राणी लक्ष्मीबाई आणि त्यांचे पती गंगाधरपंत नेवाळकर यांनी आपल्या नवजात मुलाच्या मृत्यूनंतर नात्यातल्या वासुदेव नेवाळकर यांचा पुत्र आनंदराव यास दत्तक घेतले होते. त्याचेच पुढे जाऊन दामोदरराव असे नामकरण केले, राणी लक्ष्मीबाईंनी पाठीवर बांधलेले जे बाळ दिसते ते हेच दामोदरराव. त्यांचा जन्म १८४९ चा.
गंगाधरराव यांच्या मृत्यूनंतर लक्ष्मीबाई आपल्या दत्तक पुत्राला झांसीच्या गादीवर बसवून स्वतः कारभार हाती घेतात. परंतु लॉर्ड डलहौसीच्या नेतृत्वात इंग्रज दत्तक वारसा नामंजूर करून झांसीचे राज्य खालसा झाले असे जाहीर करतात. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः इंग्रजांविरुद्ध लढा देतात. दत्तक मुलाला पाठीशी बांधून घोड्यावर बसून मैदानात उतरतात. इंग्रजांशी लढता लढता ग्वालियरच्या रणांगणावर धारातीर्थ पडतात.
झांसीच्या लढाईत दामोदरराव थोडक्यात वाचतात. राणी लक्षमीबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या रक्षणाची जबाबदारी दासी काशीबाई यांच्यावर सोपवण्यात येते. त्यानंतर पुढचे तीन दिवस ग्वालियर मध्ये दामोदररावला लपवतात. नानेखान रिसालदार, रामचंद्र देशमुख, रघुनाथ सिंग हे सरदार ६० उंट,२२ घोडे आणि दामोदरराव यांना सोबत घेऊन बिठूर येथील पेशव्यांच्या छावणीतून पळ काढतात व जंगलातून लपतछपत बुंदेलखंडच्या दिशेने जातात. इंग्रजांच्या भीतीमुळे कोणीही त्यांना आश्रय देण्यास तयार होत नाही. पुढे झांसीचे सैनिक त्यांना वेदवती नदीच्या काठावर असलेल्या गुहेत काही दिवस ठेवतात. अन्न पाण्यासाठी पैसे कमी पडत असल्यामुळे लक्ष्मीबाई यांची आठवण असलेले त्यांच्या हातातील ३२ तोळे सोन्याचे कडे त्यांना विकावे लागते.
पुढे दामोदररावांची तब्बेत खालावत जाते. शेवटी झाशीच्या राणीच्या वारासदाराचा जीव वाचवण्यासाठी नाणेखान रिसालदार इंग्रजांशी मध्यस्थी करतात. माउंट क्लिफ नावाचा इंग्रज अधिकारी त्यांच्या विश्वासातला असल्यामुळे दामोदररावला आश्रय द्यायला तयार होतात. रिसालदार मध्यस्थीवेळी म्हणतात,
हे घडले त्यात या निष्पाप १० वर्षाच्या मुलाची काय चूक? आईविना जंगलात तो एखाद्या प्राण्यासारखा जीवन जगत आहे. त्याचा जीव वाचवा म्हणजे अखंड हिंदुस्तानच्या जनतेची दुवा तुम्हाला लागेल
पुढे इंग्रज दामोदररावांना इंदोर येथील छावणीत घेऊन येतात. तिथे रिचर्ड शेक्सस्पिअर नावाचा ब्रिटिश एजंट त्यांची व्यवस्था लावून देतो व त्यांना १०,००० रुपयांची पेन्शन मंजूर करण्यात येते. त्यांच्या इंग्रजी, उर्दू, मराठी शिक्षणासाठी काश्मिरी पंडित मुंशी धर्मनारायन यांची नियुक्ती करण्यात येते. परंतु झाशीच्या खजिन्यातील काही रक्कम दामोदररावला द्यायला इंग्रज स्पष्ट नकार देतात.
दामोदररावांचं पुढील आयुष्य इंदोर मध्ये स्थिरावतं. दामोदर रावांना फोटोग्राफीची खूप आवड होती. योग्य वयात आल्यावर त्यांची सख्खी आई त्यांचे लग्न लाऊन देते. दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचे १८७२ ला अकाली निधन होते. मग त्यांचे दुसरे लग्न लावण्यात येते. दुसऱ्या पत्नीपासून त्यांना लक्ष्मणराव नावाचा मुलगा होतो. २८ मे १९०६ साली वयाच्या ५६ व्या वर्षी दामोदररावांचा मृत्यू होतो.
दामोदर रावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना देण्यात येणारी २०० रुपये प्रति महिन्याची पेन्शन बंद करण्यात येते. यांनतर मुलगा लक्ष्मणराव आपले आडनाव झासीवाले लावायला सुरुवात करतो व . त्यांनतर खूप वर्षे झांसीच्या राणीचे हे वारसदार विस्मरणात जातात. २००७ साली मोहन नेपाळी नावाच्या इतिहास संशोधकाने त्यांना शोधून काढलं.
लक्ष्मणराव यांना दोन मुले होतात कृष्णराव आणि चंद्रकांत राव. कृष्णराव यांना दोन मुले मनोहर आणि अरुण राव तर चंद्रकांत रावांना तीन मुले अक्षय, अतुल व शांतीप्रमोद राव. अरुण राव हे मध्य प्रदेश इलेक्ट्रिक बोर्डामधून ज्युनिअर इंजिनिअर या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा एक मुलगा योगेश झासीवाले हा नागपूरला एका सॉफ्टवेअर कंपनी मध्ये सध्या काम करतो.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
व्हाट्स अँपवर आलंय प्लास्टिकचा तांदूळ चीनने भारतात पाठवलाय हे खरंय का ?