सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

नव्वदीचा सुपरस्टार गोविंदा आजच्या काळात का मागे पडला ?

Why did Govinda career fail?

हृतिक रोशनचा ‘कहो ना प्यार है’ आला होता. ‘एक पल का जिना’ गाण्यावर शाळेत डान्स स्टेप करून बघत होतो. सगळीकडे हृतिकच्या डान्सची चर्चा होती. तेवढ्यात एक जण म्हणाला, “कितीबी हिरो येऊ दे गोविंदा सारखा डान्स त्याला जमत नसतो.” मग काय हृतिक वरून सगळं वारं परत गोविंदाकडे फिरलं. हृतिकचा विषय कट झाला आणि गोविंदा कसला भारी हिरो आहे यावर गप्पा सुरु झाल्या. चौथी पाचवीत असणारे आम्ही एकदम तज्ञ् झाल्यासारखे गोविंदाची बाजू उचलून धरू लागलो. गोविंदाला न्याय दिल्याचं समाधान काय सांगावं किती भारी वाटत होतं. पण अचानक काय झालं काय माहिती हळूहळू गोविंदाच्या चर्चा कमी व्हायला लागल्या. गोविंदाचा नवीन कोणता पिक्चर येतोय यावर कोणी काही बोलताना दिसेना. दहावी बारावी नंतर शिक्षणासाठी गावं बदलत गेली. याकाळात जास्त काय पिक्चर बघायला मिळाले नाही. नंतर इंजिनियरिंगला आल्यावर पिक्चर बघायचा एकदम सपाटाच लावला. वेगवेगळ्या चित्रपटांवर चर्चा, गप्पा रंगायला लागल्या. सलमान, शाहरुख पासून जगभरातल्या सगळ्या हिरोंची पारायण केली. तेव्हा सहज आठवलं लहानपणी एकट्या गोविंदाच्या गप्पा मारून दिवस दिवस संपवले आज तो गोविंदा एकदम चर्चेच्या बाहेर कसं काय गेला?

‘हिरो नंबर वन’ गोविंदा कोणतातरी नंबर वन घेऊन मनोरंजन घेऊन यायचा. एस टी स्टॅण्डवर फिरणारा हमाल गोविंदा मुळे ‘कूलीं नंबर वन’ वाटायला लागला. जिगरी दोस्तांसोबत फिरताना त्याचा ‘जोडी नंबर वन’ आठवायचा. प्रत्येक सिनेमात गोविंदा बघताना एक वेगळीच मजा असायची. सुरुवातीला ऍक्शन हिरो म्हणून गोविंदा चित्रपटात आला होता. पण त्याला खरी ओळख मिळाली ‘शोला और शबनम’ पासून. विनोदाला ऍक्शनचा तडका देऊन गोविंदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होता. नंतर त्याच्या कॉमेडी टाइमिंगचे तर इतके दिवाने झाले कि कॉमेडी ही गोविंदाची मक्तेदारी झाली. त्या काळात फक्त कॉमेडी चित्रपट बनवले जात नसत. मुख्य चित्रपटात थोडी फार कॉमेडी असायची. त्यामुळे कॉमेडी अभिनेते चित्रपटाचे मुख्य नायक नसायचे. गोविंदाने हे सगळे प्रस्थपित नियम मोडले. खास कॉमेडी चित्रपट बघायला प्रेक्षक गर्दी करायला लागले. गोविंदा भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध लोकांपैकी एक झाला होता. नव्वदीच्या काळात गोविंदा यशाच्या सर्वोच्च शिखरावर होता. २००० साल येईपर्यंत गोविंदाची प्रसिद्धी कायम होती. पण यांनतर त्याच्या फिल्मी करिअरला ग्रहण लागले. हळूहळू गोविंदाबद्दल थोड्या तक्रारी वाढू लागल्या. गोविंदाला यशाचा अहंकार जडला. चित्रपटात हिरो म्हणून वावरणारा गोविंदा वास्तवात हिरोसारखा जगायला लागला. माझ्याशिवाय पान हलू शकत नाही या तोऱ्यात गोविंदा दिग्दर्शकांशी वाद घालायला लागला. डेव्हिड धवन आणि गोविंदा या जोडीने सतरा चित्रपट एकत्र केले आहेत. डेव्हिड धवनने गोविंदासाठी एक से बढकर एक चित्रपट बनवले. पण दुर्दैवाने गोविंदा आणि डेव्हिड धवन यांचा वाद सुरु झाला. डेव्हिड धवनच्या एका चित्रपटात गोविंदाला तो असणार ही अपेक्षा होती पण डेव्हिड धवनने ऋषी कपूरला घेऊन हा चित्रपट केला. गोविंदाने काही काळ डेव्हिडशी संपर्क तोडला. त्यांनतर काही महिन्यांनी गोविंदाने पुन्हा संपर्क केला पण काही उपयोग झाला नाही. यानंतर दोघातील वाद इतका वाढला कि पुढचे काही वर्ष ते एकमेकांशी बोलले नाही. डेव्हिड धवन गोविंदासाठी हिट मशिन होता. गोविंदाच्या आयुष्यात असंच अजून एक वळण आलं ज्यामुळे गोविंदा चित्रपटांपासून दूर गेला.

