सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

आशिकीच्या यशानंतर ६० चित्रपटाच्या ऑफर येऊन सुद्धा राहुल रॉय गायब झाला.

आशिकी’ने आयुष्य बदललं; जाणून घ्या राहुल रॉयचा बॉलिवूड प्रवास

बस एक सनम चाहिये….
अब तेरे बिन जी लेंगे हम…

टेबलावर डोकं ठेवून प्रेम भंग झालेल्या दर्दी लोकांना आजही ही गाणी इमोशनल करतात. तर काही बहाद्दरांना तर आयुष्यात कधी प्रेम झालं नाही तरी सुद्धा ही गाणी ऐकताना वाटतं आपलं बी काळीज तुटलंय काय? या गाण्याची नशा अजून पुढच्या किती पिढयांना लागणार काय माहित? काही तरी जादू या आशिकी सिनेमात आणि त्याच्या गाण्यांमध्ये होती. राहुल रॉयने पन्नास साठ पिक्चर केले पण आजही त्याला ओळखलं जातं ते फक्त ‘आशिकी’ मुळे. राहुल रॉयला त्याचा पहिला चित्रपट आशिकी कसा मिळाला ही खूप मजेशीर गोष्ट आहे आणि आशिकीच्या प्रचंड यशानंतर सुद्धा राहुल रॊय गायब कसा झाला हे सगळं आज त्याच्या वाढदिवसानिमित्त समजून घेऊ.

आशिकी’मध्ये राहुल रॉयसोबत अनु अग्रवाल हे दोघेही नवोदित कलाकार होते. दोघांची निरागस आणि प्रेमळ जोडी पडद्यावर महेश भट्ट यांनी अशा प्रकारे कोरली होती की, दोघांचे पहिलेच पदार्पण एकदम जोरात झाले. हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटाचे प्रत्येक गाणे इतके सुंदर चित्रित करण्यात आले आहे की ते गाणे ताज्या हवेच्या श्वासाप्रमाणे रसिकांच्या हृदयाला स्पर्शून गेले. हा चित्रपट एक-दोन नाही तर तब्बल ६ महिने हाऊसफुल्ल होता.

राहुल रॉयला जे काही मिळालं त्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांचा मोठी भूमिका होती. चित्रपटात येण्याआधी राहुल रॉय मॉडेलिंग करत होता. राहुलची आई एका वर्तमानपत्रात लेख लिहायची. महेश भट्ट यांना राहुलच्या आईचे लेख खूप आवडायचे. त्यांची आवड त्याना राहुलच्या घरी घेऊन गेली. लेख चांगले असतात हे सांगण्यासाठी महेश भट्ट राहुल रॉयच्या घरी गेले. राहुलच्या आईला बोलत असताना त्यांना घरात राहुलच्या मॉडेलिंगचे फोटो दिसले. फोटो बघून महेश भट्ट यांनी राहुल रॉयला आशिकी साठी विचारणा केली. राहुल साठी ही मोठी संधी होती. अशा प्रकारे राहुल रॉयला त्याचा पहिला चित्रपट मिळाला. यानंतरचा इतिहास तुमच्या समोर आहेच. यश मिळणं हे जितकं महत्वाचं तितकंच त्यात सात्यत नसेल तर तेच यश तुम्हाला जड व्हायला लागतं असच काही राहुलच्या बाबतीत झालं.

आशिकीच्या तुफान यशानंतर पुढचे सात आठ महिने राहुल रॉयसाठी अनपेक्षित होते. एवढं यश पदरात असताना त्याला काम मिळालं नाही. राहुल रॉयला करियर थांबतं कि काय अशी अवस्था झाली होती. पण आठ महिन्यांनंतर एकदम ६० चित्रपटांची ऑफर आली. एक साथ इतके चित्रपट आल्यावर राहुल रॉयला काय करावे सुधरेणा झाले. राहुल रॉयला काही दिवसांपूर्वी करिअर थांबण्याची भीती वाटली होती यामुळे त्याने चित्रपट निवडताना खूप घाई केली. ६० पैकी ४७ चित्रपट त्याने स्वीकारले आणि हाच निर्णय घातक ठरला.

पुढचे २५ चित्रपट फ्लॉप ठरले. काही चित्रपट थोडे फार चालले. सपने साजन के, गुमराह आणि महेश भट्टच्या जुनून सारख्या काही चित्रपटांनी चांगले काम केले. महेश भट्टच्या जुनूनमध्ये त्याला लव्हरबॉय नव्हे तर नकारात्मक भूमिका मिळाली होती. राहुलचा अभिनय आवडला पण करिअरचा आलेख उंचावण्यास तो उपयुक्त ठरला नाही आशिकी सारखा करिष्मा पुन्हा त्याला दाखवता आला नाही. राहुल रॉय खूप काळ रुपेरी पडद्यापासून दूर राहिले भारतात परतल्यानंतर त्यांना बिग बॉस मुळे चर्चेत राहायची संधी मिळाली. बिग बॉस जिंकल्यानंतर राहुल रॉय पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसतील असं वाटतं होतं पण अचानक आजारी पडल्याने हा प्रकल्प थांबला.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.