सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

२० वर्षात फक्त बाराच चित्रपट केले पण सगळे सुपर सुपरहिट केले

चित्रपटाच्या दुनियेत यश ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. एखादा चित्रपट चालला, तर लोक डोक्यावर घेतात आणि एखादा चित्रपट पडला तर मात्र कलाकारांकडे पाठ फिरवतात. पण एस. एस. राजामौली यांनी गेल्या २० वर्षांमध्ये दिग्दर्शित केलेले बाराच्या बारा चित्रपट नुसते हिट नाही तर सुपर डुपर हिट झाले. सध्या देशभरात गाजत असणाऱ्या ‘आरआरआर’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही राजामौली यांनीच केलं आहे.
कोडुरी श्रीशाल श्री राजामौली असं पूर्ण नाव असणारे राजामौली सुरुवातीला एडिटिंगचं काम करत. त्यानंतर ते जाहिराती आणि मालिकांचं दिग्दर्शन करू लागले. बघता बघता यशस्वी चित्रपट दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित होत गेले.
मागच्या वीस वर्षात राजामौलीने तेलुगू सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. बाहुबली चित्रपटाची चर्चा जगभरात झाली होती आणि आरआरआर देखील बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत आहे. राजामौली त्यांच्या चित्रपटामध्ये कलाकार तर चांगले घेतोच पण कलाकारांपेक्षा त्याच्या कथेमध्ये जास्त ताकद असते. प्रभास सारख्या तामिळ हिरोला राष्ट्रीय स्थरावर नेण्याचं श्रेय जात ते राजामौली यांना. राजामौली यांच्या प्रत्येक चित्रपटाची कथा पूर्ण वेगळी असते, एका वेगळ्या शैलीत चित्रपट दाखवण्याचा त्यांचा हातकंडा आहे. त्यामुळेच प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात त्यांना यश मिळतं.

एडिटिंगपासून यशस्वी दिग्दर्शकापर्यंत मजल

पदवी झाल्यावर राजामौली यांनी तेलुगू चित्रपटांमध्ये एडिटिंगच काम सुरु केलं. एडिटिंग मध्ये चांगला अनुभव घेतल्यावर राजमौली यांचे वडील विजयेंद्र प्रसाद यांनी जाहिरात दिग्दर्शित करणाऱ्या के राघवेंद्र यांच्याकडे राजमौली यांना प्रशिक्षणासाठी पाठवले. के. राघवेंद्र यांच्याकडूनच राजामौलीने दिग्दर्शनाचे धडे घेतले आणि नंतर २००१ ला स्टुडन्ट नंबर वन या चित्रपटाचं दिग्दर्शन करत त्यांनी ह्या क्षेत्रात पाऊल टाकलं. तेंव्हापासून राजामौलीने मागे वळून बघितले नाही.
स्टुडन्ट नंबर वन या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरने प्रमुख भूमिका केली होती. त्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीने राजमौली यांनी सिंहाद्री हा दुसरा चित्रपट दिग्दर्शित केला, त्यातही त्यांनी ज्युनिअर एनटीआरला घेतलं. तोपर्यँत आदि या चित्रपटामुळे ज्युनिअर एनटीआरला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे सिंहाद्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात गाजायला हवा असा दबाव राजामौलींवर होता. या निमित्ताने त्यांचा चित्रपट पहिल्यांदाच ‘ब्लॉकबस्टर’ ठरला. 

चित्रपट उद्योगातील विक्रम

बाहुबली प्रदर्शित होण्यापूर्वी राजामौली हे मगधिराचे दिग्दर्शक म्हणून चाहत्यांना माहिती होते. वडील विजयेंद्र प्रसाद यांच्याच कथेवर आधारित असणारा मगधिरा हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी १५ वर्षं वाट पाहिली. साठाद्रु वंशातील योध्याच्या आयुष्यावरील या चित्रपटाने मुख्य अभिनेता राम चरण तेजाला लोकप्रियता मिळवून तर दिलीच शिवाय या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले.

बाहुबली’ने केलेला चमत्कार

‘बाहुबली’ हा चित्रपट राजमौली यांच्या कारकीर्दीतला आत्तापर्यंतचा सर्वांत भव्यदिव्य आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट राहिला आहे. ‘बाहुबली- द बिगिनिंग’ या चित्रपटमालेतला पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर ‘कट्टाप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या एका डायलॉग आधारे प्रेक्षक दुसऱ्या भागाची वाट पाहात दोन वर्षं थांबले. ‘बाहुबली’ चित्रपटमालेद्वारे राजामौली यांनी तेलुगू चित्रपट उद्योगाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं. त्यांनी ‘बाहुबली’ हा एक सुपरहिरोच जगाला दिला आहे.

महाभारतावर चित्रपट करण्याची महत्त्वकांक्षा

महाभारताचं दिग्दर्शन करण्याची इच्छा राजामौली यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. तो त्यांच्या स्वप्नातला प्रकल्प आहे, असंही ते म्हणाले आहेत. लहानपणापासून आपण महाभारतातील कथा ऐकत मोठे झालो आहोत त्यामुळे हा महाप्रकल्प कायमच आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात असतो, असं ते म्हणतात. असा चित्रपट केला तर तो प्रचंड गाजेल याची आपल्याला खात्री असल्याचंही ते म्हणतात. अशा प्रकारच्या महाप्रकल्पासाठी किमान दहा वर्षं लागतील, असं त्यांना वाटतं. इतका वेळ देणं आपल्याला शक्य होईल का, याबद्दल ते साशंक असले तरी त्यांना हा चित्रपट करायचा आहे एवढं नक्की.

२५ मार्च प्रदर्शित झालेल्या आरआरआर बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला गोळा करत आहे. चित्रपटांच्या बातम्या करणाऱ्या पत्रकार तरुण आदर्श यांनी आरआरआर चित्रपटाची कमाई ट्विट केली आहे.

आरआरआर राजामौली हा त्याच्या कारकिर्दीमधील सर्वाधिक मिळकत करणारा चित्रपट असे जाणकार म्हणत आहेत . त्यांच्या चित्रपटातील प्रमुख अभिनेते ज्युनिअर एनटीआर व राम चरण तेजा यांनी दोन भिन्न प्रवृत्तीची पात्रं निभावली आहेत. चित्रपटाची टॅगलाइन आहे- रौद्रम, रुधिरम, रणम्. ब्रिटीशकालीन कथानक दाखवणारा हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला आहे. आरआरआर हा राजामौली यांचा बारावा ब्लॉकबस्टर सिनेमा आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.