सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

फाशी रोखावी म्हणून ब्रिटिशांना विनंती करणाऱ्या वडिलांवर भगत सिंग का चिडले ?

bhagat-singh-letter-to-father

८ एप्रिल १९२९ केंद्रीय विधान भवनात भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्बस्फोट घडवला. बहिऱ्या लोकांना मोठ्या आवाजात बोलल्याशिवाय ऐकू जाणार नाही ही भगत सिंग यांची धारणा होती. बॉम्बस्फोट घडवून माणसं मारणे भगत सिंगचा हेतू नव्हता. जुलमी ब्रिटिश राजवटीवर हा बॉम्बस्फोट होता. म्हणून तर बॉम्ब अशा ठिकाणी फोडला जिथे कोणाला हानी होणार नाही. बॉम्ब टाकल्यांनंतर बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंग इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देऊ लागले. पोलिसांनी त्यांना अटक केली. यानंतर भगत सिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जेलमध्ये राहून आपलं म्हणणं सुरूच ठेवलं. त्यावेळेस सगळ्यांना वाटतं होतं कि भगत सिंग यांची सुटका व्हावी. काही लोकांचा असा आरोप आहे कि महात्मा गांधी यांनी भगत सिंगची फाशी रोखली नाही. भगत सिंगची कोणी फाशी रोखावे कि नाही हा प्रश्न थोडा बाजूला ठेवा पण कधी हा विचार केलाय का, स्वतः भगत सिंग यांना फाशी रोखायची होती का. जर भगत सिंग यांना फाशी नको असती तर त्यांनी स्वतः ब्रिटिश सरकारकडे विनंती केली असती. जीव वाचवण्यापेक्षा एक मोठं ध्येय भगत सिंग यांच्यासमोर होतं. ते ध्येय काय होतं याचं उत्तर भगत सिंगांनी त्यांच्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात सापडेल. भगतसिंग यांचा खटला अंतिम टप्प्याला पोहचला तेव्हा किशनसिंग यांचे मन पुत्रप्रेमाने व मायेने भरून आले होते. त्या वेळी आपल्या मुलाला गळफासातून वाचवण्यासाठी त्यांनी व्हॉइसरॉय व निवाडा मंडळ (ट्रायब्यूनल) यांना एक पत्र लिहिले होते. वडिलांनी लिहिलेल्या पत्रामुळे भगतसिंग फारच अस्वस्थ झाले होते. वडिलांच्या या कृतीमुळे यावर भगत सिंग यांनी त्यांना पत्र लिहून जे कळवलं ते वाचून डोळ्याची झापडं उघडतील. भगत सिंगांनी लिहिलेले उत्तर जसेच्या तसे (मराठी अनुवाद ) वाचा.

दिनांक ४ ऑक्टोबर १९३०

प्रिय पिताजी,

माझा बचाव करण्यासाठी खास निवाडा मंडळाच्या सदस्यांना आपण विनंती अर्ज सादर केला आहे, हे ऐकून माझी स्थिती चमत्कारिक झाली आहे. या शहाणपणाने माझ्या स्वास्थ्यावर फार मोठा आघात होणार आहे. त्यानं माझ्या मनाचा एकूणच तोल बिघडवून टाकला आहे. ह्या टप्प्याला आणि अशा परिस्थितीत असा विनंती अर्ज सादर करणे आपल्याला कसे काय योग्य वाटले, ते मला समजू शकलेले नाही. बाप म्हणून असलेल्या भावना व कळवळा लक्षात घेऊनही माझ्याशी सल्लामसलत न करता माझ्या वतीने अशा प्रकारची कृती करण्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा हक्क आहे, असे मला वाटत नाही. राजकीय बाबतीत माझे विचार हे नेहमीच आपल्यापेक्षा वेगळे आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे. आपल्या मान्यतेची किंवा अमान्यतेची पर्वा न करता मी नेहमीच स्वतंत्रपणे कार्य करत आलो आहे.

माझा खटला मी अतिशय गंभीरपणे लढवावा आणि माझा बचाव योग्य प्रकारे करावा, ही गोष्ट माझ्या मनावर बिंबवण्याचा आपण सुरुवातीपासून प्रयत्न करत आला आहात हे आपल्याला आठवत असेल अशी मला आशा आहे. पण मी नेहमीच या गोष्टीला विरोध करत आलो आहे, हेदेखील आपल्याला ठाऊक आहे. माझा बचाव करण्याची इच्छा मी कधीही बाळगली नव्हती आणि मी त्याचा कधीही गंभीरपणे विचार केला नव्हता. ती एक केवळ अस्पष्ट विचारसरणी होती की माझ्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी माझे काही युक्तिवाद होते हा एक वेगळाच प्रश्न आहे आणि त्याची इथे चर्चा करता येणार नाही.

