सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

पुण्यातील ट्रम्प टॉवर खरंच डोनाल्ड ट्रम्पचा आहे का ?

owner-of-pune-trump-tower

शनिवार वाड्यात रात्री बारा वाजता आवाज येतो ‘काका मला वाचवा’ आणि ट्रम्प टॉवर हा डोनाल्ड ट्रम्पचा आहे. हे पुण्यात येऊन ऐकलं नसेल तर पुणेकर तुम्हाला पुण्याच्या बाहेर हाकलून द्यायला कमी करणार नाहीत. ‘जगात जे काही भारी आहे ते फक्त पुण्यात’ हे मान्य करणे म्हणजे पुण्याचा नागरिक होण्यासाठी पहिली अट पूर्ण झाली. पुण्याचं नागरिक झाल्यांनतर पुढची अट आहे कि आधी अफवांना नंतर पुणेरी म्हाताऱ्यांना मान द्यावाच लागतो. पुण्यात जे दिसलं ते नवल मानावं लागतं. आमच्या एका मित्रानं तर गोव्यात जाऊ म्हणून कोरेगाव पार्कात फिरायला आणलं. कोरेगाव पार्क दहा मिनिटात दाखवून झाला आणि पुण्यात विशेष काही राहतंय का नाही म्हणून इकडं तिकडं नजर टाकायला लागला. कोरेगाव पार्कची नशा उतरलं म्हणून घाई-घाईत म्हणाला, ‘ट्रम्प टॉवर बघितला का?’ नाही म्हणल्याशिवाय पर्याय नव्हता नाहीतर त्याची उत्सुकता कमी झाली असती. पुढं काय सांगायचं मटेरियल तयारच होतं. ‘काय लका पुण्यात असून तुला माहित नाही. अमेरिकेचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी बांधलाय तो टॉवर.’ अख्ख्या भारतातील एक नंबर बिल्डिंग होणार…’ असं लय काय काय सांगू सांगला. मला पटतंय का नाही अंदाज घेऊन थेट बिल्डिंग दाखवायला घेऊन गेला. ट्रम्पच नाव बघितल्यावर कोणाला पण वाटणार डोनाल्ड ट्रम्पची ही बिल्डिंग आहे. पण शंका घेणाऱ्या मनानं थोडा ठाव घेतला तर वेगळीच माहिती समोर आली.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष नंतर त्याआधी व्यावसायिक आहेत. व्यावसायिक तोही असा तसा नाही तर जगभरात याचा बोलबाला आहे. इराण असू किंवा सौदी डोनाल्डचे टॉवर सगळीकडे उभे असतातच. अमेरिका ज्या देशांना दुष्मन मानतो त्या देशात तर साहेबांची विशेष मालमत्ता असते. रिअल इस्टेट हा त्याचा मुख्य व्यवसाय. हॉटेल, पब या क्षेत्रात पण त्याने हात मारला आहे. ५०० पेक्षा जास्त कंपन्यांचा तो मालक आहे. यावरून त्याच्या संपत्तीचा अंदाज घ्या. डोनाल्ड हा पक्का व्यवसायिक आहे तो फायदा दिसला तर भारतात का नाही गुंतवणूक करणार? मग पुण्यात ट्रम्प टॉवर दिसला तर विशेष काय त्यात ? पण तसं नाही थोडं थांबा ट्रम्प टॉवरला नाव डोनाल्ड ट्रम्पच आहे पण गुंतवणूंक ट्रम्पची नाही. हे असं कसं काय, प्रश्न पडला असेल तर थोडं डिप जाऊ.

पुण्यातील कल्याणी नगर इथे दिमाखात उभा असणारा ट्रम्प टॉवर हा डोनाल्ड ट्रम्पच्या मालकीचा नाही. ट्रम्पने यात गुंतवणूक केली नाही मग तरीही याला ट्रम्प टॉवर हे नाव का दिलं हा प्रश्न उरतोच. पंचशील रिअल्टी या रिअल इस्टेट कंपनीचे सर्वेसर्वा अतुल चोरडिया हे पुण्यातील ट्रम्प टॉवरचे मालक आहेत. रिअल इस्टेट परवाना अंतर्गत डोनाल्ड ट्रम्प ऑर्गनायझेशन या कंपनीकडून अतुल चोरडिया यांनी ट्रम्प टॉवर हे नाव वापरण्याचा अधिकृत परवाना घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्पने नाव वापरण्यास परवानगी दिली असली तरी या प्रकल्पात कोणतीही गुंतवणूक अथवा हा प्रकल्प विकसित केला नाही. याच धर्तीवर मुंबईत लोढा डेव्हलपर्स यांनी ट्रम्प टॉवर बांधला आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या कंपनीला यामुळे ठरविक रॉयल्टी मिळाली असणार हे नक्की. म्हणूनच डोनाल्ड ट्रम्पचा मुलगा पुण्यातील ट्रम्प टॉवरच्या उदघाटनाला आला होता. सुरुवातीच्या काही जणांना डोनाल्डच्या मुलाच्या हस्ते फ्लॅटचे वितरण केले गेले. २३ मजली या इमारतीत केवळ ४६ फ्लॅट आहेत. एक फ्लॅटची किंमत पंधरा कोटींपेक्षा जास्त आहे. विकत नाय पण भाड्याने घेऊ म्हणलं तरी पाच लाख रुपये महिना भाडं आहे. गरीब सोडा उच्च मध्यमवर्गीय सुद्धा इकडे फिरकत नाही. दोन टाइम सुखाचं खातोय यात समाधान मानणारे ट्रम्प टॉवरकडे सहलीला आल्यासारखे बघत बसतात. अतिश्रीमंत सेलिब्रिटी आणि व्यावसायिक यांच्यासाठी फक्त ही इमारत आहे. बॉलीवूडमधील ऋषी कपूर आणि रणबीर कपूर या बापलेकांनी ट्रम्प टॉवर मध्ये फ्लॅट घेतले आहेत. कल्याणी नगरमध्ये असणाऱ्या एवढ्याच आकाराच्या बिल्डिंगपेक्षा ट्रम्प टॉवरची किंमत कैक पटीने जास्त आहे.

जागेत गैरव्यवहार झाला म्हणून काही तक्रारी आल्या होत्या. सुप्रिया सुळे यांचं पण नाव जोडलं गेलं. पण काही उपयोग झाला नाही. दिमाखदार टॉवर समोर हे असले शुल्लक प्रश्न जास्त काळ काय टिकणार?

हे पण वाचा

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.