सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

बाळासाहेब ठाकरे इन मेकिंग..राज ठाकरेंच्या रूपात नवा हिंदुहृदय सम्राट तयार होतोय

raj-thakre-trying-to be-balasaheb-thakre

मागच्या एक महिन्यापासून राज्यात काय चालत असेल तर ते आहे राज ठाकरे आणि फक्त राज ठाकरे ! शरद पवारांपासून तर काँग्रेसच्या नाना पटोलेंपर्यंत , शिवसेनेच्या संजय राऊत यांच्या पासून तर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत जो तो फक्त राज ठाकरे यांच्यावरच बोलत आहे. हे सगळं वातावरण बघितलं कि राज्यात बाळासाहेब ठाकरे परत आल्याची फीलिंग येत आहे. एक काळ होता राज्याच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरेंचा दबदबा होता, सर्व राजकारण त्यांच्या भोवती फिरत असे. आणि सध्या राज्यातलं सर्व राजकारण राज यांच्या भोवती फिरत आहे. त्यामुळे नवीन बाळ ठाकरे इन मेकिंग म्हणणं अतिशोक्ती ठरत नाही, कसं ते बघू.

उद्धव ठाकरे स्वतः बोलले कि राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब समजत आहेत

गुडीपाडवा आणि त्यानंतरची उत्तरसभा झाल्यावर राज्याचे मुख्यंमत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी राज यांच्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “राज यांचे सध्या माकडचाळे चालू आहेत. राज यांच्या वागण्यावरून असं वाटत आहे कि राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजत आहेत. पण त्यांनी लक्षात घ्यावं कि बाळासाहेब ठाकरे एक होते आणि एकच राहतील त्यांची नक्कल करून कोणी बाळासाहेब होणार नाही.”
आता मला सांगा राज ठाकरेंना उद्धव यांच्या पेक्षा जास्त कोण ओळखत असेल? उद्धव यांच्यासोबतच्या स्पर्धेमुळेच राज यांनी शिवसेना सोडली. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यात एक सेन्स आहे. त्याचं विधान विचार करायला लावणार आहे.
राज ठाकरे कसे स्वतःला बाळासाहेब समजत आहेत हे समजून घेऊ.

मराठी नंतर हिंदुत्वाचा मुद्दा

बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण अभ्यासलं तर आपल्याला सापडेल कि शिवसेनेची स्थापना काय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली नव्हती. मुंबईच्या शिवाजी पार्कवर मराठी माणसांच्या हक्कांसाठी प्रबोधनकार ठाकरेंच्या आशिर्वादाने बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात शिवसेना मुंबईत मराठी माणसांच्या हक्कासाठी लढत होती. दक्षिण भारतातल्या गुंडांच्या विरोधात शिवसेनेनं “बजाओ पुंगी हटावो लुंगी ” ही घोषणा दिली होती. मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना मुंबईत वाढली पण राज्यात वाढण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी हिंद्त्वाचा सहारा घेतला. त्यानंतरच ते हिंदुहृदय सम्राट झाले आणि शिवसेना राज्यात वाढली.
राज ठाकरेंचा प्रवास देखील बाळासाहेब यांच्या पाऊलावर पाऊल ठेवावे तसा चालू आहे. आपल्याला सर्वाना माहिती आहे ६ मार्च २००६ ला मराठीचा मुद्दा घेत राज ठाकरेंनी त्याच शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मागचे १६ वर्ष झाली राज ठाकरे मराठीच्या मुद्यावर राजकारण करत आहेत. पण त्यांना बाळासाहेब ठाकरेंसारखं मराठीच्या मुद्द्यावर मुंबईच्या बाहेर प्रतिसाद मिळाला नाही. बाळ ठाकरेंना तरी मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाला होता पण राज यांना तोदेखील मिळाला नाही. त्यामुळेच त्यांनी १६ वर्षाच्या मराठी प्रवासानंतर बाळासाहेबांसारखं हिंदुत्व हाती घेतलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंचा हिंदुत्वापर्यंतचा प्रवास एकदम समांतर चालू आहे फरक एवढाच बाळासाहेबांच्या वाट्याला जास्त यश आलं.

औरंगाबाद समान दुवा !


मुंबईच्या बाहेर शिवसेना पोहचली आणि वाढली ते शहर होत औरंगाबाद, ज्याला शिवसेना संभाजीनगर म्हणते. शिवाजी पार्कच्यानंतर बाळासाहेंबानी सर्वात मोठ्या सभा घेतल्या त्या औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर. संभाजीनगरच्या जनतेला बाळासाहेब आणि शिवसेना एव्हढी आवडली कि १९९० पासून संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे आणि मागच्या निवडणुकीपर्यन्त होता. २०१९ च्या निवडणुकीत इम्तियाझ जलील यांनी शिवसेनेचा बालेकिला काबीज केला. सध्या काहीही असो पण शिवसेनेला राज्यात एंट्री दिली ते औरंगाबादच्या जनतेने आणि आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे.
राज ठाकरेंनी देखील मुंबईच्या बाहेर संभाजीनगरची निवड केली आहे. सभेसाठी देखील सांस्कृतिक मंडळाचे मैदान वापरले आहे. प्रतिसाद देखील खतरनाक मिळाला आहे. जुने लोक सांगत आहेत कि असाच प्रतिसाद बाळासाहेब ठाकरेंना मिळाला होता. मराठवाड्यातल्या प्रत्येक शहरात सभा घेण्याची घोषणा देखील राज ठाकरेंनी केली आहे.

संभाजीनगरपर्यंत राज ठाकरेंचा प्रवास बाळासाहेबांच्या मार्गावर चालू आहे. जनतेचा प्रतिसाद देखील सारखाच आहे. राज बाळ ठाकरेंच्या भूमिकेत आले आहेत. पण पुढच्या काळात जनता त्यांना संधी देते कि नाही? सध्या जे इन मेकिंग वाटत आहेत ते राज ठाकरे बाळ ठाकरे होतात कि नाही हे येणारा काळच उत्तर देईल. एक मात्र खरं आहे कि येणाऱ्या काळात राजकारण आणि राज ठाकरे दोघे पण प्रचंड गाजणार आहेत. त्यामुळे पुढच्या काळात आणखी सभा, आरॊप, प्रत्यारोप अनुभवायला मिळणार आहेत. ज्यांना राजकारण आवडतं त्यांच्यासाठी येणारा काळ पर्वणी ठरणार आहे.


कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.