एका निश्चित धोरणानुसार आम्ही हा खटला लढवत आहोत, हे आपणास ठाऊक आहे. माझी प्रत्येक कृती ही एकूण धोरण, माझी तत्त्वे आणि माझा कार्यक्रम यानुसारच असली पाहिजे. आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे; पण ती यापेक्षा वेगळी असती तरीही बचाव पक्ष मांडणारा मी शेवटचा माणूस असतो. आमच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले असले तरीही खटल्याच्या काळात माझ्यासमोर फक्त एकच कल्पना होती आणि ती म्हणजे खटल्याकडे संपूर्णपणे तटस्थपणे पाहायचे. सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी तटस्थ असावे, न्यायालयातील कायदेशीर लढ्यांची कधीच पर्वा करू नये आणि त्यांना भोगाव्या लागणाऱ्या फार मोठ्या शिक्षा धीटपणे सहन कराव्यात, हे माझे पूर्वीपासूनचे मत आहे. ते आपला बचाव करू शकतात. पण तो नेहमीच निव्वळ राजकीय विचारातून करायला हवा आणि वैयक्तिक दृष्टिकोनातून कधीच करता नये. या तत्त्वाला अनुरूप असेच आमचे धोरण या खटल्यात सदैव राहिले आहे. त्यात आम्ही यशस्वी झालो की नाही, याचा निर्णय देणे हे माझे काम नाही. अतिशय तटस्थ वृत्तीने आम्ही आमचे काम करत आलो आहोत.

लाहोर कटाच्या खटल्याचा वटहुकूम जारी करताना त्यासोबत असलेल्या परिपत्रकात व्हॉइसरॉयने म्हटले होते की या खटल्यातील आरोपी कायदा व न्याय या दोहोंचा अवमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही कायद्याचा अवमान करत आहोत की इतर तसे करत आहेत हे जनतेला दाखवून देण्याची संधी निर्माण झालेल्या परिस्थितीने आम्हाला दिली आहे. या बाबतीत लोक आमच्याशी असहमत होऊ शकतात. आपणदेखील त्यांच्यातील एक असू शकता. याचा अर्थ असा नव्हे की माझ्याशी सल्लामसलत न करता किंवा मला त्याबाबत काहीही ठाऊक नसताना आपण अशा प्रकारची कृती करावी. आपण बहुधा विचार करता त्याप्रमाणे माझे आयुष्य काही एवढे मौल्यवान नाही; निदान मला तरी तसे वाटत नाही. माझ्या तत्त्वांची आहुती देऊन बचाव करावा एवढी काही त्याची किंमत नाही. माझे जे इतर कॉम्रेड्स आहेत त्यांचीही स्थिती माझ्यासारखीच गंभीर आहे. आम्ही सर्वांनी एक समान धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी आम्हाला व्यक्तिशः कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही अखेरच्या क्षणापर्यंत त्याला चिकटून राहू.

पिताजी, मी एका पेचात चांगलाच अडकलो आहे. शिष्टाचाराच्या सर्वसामान्य तत्त्वाकडे माझे दुर्लक्ष होईल आणि तुमच्या कृतीवर टीका करताना किंवा त्यातील दोष दाखवताना माझी भाषा निष्ठुर असेल, याची मला भीती वाटते. मला स्पष्टपणे सांगू द्या. जणू काही माझ्या पाठीत खंजीर खुपसला गेला आहे असे मला वाटते. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने असे काही केले असते तर विश्वासघात करण्यात तिने काही कमी ठेवले नाही, असा मी विचार केला असता. पण तुमच्या बाबतीत मात्र तो दुबळेपणा आहे. अतिशय वाईट प्रकारचा दुबळेपणा आहे हे मला सांगू द्या.

प्रत्येकाच्या सत्त्वपरीक्षेची ही वेळ होती. पिताजी, मला सांगू द्या. त्यात तुम्ही अपयशी झालात. इतर कोणीही असू शकतो तितके तुम्ही प्रामाणिक देशभक्त आहात हे मी जाणतो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही आपले अवघे आयुष्य समर्पित केले आहे, हेदेखील मला ठाऊक आहे. पण अशा मोक्याच्या क्षणी आपण असा दुबळेपणा का दाखवलात? मी ते समजू शकत नाही.

आपण केलेली कृती मला मंजूर नाही हे शेवटी आपल्याला, माझ्या इतर मित्रांना आणि माझ्या खटल्यात आस्था असणाऱ्या लोकांना मला सांगायचे आहे. न्यायालयात कोणत्याही प्रकारे बचाव करावा अशा बाजूचा मी आजही नाही. माझ्या काही सह आरोपींकडून बचाव इत्यादी बाबत सादर केलेला विनंती अर्ज जरी न्यायालयाने स्वीकारला असता, तरीदेखील मी माझा बचाव केला नसता. उपोषणाच्या वेळी माझ्या मुलाखतीच्या बाबतीत निवाडा मंडळाला माझे जे अर्ज सादर केले गेले, त्यांचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि कोणत्याही प्रकारे बचाव करायला प्रत्यक्षात माझी कधीच इच्छा नसताना मी बचाव करणार आहे असे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले होते. पूर्वीप्रमाणे आजही माझा तोच विचार आहे. बचाव करण्याच्या कृतीला बोर्स्टल तुरुंगात असलेले माझे मित्र मी देशद्रोह व विश्वासघात केला असे समजले असते. त्यांच्यासमोर माझी भूमिका स्पष्ट करायला मला संधीदेखील मिळाली नसती.

या गुंतागुंतीसंबंधीचे सर्व तपशील जनतेला कळावेत, अशी माझी इच्छा आहे. म्हणून हे पत्र प्रसिद्ध करावे, अशी मी आपणास विनंती करतो.

तुमचा लाडका मुलगा
भगत सिंग

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.