सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

डिस्को डान्सर चित्रपटामुळे मिथुनचे रशियात सुद्धा कट्टर फॅन झाले होते

why-mithun-is-famous-in-russia

एका बुक्कीत मिथुन लोखंडाच्या जाडजूड कढईला भोक पाडायचा. एवढंच काय गेम खेळायच्या रिमोटने मिथुनदा व्हिलनची लंका पेटवायचा. हे तर काहीच नाही सायकलचा आडोसा धरून मिथुन सगळ्या दुष्मनांचा गोळीबार रोखायचा. बुलेटप्रुफ काचा दगडाने तोडायचा. असा मिथुनचा विषयच लय वेगळा होता. आता हे सगळं बघून हसायला येत असलं तरी त्यावेळच्या प्रेक्षकांना मिथुनसारखा ऍक्शन हिरो पाहिजेच होता. त्यावेळच्या जनतेला मिथुनदाने भरभरून मनोरंजन दिलं. फक्त भारतात मिथुनचे फॅन पहिले असतील तर काही विशेष नाही. खरं वाटणार नाही पण मिथुनचे फॅन रशियात एवढे होते कि मिथुन जेव्हा रशियाला जायचा तेव्हा तिथल्या महिला त्याला गराडा घालायच्या. मिथुनचे हे फोटो इंटरनेटवर सहज बघायला मिळतील. इथून तिथून मिथुनने हा चमत्कार केला कसा यासाठी मिथुनची स्टोरी एकदा वाचायलाच पाहिजे.

बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती जो आजच्या काळातील प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. तारुण्यात सुपरस्टार असलेला मिथुन आजही अभिनयात सक्रिय आहे. नुकताच आलेला काश्मीर फाईल मध्ये मिथुनची भूमिका महत्वाची होती. मिथुनने जे काही यश मिळवलं ते सोपं नव्हतं. अतिशय संघर्षांतून मिथुनने अभिनयाची सुरुवात केली होती. 16 जून 1950 रोजी जन्मलेला मिथुन पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथील रहिवाशी आहे. रसायनशास्त्रात शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून शिक्षण घेतले आणि पदवी प्राप्त केली. मिथुन चक्रवर्ती आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात नक्षलवादाशी संबंधित होते, पण भावाच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांनी नक्षलवादाचा मार्ग सोडून पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर चित्रपटांमध्ये नशीब आजमावले

मिथुनचं सुरुवातीचं नाव गौरांग चक्रवर्ती होतं. सिनेमात काम करण्यासाठी मुंबईला आला आणि मिथुन याच नावाने ओळख मिळाली. मुंबईत येण्या अगोदर बंगाली काही सिनेमात काम मिळालं पण कोणत्याच चित्रपटाला विशेष यश मिळालं नाही. मुंबई सगळ्यांना मार्ग देते म्हणतात म्हणून मिथुनने मुंबई गाठली. एकदम चित्रपटात कोण काम देईल हा मोठा प्रश्न होता. कुणी गॉडफादर नाही. काही ओळख नाही. तरीही प्रयत्न करून एखादा दिग्दर्शक भेटला तर चेहरे पट्टीमुळे मिथुनला नाकारत होते. अशा परिस्थितीत मुंबईची मायानगरी स्वप्न दाखवायची कमी करत नव्हती. सुरुवातीला मुंबईत राहायची सोय नव्हती म्हणून मिथुन पाण्याच्या टाकीवर झोपायचा. पाण्याच्या टाकीकडे वॉचमनच लक्ष जात नाही तोपर्यंत पाण्याची टाकी हेच राहण्याचं ठिकाण. ध्येय पक्क असलं कि हे दिवस पण निघून जातात. शेवटी ती संधी आलीच आणि मिथुनला पहिला ब्रेक मिळाला.

