूची किंमत दिली जाते. कापणीच्या हंगामात CBN वजन केंद्रे स्थापन करते आणि शेतकरी त्यांची अफू या केंद्रांवर आणतात. अशा पद्धतीने शेतकरी CBN ला अफूची विक्री करतात.

अफूच्या झाडाला खसखस म्हणजे नेमकं काय ?

अफू हे तीन महिन्याचे पीक आहे. ऑक्टोबर महिन्यात अफूच्या लागवडीला सुरुवात केली जाते. कांद्याच्या बियाण्यात मिसळून अफूचे बी जमिनीवर फेकले जाते. फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात या पिकाला फुले येतात. अफू हे साधारण ६० ते १२० सेमी उंची असणारे झुडूप दिसतात. फुले गळून पडल्यानंतर त्यापासून बोन्ड तयार होते. हिरव्या दिसणाऱ्या बोन्डाला चिरा मारून द्रवपदार्थ एकत्र केला जातो. याच द्रवपदार्थापसून अंमली पदार्थ तयार केले जातात. अफूचा वापर प्रामुख्याने हेरॉईन बनवण्यासाठी केला जातो व कमी अंशी खसखस आणि औषधी उत्पादनासाठी केला जातो. याची पानं साधी, कमी जास्त करवती काठाची तळाशी खोडास वेधून राहणारे असतात. बिया लहान, पांढऱ्या विपुल असून त्यांनाच खसखस म्हणतात.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.