इन्स्टा, फेसबुक आणि युट्युबवर कॉन्टेन्ट कुणाचा चांगला यात हाणामारी असताना एकाने पोस्ट-व्हिडिओ करायची भानगड केलीच नाही. तो अशा मार्केट मध्ये उतरला जिथं स्पर्धा नाही. तरी पण हा गडी मोठ्या युटूबर किंवा रील स्टार काय करता इतका फेमस झालाय. हा एकच काम करतो प्रत्येक पोस्टखाली आणि व्हिडिओ खाली अशी कंमेंट मारतो कि त्याची कंमेंटच व्हायरल होते. कमेंट करून फेमस होणारा तो जगातील एकमेव माणूस असेल. पण अजून कळलं नाही कि हा नेमका आहे कोण. फोटो वरून पुरुष असावा एवढा अंदाज येतोय पण Xavier हे नाव खरं खोटं काही कळत नाही. याचा शोध घ्यावा म्हणलं तर अशी माहिती समोर आली. .
जुलै २०१३ मध्ये एका युजरने ‘पकालु पपितो’ या नावाने एक ट्वीटर अकाउंट सुरु केले. त्याच्यावर तो दररोज काहीतरी मजेशीर ट्वीट्स पोस्ट करायचा. ते ट्वीट्स लहान पण विनोदी असायचे. अल्पावधीतच ते विनोदी ट्वीट्स जगभर वायरल झाले. त्याला लोकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळाला. विनोदी ट्वीटबरोबरच एक विनोदी चेहरा आणि एक विचित्र नाव या गोष्टी सुद्धा लोकांना खुप आवडल्या. पुढील काही महिन्यांमध्ये त्याने फेसबुक पेज सुरु केलं. तिथे त्याने ट्वीटरवरचे ट्वीट्स रिअपलोड केले. तिथेही तो खुप प्रसिद्ध झाला.
बघताबघता त्याच्या पेजची फॅन फाॅलोविंग वाढली. पुढच्या दोन वर्षात त्याचे ट्वीटरवर ८ लाख तर फेसबुकवर ५ लाख फाॅलोवर्स झाले. २०१५ पासुन त्याची प्रसिद्धी आणखीनच वाढली पण दुर्दैवाने २०१८ मध्ये त्याचे दोन्हीही अकांउट्स फेसबुक ट्वीटरने बंद करुन टाकले आणि ‘पकालु पपितो’ चा प्रवास तिथेच संपला.
पण इंटरनेटवर प्रसिद्ध झालेली कोणतीही गोष्ट कायमस्वरुपी संपत नाही. त्याच्या ट्वीट्सचे स्क्रीन शॉट्स वायरल झाले. त्याचे अकाउंट डिलीट झाल्याचा फायदा इतरांनी घेतला. अनेक फेसबुक अकांउट्सनी त्याच्या विनोदी कमेंट्स त्याच्याच नावाने पुन्हा पोस्ट केल्या. ‘पकालु पपितो’, ‘जेविअर’ अशा नावांनी अनेक फेक अकांउट्स मीमर्स लोकांनी तयार केले. त्यांच्याच कमेंट्स सध्या आपण वायरल होताना पाहत आहोत.
सध्या ट्वीटरवर ‘पकालु पपिताॅ’ तसेच xavier official नावाने दोन मोठे अकाउंट्स आहेत, ज्यांचे अनुक्रमे तीन लाख आणि अडीच लाख फाॅलोवर्स आहेत. फेसबुक वर सुद्धा अकाउंट आहे ज्याचे १३ लाख फॉलोवर्स आहेत. पण हे अकांउट नक्की पहिल्या ‘पकालु पपितो’ चेच आहेत का नाही हे स्पष्ट नाही, कारण त्याच्या अकाउंट बॅन नंतर आता त्याच्या नावाने हजारो अकांउट्स बनलेले आहेत आणि सगळेच जण काहीतरी विनोदी कमेंट्स करत असतात, ज्या खुप वायरल होतात. प्रत्येक पेजच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला नवीन ‘झेविअर’ सापडेल. त्यामुळे या सर्वांमधुन खरा ‘पकालु पपितो’ शोधणे आता अशक्य आहे. कदाचित असही असु शकतं की ख-या युजरने सोशल मिडीया केव्हाच सोडला असेल.
झेविअरचे वैशिष्ट्य म्हणजे तो कोणतीही पोस्ट पाहिल्यावर त्या पोस्टच्या विषयाविषयी कमेंटमध्ये असा एखादा मुद्दा मांडतो ,ज्याचा विचार आपण ती पोस्ट प्रथमदर्शी पाहताना केलेला नसतो. एखाद्या चित्रातील आपल्या लक्षात अली नाही अशी बाब तो शोधतो आणि त्याच्या विनोदी शैलीत व्यक्त होतो. काही जणांनी त्याच नाव वापरलं असलं तरी त्याच्या कलेची नक्कल त्यांना करता आली नाही. तो कोण आहे ठोस सांगणे अवघड आहे. काही लोकांनी त्याच्या फेसबुकवर मेसेज करून त्याला माहिती विचारली पण त्याची उत्तरे तिथे पण विनोदी होती. हा विषय पुढेच जाण्यासारखं नाही असं दिसलं. खरा Xavier भविष्यात सापडेल कि नाही माहित नाही पण त्याच्या कॉमेंट वाचून भविष्यात पण मजा येईल हे नक्की.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?