‘रणशिंग फुंकले तू जाळण्या गुलामी, या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी…’ प्रल्हाद शिंदेंनी म्हटलेलं हे गाणं आठवलं कि रोमांच उभा राहतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसाठी निळा रंग हा आंबेडकरी चळवळीसाठी समानार्थी शब्दच वाटतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या पक्षांनी तर त्यांच्या झेंड्यात सुद्धा निळा रंग घेतला आहे. पण राजकीय पक्षाशी निगडित नसलेले डॉ. आंबेडकरांचे अनुनायी देखील ‘निळा रंग’ हा डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या विचारांचे प्रतीकच मानतात. त्यामळे बाबासाहेबानी निळा रंग का निवडला आणि आंबेडकरी संघटना केव्हापासून निळा रंग वापरत आहेत याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. त्याचाच घेतलेला आढावा
दलित संघटनांमध्ये निळा रंग कुठून आला ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षाचा निळा रंग होता. समता सैनिक दलाची स्थापना 1927 मध्ये झाली होती. समता सैनिक दलाच्या टोप्या देखील निळ्याच होत्या. आज देखील समता सैनिक दलाच्या टोप्या आपण पाहिल्या तर त्या निळ्याच आहेत. समता सैनिक दलामधूनच निळा रंग पुढे झाला.
झेंड्याचा रंग निळाच का कसा पुढे आला ?
1936 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणजेच स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. मुंबई काउन्सिलच्या निवडणुकीत डॉ. आंबेडकर उभे राहिले होते तेव्हा त्यांचे चिन्ह ‘माणूस’ हे होते. नंतर त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशनची (शेकाफे) स्थापना केली. शेड्युल कास्ट फेडरेशनचे निवडणूक चिन्ह हत्ती होते, तर झेंडा निळा होता. ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशनची जी घटना (Constitution) आहे त्या घटनेच्या 11 व्या भागात झेंडा कसा असेल याचा उल्लेख करण्यात आला आहे.
फेडरेशनच्या ध्वज म्हणजे ‘त्रिकोणी आकाराच्या निळ्या कपड्यावर तारे असतील.’ 30 जानेवारी 1944 रोजी कानपूर येथे समता सैनिक दलाची परिषद झाली होती. डॉ. आंबेडकर देखील या परिषदेला उपस्थित होते. त्यांच्यासमोर काही ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले. त्यापैकी एक ठराव समता सैनिक दलाच्या घटनेबाबत होता. या घटनेचा मसुदा आंबेडकरांकडे पाठवण्यात आला होता आणि त्यांची मान्यता मिळाल्यावर समता सैनिक दलाची घटना लागू करण्यात आली होती. या घटनेमध्ये समता सैनिक दलाचा ध्वज कसा असेल याचा उल्लेख करण्यात आला आहे.
‘समता सैनिक दलाच्या ध्वजाची लांबी चार फूट आणि रुंदी अडीच फूट असेल. पूर्ण ध्वज गडद निळ्या रंगाचा असेल, ध्वजाच्या वरील डाव्या बाजूला 11 तारे पांढऱ्या रंगात असतील.’ ‘ध्वजाच्या मधोमध पांढऱ्या रंगात सूर्य असेल. त्याच्या खाली SCF ही अक्षरे असतील. खालील उजव्या बाजूला SSD ही अक्षरे असतील.’ ‘या ध्वजाचा अर्थ आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करणे,’ असे समता सैनिक दलाच्या घटनेत लिहिले आहे.
पुढील काळात आंबेडकरांनी आपली राजकीय भूमिका अधिक सर्वांसमोर मांडली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घोषणा केली. ‘रिपब्लिकन पक्ष वास्तव आणि वाटचाल’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. शरण कुमार लिंबाळे यांनी लिहले आहे कि “समविचारी लोकांनी एकत्र येऊन जातिजमातींच्या पलीकडे जाऊन शोषितांचे राजकारण करण्यासाठी एक नवा पक्ष स्थापन करण्याची बाबासाहेबांना गरज वाटू लागली. या उद्देशानेच बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती.” पार्टीची घटना, ध्येय धोरणे, पुढील वाटचाल याविषयीची ब्लू प्रिंटच त्यांनी तयार केली होती. पण ही पार्टी तयार होण्याआधीच त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. 3 ऑक्टोबर 1957 रोजी त्यांच्या सहकाऱ्यांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी दिलेला निळा रंग कायम ठेवण्यात आला.
राजकारणात प्रतीकांना महत्त्व आहे असते
राजकारणात प्रतीकांना महत्त्व आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना याची जाणीव होती, म्हणूनच त्यांनी विचारपूर्वक झेंडा तयार केला. “प्रतीकांबरोबरच आंबेडकरांनी व्यवहाराच्या दृष्टिकोनातूनही या रंगाची निवड केली असू शकते. “शेकाफे स्थापन होण्याआधी हिंदुत्ववाद्यांकडे भगवा होता, कम्युनिस्टांकडे लाल होता, मुस्लिम लीगकडे हिरवा, मग सात रंगांपैकी कोणता निळा हा पर्याय त्यांच्यासमोर होता. निळा रंग ठळक उठून दिसतो आणि तो रंग जर पार्श्वभूमीवर असेल तर इतर रंगही उठून दिसतात हा एक विचार त्यामागे असू शकतो.
निळ्या रंगाबद्दल असं म्हटलं जातं की ‘इट्स ए नेचर नॉट अ कलर’. म्हणजेच निळ्या रंगाशिवाय निसर्गाला पूर्णत्वच येऊ शकत नाही. समुद्र आणि आकाश या दोन्ही गोष्टी निळ्या आहेत. त्या सर्वत्र आहेत. आकाश सोडून काहीच नाही तसंच सागर सोडूनही काहीच नाही. हा विचार त्यामागे बाबासाहेबांनी केलेला असू शकतो. असं आंबेडकरांच्या जीवनाचा अभ्यास करणारे अभ्यासक म्हणतात.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?