चोरी करणाऱ्याला कशात किंमत सापडेल हे सांगता येत नाही. हॉलिवूड पिक्चर मध्ये अवघड चोऱ्या लय बघितल्या पण मेलेल्या माणसांना चोरून पैसे कमावणारी चोरी कधी बघितली नाही. पण एका बहाद्दराने वास्तवात मृतदेह असलेली शवपेटी चोरली. इथं जिवंत असल्यावर किंमत देईना कोणी मेल्यावर काय किंमत मिळणार? म्हणून या गड्याने अशा तशा माणसाचं प्रेत चोरलं नाही. त्याने थेट जगप्रसिद्ध विनोदी अभिनेता चार्ली चॅप्लिनचा मृतदेह असलेली शवपेटीच चोरली.
पोलंड मधून २४ वर्षीय रोमन वार्डास निर्वासित म्हणून स्वित्झरलँड मध्ये आला. त्याला वाटलं हा देश चांगला आहे इथे आल्यावर काम धंदा सहज मिळेल. कार मेकॅनिक म्हणून तो नोकरीच्या शोधात होता. पण झालं उलटच त्याला काही काम मिळेना. दिवस जाईल तसं त्याचा ताण वाढत होता. काय करावं सुचेना तेवढ्यात इटली मध्ये एका चोराने मृतदेह चोरून मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळले, ही बातमी त्याने पेपरात वाचली. खिशात पैसे नसणाऱ्या माणसांना अशा वेळेस प्रत्येक घटनेत पैसे कमवण्याची संधी दिसू लागते. ही माणसं चांगलं वाईट विचार करत बसत नाही. रोमन वार्डासच्या डोळ्यासमोर नुकतेच निधन झालेल्या चार्ली चॅप्लिनची शवपेटी दिसू लागली.
चार्ली चॅप्लिनच्या निधनानंतर दोन महिन्यांनी शवपेटी गायब झाली
रोमन वार्डासला पूर्ण नियोजनासाठी अजून एक दोन माणसांची गरज होतीच. त्याने बल्गेरियाच्या गँत्चो गनेव्ह या ३८ वर्षीय इसमाला का कामासाठी तयार केलं. शवपेटी वाहून नेण्यासाठी चार चाकी गाडीची गरज होती. गँत्चो गनेव्ह जवळ चार चाकी होती. रोमन वार्डासने नियोजनाला सुरुवात केली. Corsier-sur-Vevey इथे चार्ली चॅप्लिन जवळपास २३ वर्षे राहिला. त्याच्या हवेलीच्या जवळच मृत्यनंतर चार्ली चॅप्लिनचे थडगे बांधण्यात आले होते. वार्डास आणि गनेव्ह हे एका रात्री थडग्याजवळ पोहचले. वार्डासने खोदायला सुरुवात केली. खोदलेल्या ठिकाणी खोलवर शवपेटी पुरायची असा त्याने विचार केला पण तेवढ्यात पाऊस सुरु झाला. त्यामुळे चिखल होऊ लागला. भिजलेली जड माती उकरायला त्रास देऊ लागली. म्हणून वार्डासने शवपेटी बाहेर काढून दुसरीकडे दफन करायचा विचार केला. गनेव्हन गाडी घेऊन तयार होताच. प्रेत असलेली शवपेटी उचलून गनेव्हच्या गाडीत टाकली.
शवपेटी जवळपास लपवणे गरजेचे होते. जिनिव्हा तलावापासून २० किलोमीटर अंतरावर मक्याच्या शेतात शवपेटी पुरून टाकायचा वार्डासने निर्णय घेतला. वार्डासने गनेव्हाला खड्डा खोदायला मदत मागितली. काम फत्ते झाल्यांनतर वार्डासने चार्ली चॅप्लिनच्या पत्नीला मिस्टर रोचॅट या खोट्या नावाने फोन केला. पत्नी ओना चॅप्लिनकडे सहा लाख डॉलरची मागणी केली. रक्कम लवकर न दिल्यास कुटुंबाला हिंसेचा सामना करावा लागेल अशी पण धमकी दिली. चार्ली चॅप्लिनची शवपेटी गायब होणे लहान गोष्ट नाही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलीस यंत्रणांनी शोधमोहीम सुरु केली.
रोमन वार्डासने शवपेटी चोरली आणि त्याला वाटलं पुढचं सगळं सोपं जाईल. त्याला नीट अंदाज आला नाही. पोलिसांनी त्याला सहज शोधून काढलं. त्याचा सहकारी गँत्चो गनेव्ह हा पळून जायच्या तयारीत होता. बल्गेरियातून तुर्कस्तानात जायचा त्याचा इरादा होता. त्याला ते जमलं नाही. शेवटी स्वित्झर्लंडच्या पश्मिकडे तो कार मेकॅनिक म्हणून काही दिवस राहिला पण शेवटी सापडला गेलाच. दोघांवरही गुन्हा नोंद झाला. थडग्याची विटंबना आणि धमकी देऊन खंडणी गोळा करणे असे गुन्हे त्यांच्यावर नोंदवले गेले. रोमन वार्डासला साडे चार वर्षाची तर गनेव्हला अठरा महिन्यांची शिक्षा झाली. चार्ली चॅप्लिनचा मृतदेह असलेली शवपेटी पुन्हा आहे त्या ठिकाणी पुरण्यात आली.
असे अफलातून चोर तुम्हाला माहित असतील तर नक्की कमेंट करून सांगा.
हे पण वाचा
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?