भाजपच्या दिग्गज उमेदवाराला गोविंदाने हरवले

२००४ ला गोविंदाने काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारी केली. दिग्गज भाजपचे नेते गोविंदाच्या विरोधात होते. लोकांनी गोविंदाला खरा हिरो समजून मतं दिली. राम नाईक यांचं काम चांगलं असूनही ते हरले. गोविंदा खासदार झाला. यानंतर गोविंदाने काय विचार केला काय माहित पण तो चित्रपटांपासून जास्तच दूर गेला. चित्रपटांपासून दूर गेलेला गोविंदा राजकारणात काही तरी कमाल करेल असं वाटलं होतं. गोविंदा संसदेच्या एकही अधिवेशनाला हजर राहिला नाही. पूर्ण पाच वर्षे गोंविंदा मतदारसंघाकडे फिरकला पण नाही. गोविंदाने यानंतर मात्र ‘आता राजकारण बंद’ ही भूमिका घेतली. त्याने चित्रपटांकडे पूर्ण लक्ष केंद्रित केलं.

२००६ ला भागम भाग चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला हिट ठरला. यानंतर सलाम ए इष्क मात्र फ्लॉप ठरला. २००७ ला आलेला पार्टनर मात्र चांगला चालला. पार्टनर नंतर गोविंदाला अजूनही लय सापडली नाही. गोविंदा खूप साऱ्या चित्रपटात झळकला पण कमाल दाखवू शकला नाही, जवळपास सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरले. २००६ नंतर गोविंदाने मुख्य भूमिकेत असणारेच चित्रपट करणार अशा काही अटी टाकल्या होत्या त्यामुळे सुद्धा गोविंदाला खूप नुकसान झालं. ज्या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत होता ते चित्रपट नव्वदीत येणाऱ्या चित्रपटांसारखे बनवले गेले. प्रेक्षक अशा चित्रपटांच्या पुढे गेला आहे हे गोविंदाच्या लक्षातच आले नाही. थोडं उशिरा काही गोष्टी समजल्या पण तोपर्यंत गोविंदाचा करिष्मा गेला होता.

