धनंजय माने इथेच राहतात का हा आयकॉनिक डायलॉग मराठी हृदयांच्या खूप जवळचा आणि आपुलकीचा विषय आहे. लक्ष्या आणि अशोक सराफ या जोडीने महाराष्ट्राचं जेवढं मनोरजंन केलं तेवढं कदाचितच कोणाला जमेल. पडद्यावर लक्ष्या-अशोक सराफ जोडीला जी मान्यता मिळाली ती लक्ष्या-आवडीला एवढी मिळाली नाही. ही जोडी पडद्यावर जशी होती तशीच त्यांच्या वास्तव आयुष्यात सुद्धा हिट होती. लक्ष्या आवडीची लव्ह स्टोरी रुपेरी पडद्यावरून वास्तव आयुष्यात कशी स्थिरावली त्याचीच ही कहाणी !
थोडंसं लाडात, थोडं प्रेमाने आणि मोठ्या आपुलकीने ‘आवडे आवडे’ म्हणत आवडीला जवळ घेणारा लक्ष्या प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमाची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया अरुण यांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप आधीच वास्तवातले नवरा बायको समजलं. लक्ष्मीकांत आणि प्रिया यांचा अभिनय वास्तवाच्या जवळ जाणारा होता कारण लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया या दोघांनी खूप आधीपासूनच एकमेकांना स्वीकारलं होता. एखादी भूमिका चपखल साकारायची असेल तर भूमिकेला वास्तवाची किनार असावी लागते. लक्ष्या आणि आवडी चित्रपटाच्या शूटिंग मध्ये सहजतेने वावरू शकायचे कारण दोघांची चित्रपटातील भूमिका आणि वास्तव फार वेगळं नव्हतं. चित्रपटामुळे दोघे भेटले पण त्यांची पहिली भेट अशी होती कि कोणाला विश्वास बसणार नाही कि पुढे जाऊन ही जोडी सुपरहिट ठरेल.
लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा नट अजून नावारूपाला आला नव्हता. लक्ष्मीकांत लहान सहान नोकऱ्या करून कसा तरी दिवस काढता होता. वेळ मिळेल तसा नाटकाच्या तालमी करत होता. प्रतिभेला प्रतिष्ठा मिळतेच. लक्ष्मीकांत बेर्डेला हळूहळू नाटकात काम मिळू लागलं. संघर्षाच्या काळात पहिली पत्नी रुही बेर्डे यांनी लक्ष्मीकांतला साथ दिली नसती तर आज लक्ष्या हे नाव अजरामर झालं नसतं. संघर्षांचा काळ लोटला ‘टूरटूर’ या व्यावसायिक नाटकापासून लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या करियरला दमदार सुरुवात झाली. यानंतर ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ अशा अनके नाटकांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रंगमंच गाजवला.
नाटकाच्या कामानिमित्त प्रिया बेर्डे यांची आई अभिनेत्री लता अरुण लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरी यायच्या. एकदा त्या मुलगी प्रियाला सोबत घेऊन लक्ष्मीकांत यांच्या घरी गेल्या. तेव्हा प्रिया फक्त नववीत शिकत होत्या. तोपर्यंत नट म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे प्रस्थापित झाले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रियाला बघून चित्रपटात काम करते का म्हणून सहज विचारलं. लक्ष्मीकांत सहज बोलले होते. प्रिया अभिनय करण्यासाठी अजून तयार झाल्या नव्हत्या. त्यांची ही पहिली भेट होती. तेव्हा प्रिया अरुण अभिनय क्षेत्रात आल्या नाहीत पण पुढच्या काही वर्षात बनवा बनवी, रंगत संगत, दे धडक, थरथराट अशा अनेक सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं. त्यांच्या जोडीला लोकांनी खूप प्रेम दिलं. पाहिलं लग्न झालेलं असताना लक्ष्मीकांत बेर्डे प्रिया अरुण यांच्या प्रेमात पडले.
लक्ष्मीकांत आणि प्रिया यांच्या प्रेमामुळे पत्नी रुही बेर्डे लक्ष्मीकांत यांच्यापासून वेगळ्या राहायला लागल्या. दुर्दैवाने त्यांना गंभीर आजाराने ग्रासले यातच त्यांचा अंत झाला. स्वतः प्रिया बेर्डे यांनी एका मुलाखतीत सांगितलं कि, ‘लक्ष्मीकांतला कठीण काळात सगळ्यात जास्त साथ रुही यांनी दिली.’ लक्ष्मीकांत जरी पहिल्या पत्नीपासून दूर राहिले तरी त्यांना त्यांच्या आयुष्यात तिचं योगदान मान्य होतं. लक्ष्मीकांत यानंतर काही काळ एकाकी जगले. पुढच्या काही महिन्यानंतर त्यांनी प्रिया अरुण यांच्याशी लग्न केले. प्रिया आणि लक्ष्मीकांत यांच्या लग्नानंतर लक्ष्मीकांत बेर्डे काही काळ आंनदाने स्थिरावले. पण काळाला त्यांचं स्थिरावणं मान्य नव्हतं आणि एका मोठ्या निराशेला त्यांना सामोरे जावं लागलं.
लक्ष्मीकांत बेर्डे सतत विनोदी भूमिका करून कंटाळले होते. त्यांना विनोदी नट ही त्यांची प्रतिमा थोडी दूर करायची होती. त्यांनी विदूषक हा सिनेमा केला. या सिनेमात त्यांनी खूप चांगली भूमिका केली. पण दुर्दैवाने हा चित्रपट चालला नाही. लक्ष्मीकांत निराश झाले. या चित्रपटाचं अपयश त्यांना शेवटभर टोचत राहिलं. त्यातच भर म्हणून त्यांना मूत्रपिंडाचा आजार झाला. २००४ ला लक्ष्मीकांत रंगमंच सोडून कायमचे गेले. पत्नी प्रियाला हा मोठा धक्का होता. मुलगी स्वानंदी आणि मुलगा अभिनय यांची जबाबदारी त्यांच्या खाद्यवर येऊन पडली. दोन्ही मुलं लहान असताना त्यांच्यावर हा प्रसंग येणे त्रासदायक होते. लक्ष्मीकांत बेर्डेला खरा आनंद त्यांच्या कामातून मिळायचा हे चांगलंच माहित होतं. प्रिया बेर्डे यांनी हीच प्रेरणा मानली आणि पुढच्या तीन चार महिन्यात जत्रा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. हा चित्रपट खूप यशस्वी ठरला.
लक्ष्या-आवडीच्या जोडीतला लक्ष्या आज आपल्यात नाही. पण लक्ष्या आवडीचं अस्तित्व एकमेकांशिवाय अधुरं आहे. दोघांपैकी एकाचं नाव घेतलं तरी पुढचं नाव आपोआप डोळ्यासमोर येतं हीच यांच्या प्रेमाची खरी ताकत.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?