मृणाल सेन यांनी ‘मृगया’ (1976) चित्रपटासाठी मिथुनला ऑफर दिली. मिथुन बंगालमधील एका तरुण आदिवासी तरुणाची भूमिका करतो, जो 1930 च्या दशकात एका ब्रिटिश प्रशासकाशी मैत्री करतो. या चित्रपटातील मिथुनच्या प्रभावी कामगिरीने सगळेच प्रभावित झाले. पहिल्याच चित्रपटासाठी मिथुनला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो. यानंतर अपेक्षेप्रमाणे खूप साऱ्या ऑफर येतील अशी अपेक्षा असताना मिथुनला पुढील काही महिने चांगल्या चित्रपटाची ऑफर येतच नाही. मिथुन साठी हा कठीण काळ होता. यानंतर मिथुन कमी बजेटच्या चित्रपटांकडे वळतो. वार्दत, हम पाच हे चित्रपट बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई करतात. बजेट कमी असलं तरी मिथुन आपल्या अभिनयाची छाप सोडत होता. शेवट ती वेळ वेळ आली ज्या चित्रपटामुळे मिथुन भारतात नाही तर रशियात सुद्धा सुपरस्टार ठरला.

१९८२ ला डिस्को डान्सर आला. या चित्रपटामुळे मिथुनची डिस्को किंग ही ओळख निर्माण झाली. बॉलीवूडमध्ये डान्सची वेगळी शैली मिथुनने रुजवली. चित्रपटाने बॉक्स ऑफिस तर गाजवलाच त्याचबरोबर मिथुनला या चित्रपटासाठी अनेक पुरस्कारही मिळाले. त्यावेळच्या USSR (आजचा रशिया ) मध्ये भारतीय चित्रपट चांगले चालत होते. राज कपूर यांच्या मेरा नाम जोकर हा आपल्याकडे फ्लॉप ठरलेला चित्रपट रशियात ब्लॉकबस्टर ठरला. राज कपूर यांना रशियात लोकांमध्ये आणि सरकार मध्ये प्रचंड मान होता. राज कपूर नंतर पुन्हा दुसऱ्या कोणत्या हिरोला हे दिवस पाहायला मिळतील वाटलं नव्हतं. मिथुन ने मात्र डिस्को डान्सरच्या माध्यमातून राज कपूर इतकंच रशियन चाहत्यांचा मनावर राज्य केलं. पाच कोटीपेक्षा जास्त लोकांनी डिस्को डान्सर चित्रपट बघितला. डिस्को डान्सर मधील मिथुन केलेला जिमीची भूमिका सगळ्यांना भावली होती. मिथुन दिसला कि रशियन चाहते तुटून पडत.

‘जिमी जिमी आजा’ गाणं आजही रशियन ऐकतात

जेव्हा रशियाच्या अर्थव्यवस्थेची दु:खद पडझड झाली, तेव्हा त्यांच्या चित्रपट उद्योगाला पुरेसे चित्रपट बनवणे परवडणारे नव्हते. परंतु अशा कठीण काळात, जेव्हा लोकांना चित्रपट पाहून आणि संगीत ऐकून त्यांचे दुःख दूर करण्यासाठी काही मनोरंजनाची आवश्यकता होती तेव्हा पाश्चिमात्य चित्रपटांना रशियात परवानगी नव्हती. साम्यवादी रशिया भांडवली अमेरिकेचे चित्रपट रशियात चालून देत नव्हता. सर चार्ली चॅप्लिन, टॉम अँड जेरी (डब्ल्यूबी), डिस्ने, मार्व्हेलचे सुपर हिरो कॉमिक्स, जपानचे मॉडर्न एरा मंगा ही सर्व रशियात पोहचत नव्हतं. अशा वेळेला रशियामध्ये चित्रपट बनवण्यापेक्षा अनुवाद करणे खूप स्वस्त असल्याने रशियन चित्रपट उद्योगाने भारतीय चित्रपट स्वीकारण्यास सुरुवात केली. त्यामुळेच मिथुन चक्रवर्ती हा त्या काळातील लोकप्रिय तरुण नायक झाला होता. डिस्को डान्सरच्या यशात संगीताची मोठी भूमिका होती. संगीत बप्पीदाने एका वेगळ्या शैलीत दिलं होतं. डिस्को डान्सर मधील जिमी जिमी आजा हे गाणं तेव्हा रशियात जास्तच प्रसिद्ध झालं. आजही ती पिढी हे गाणं आवडीने ऐकत असते.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.