गोविंदा निश्चितच चांगला अभिनेता आहे. त्याच्या अभिनय कौशल्यावर कुणी शंका घेणार नाही. चित्रपटाच्या बाहेर आपण साधी माणसं आहोत हे त्याने मान्य केलं असतं तर गोविंदा चित्रपटात आणि वास्तवात सुपरस्टार कायम राहिला असता. यशाच्या शिखरावर असताना अनेक दिग्दर्शक गोविंदाच्या मागे लागायचे. असं म्हणतात एका दिवसात गोविंदाने सत्तर पिक्चरच्या ऑफर स्वीकारल्या होत्या. असा हा मेगा स्टार अभिनेता पुढच्या काळात एका चांगल्या चित्रपटासाठी वाट बघत राहिला. यासाठी स्वतः गोविंदा जबाबदार आहे. गोविंदाने स्वीकारलेल्या चित्रपटांच्या शूटिंगला गोविंदा नंतरच्या काळात उशिरा जायला लागला. वेळेवर न येणारा अभिनेता आहि गोविंदाची ख्याती बनत चालली होती. चित्रपटाच्या प्रत्येक विभागात त्याची ढवळाढवळ करणे वाढले यामुळे दिग्दर्शक आणि निर्मात्यांना गोविंदासोबत काम करणे अवघड जाऊ लागले. गोविंदाच्या कित्येक चित्रपटांची शूटिंग सुरु तर झाली पण पूर्ण होऊ शकली नाही. अनेक चांगले चित्रपट त्याने अर्ध्यात सोडले. स्वयंकेंद्रित लोकांना स्वतःच्या मर्जीने जगायला आवडतं. तिघमांशू धुलिया या दिग्दर्शकाचं स्वप्न होतं कि आयुष्यात एकदा तरी गोविंदा सोबत काम करायचं. गोविंदाला समोर ठेऊन त्याने तशी पटकथा लिहिली. गोविंदाशी बोलून चित्रपट शूटिंग सुरु करायचं ठरवलं. लंडन मध्ये शूटिंगसाठी तिघमांशू पुढे गेला. गोविंदा ठरलेल्या वेळेपेक्षा पंधरा दिवस उशिरा पोहचला. उशिरा आला तर आला पण लगेच पंधरा दिवसात निघाला. अशा चंचल स्वभावामुढे चांगला दिग्दर्शक कसं काम करणार? हा तोच दिग्दर्शक आहे ज्याने पण सिंग तौमर, साहेब बीवी और गँगस्टर असे चांगले चित्रपट दिले.

हॉलिवूडच्या अवतार चित्रपटाला नाव सुचवलं म्हणून ट्रोल झाला होता

गोविंदा चित्रपटांपेक्षा बाहेर जास्त चर्चेत राहिला लागला. आप कि अदालत कार्यक्रमात गोविंदाने अवतार सिनेमासाठी त्याला विचारलं होतं असं बोलला. एवढंच बोलून थांबला नाही वरून म्हणाला, ‘अवतार चित्रपटाचं नाव मीच सुचवलं. अंगाला रंग लावून शूटिंग करणे जमणार नाही म्हणून चित्रपट नाकारला.’ यामुळे गोविंदा असा ट्रोल झाला कि विचारू नका. असं बोलून गोविंदा स्वतःच हसं करून घेत होता. गोविंदाला कोणी संपवलं असा आरोप करण्यात काही अर्थ नाही. त्याचा बदलेला स्वभाव आणि कामातील बेशिस्तपणा त्याला मागे खेचून गेला. काही काही बातम्या अशा पण आल्या होत्या कि गोविंदा बाबा-बुवा यांच्या नादी लागला होता. गोविंदा तसा खूप धार्मिक आहे. हे बाकी काही असलं तरी कामात सात्यत त्याला राखता आलं नाही. आप कि अदालत याच कार्यक्रमात अक्षय कुमार म्हणाला होता कि मला काम मिळणं कधीच अवघड गेलं नाही. अभिनेता चांगला आहे म्हणून काम मिळाली असं नाही तर दिलेली वेळ पाळली म्हणून निर्मात्यांनी अक्षयवर जास्त विश्वास दाखवला. एखाद्या कामातील हुशारी कमी जास्त चालून जाऊ शकतं पण कामात हयगय केलेली चालणार नाही हे यावरून सिद्ध होतं. चित्रपटाच्या रंगीत दुनियेत प्रेक्षकांना सतत नवीन काही तरी द्यावं लागतं. नवीन येणारे अभिनेते यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. नवीन आणि जुन्या अभिनेत्यांना स्पर्धेची सतत भीती असते या भीतीखाली ते नवीन काही तरी देण्याचा प्रयत्न करतात. गोविंदाला बदलती चित्रपट शृष्टी समजायला वेळ लागला तोपर्यंत खूप वेळ निघून गेला होता.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.