सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

स्वीडन सोडून पिक्चर मध्ये काम करायला भारतात आलेले टू फॉरेनर्स इन बॉलीवूड

two-foreigners-in-bollywood-cast-marathi

हॉलिवूड मध्ये काम करायला भारत सोडून प्रियांका चोप्रा जाते तेव्हा आपसूकच हॉलिवूड मोठंय असं वाटतंच. भारतीय अभिनेते हॉलिवूड मध्ये झळकण्यासाठी धरपडत असतात. त्यामुळे अभिनय क्षेत्रांत काम करायचा मोक्ष मिळवायचा असेल तर लोक अमेरिकेला जातात असं म्हणतात. पण सगळेच अमेरिकेला जात नाहीत काही जण भारतात पण येतात. हॉलिवूड नावाला मोठं आहे पण जगावर प्रभाव भारतीय सिनेमाचा काय कमी नाय. कितीतरी विदेशी अभिनेते हिंदी चित्रपटात काम मिळावं म्हणून मुंबईला संघर्ष करत आहेत. त्यातलेच हे दोन महाभाग जे युट्युबवर टू फॉरेनर्स इन बॉलीवूड नावाने व्हिडिओ बनवतात. हे दोघं भारतात कसे आले आणि शिव्या देऊन व्हिडिओ बनवायची आयडिया कुठून आली हे सगळं गंमतीशीर आहे.

हिंदी फिल्म किंवा मनोरंजन क्षेत्रात करियरसाठी परदेशातून येणार्‍या कलाकारांमध्ये प्रामुख्याने डान्सर्स आणि त्यातही बहुतेक मुलींचाच समावेश असतो. दुनिया इकडची तिकडं झाली तरी आपल्याला गोऱ्या थोबाडाचं भलतंच आकर्षण. त्यामुळे चित्रपटात नावाला का होईना बिनकामाचे पांढरे चेहरे दिग्दर्शक दाखवत असतात. पण टू फॉरेनर्स इन बॉलीवूड मधले दोघे मात्र भारतात आले ते हिंदी चित्रपटाच्या प्रेमापोटी. हॅम्पस बर्गक्विस्ट आणि जोहान बार्टोली असं या दोघांचं नाव. दोघंही स्वीडनचे. टू फॉरिनर्स इन बॉलिवूडचा उल्लेख केल्यानंतरही हे दोन चेहरे ज्यांना आठवत नसतील तर ते सोशल मिडियाच्या विश्वात अजून मागेच आहेत, असे म्हणता येईल.

दोघांची नावे १०० टक्के लोकांसाठी ओळखीची नसणार यात शंकाच नाही. वयाच्या तिशीच्या आतील हॅम्पस आणि जोहान यांचे संपूर्ण बालपण युरोपमधील स्वीडन या अतिशय समृध्द देशात गेले. लहानपणापासूनच घनिष्ठ मैत्री असणार्‍या या दोघांनाही हिंदी मनोरंजन क्षेत्राविषयी भयंकर आकर्षण ! विदेशी प्रेक्षकांना हिंदी चित्रपट आवडतेत हे काय फार विशेष राहिलं नाही पण या दोघांची आवड सामान्य नव्हती. हिंदी चित्रपट समजावे म्हणून या दोघांनी चक्क हिंदी भाषा शिकायला सुरुवात केली. पुढे बिझनेस मॅनेजमेंटची पदवी पूर्ण केल्यानंतरही त्यांची आवड कमी झाली नाही आणि त्यांनी आपले करियर मुंबईत मनोरंज क्षेत्रातच घडवण्याचा निश्चय केला. २०१५ साली हे दोघेही मुंबईतील खडतर विश्वात आपली आवड जोपासण्यासाठी आणि करियर घडवण्यासाठी आले.

आधीच सांगितलं तसं बॉलिवूडला फिरंगी गोर्‍या चेहर्‍यांचे नेहमीच आकर्षण असते त्यामुळे शाहिद कपूरच्या रंगून,अक्षयच्या रुस्तम आणि रितेश देशमुख सोबत बँजो अशा चित्रपटांमध्ये त्यांना किरकोळ का होईना पण लगेच ब्रेक मिळाला. त्याचवेळी त्यांना सोशल मिडियाची ताकद लक्षात आली होती. त्यांनी आपल्या सेन्स ऑफ ह्यूमरचा वापर करुन लहान लहान कॉमेडी व्हिडिओज तयार करुन यूटयूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यास सुुरुवात केली. अस्सल भारतीय प्रेक्षकांना परदेशी कलाकार हिंदी भाषेतून कॉमेडी करताना पाहण्याची सवय नसते. त्यामुळे या जोडीच्या अफलातून कॉमेडी टायमिंगकडे सोशल मिडिया युजर्सचे लगेचच लक्ष वेधले गेले.

परदेशातून भारतात प्रथमच आलेले दोन तरुण मुंबईतील गर्दीचा रस्ता किती मुश्कीलीने क्रॉस करतात या आशयाचा केवळ दीड मिनिटाचा पहिला व्हिडिओ त्यांनी बनवला. त्याला त्यांनी टू फॉरिनर्स इन बॉलिवूड हे नाव दिले होते. या पहिल्याच व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले. त्यानंतर त्यांनी आपल्या यूटयूब, फेसबुक आणि इन्स्टाग्राम चॅनेलला टू फॉरिनर्स इन बॉलिवूड असेच नाव देउन मोडक्या तोडक्या हिंदी भाषेतील आणि मुंबईत येत असणार्‍या अनुभवांविषयी लोकांना खळखळून हसवणारे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी विधान प्रताप सिंग या गुणी कलाकाराला सोबत घेउन सरासरी 8 ते 10 मिनिट कालावधीचे कॉमेडी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. या तिघांच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत गेला. हॅम्पस, जोहान आणि विधानकडून बनवण्यात येणार्‍या व्हिडिओजमध्ये अनेकवेळा अस्सल देशी शिवराळ भाषा वापरली जाते. परंतु ही भाषा आपल्या दैनंदिन जीवनाचा भागच असल्यामुळे त्यांच्या फॅन्सना ती अजिबात आक्षेपार्ह वाटत नाही.

आज टू फॉरिनर्स इन बॉलिवूडचे यूटयूब, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एकत्रितपणे जवळपास ५० लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यामुळे हॅम्पस, जोहान आणि विधान त्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करीत असतात. हॅम्पस, जोहान हे मुंबईतील धकाधकीला आता चांगलेच सरावले असून टू फॉरिनर्स इन बॉलिवूडबरोबरच बॉलिवूडमधील करियरविषयीही ते सकारात्मक आहेत. भविष्यात भारत हीच कर्मभूमी राहील, असा विश्वास ते व्यक्त करतात. मुंबईत आयुष्य स्थिरवल्यांनंतर आता बाहेर कुठे जायची इच्छा नाही असं ते बोलतात.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.