सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

आईला दानधर्म करायला २ कोटी रुपये देणारे यशवंत जाधव कोण आहेत ?

मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान दोन कोटी 50 लाख रुपयांच्या भेटवस्तू ‘मातोश्री’ला दिल्याची नोंद यशवंत जाधव यांच्या डायरीत लिहलेलं ईडीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराचे नाव ‘मातोश्री’ आहे. त्यामुळे या डायरीत असलेला उल्लेख उद्धव ठाकरेंबाबतचा आहे का याची चौकशी ईडी करत आहे. यशवंत जाधव यांच्या चर्चेत थेट ठाकरेंचं नाव आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पण यशवंत जाधव यांनी ‘मातोश्री’ म्हणजे माझी आई असाही खुलासा केला आहे. आईला दान धर्म करण्यासाठी दिले असल्याचं यशवंत जाधव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आईला दिलेल्या पैश्यांची नोंद कोणी ठेवत नसल्यामुळे यशवंत जाधव यांच्यावर ईडी संशय घेत आहे. या सगळ्या प्रकारावर राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यशवंत जाधव यांच्या ईडी चौकशीची मागणी केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे कि ‘अनेकजण आपल्या आईचा उल्लेख मातोश्री असा करतात’. या सर्व प्रकरणात ‘मातोश्री’ च्या उल्लेखामुळे चर्चेत आलेले यशवंत जाधव कोण आहेत ? त्यांचा इतिहास काय आहे, त्याच राजकारण कसं आहे आणि ईडीने त्यांच्या घरावर छापा का टाकला याची आपल्याला माहिती पाहिजे.

यशवंत जाधव यांची राजकीय कारकीर्द

यशवंत कमलाकर जाधव हे शिवसेनेचे उपनेते आहेत. 1978 पासून ते शिवसैनिक आहेत. 1997 साली पहिल्यांदा माझगावमधून मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. 1997 ते 2002 पर्यंत जाधव हे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य होते. 2001 ते 2002 ते प्रभाग समितीचे अध्यक्ष झाले. 2002 मध्ये नगरसेवक पदाची त्यांची संधी हुकली. त्यादरम्यान संघटनेसाठी शिवसेना पक्षाने उपविभाग प्रमुखाचं पद दिलं. त्यानंतर 2007 साली ते पुन्हा नगरसेवक झाले. 2008 ते 2009 ते बाजार आणि उद्यान समितीचे अध्यक्ष होते. 2011 मध्ये जाधव यांना शिवसेनेचं उपनेते पद देण्यात आले. 2012 ला झालेल्या निवडणुकीत यशवंत जाधव यांचा पराभव झाला. पण त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या निवडून आल्या. 2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ते तिसर्‍यांदा नगरसेवक झाले. 2017-2018 त्यांनी सभागृह नेत्याची जबाबदारी पार पाडली. 2018 ला त्यांना मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष करण्यात आले. 2018 ते मार्च 2022 पर्यंत ते स्थायी समिती अध्यक्ष राहिले. जाधव यांनी भायखळ्यामधून विधानसभेची निवडणूकही लढवली पण त्यांचा पराभव झाला.

130 कोटींची संपत्ती 300 कोटींवर

विधानसभेत मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यशवंत जाधव यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ते म्हणाले, “स्थायी समिती अध्यक्षांकडे सुरुवातीला 138 कोटींची संपत्ती होती. आता ती 300 कोटींच्या घरात पोहोचली आहे. 24 महिन्यात वेग वेगळ्या 38 संपत्ती खरेदी केल्या आहेत. कोरोनाच्या 24 महिन्याच्या काळात जंबो कोव्हिड सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाला आहे हे स्पष्ट आहे. ” यशवंत जाधव यांच्यावर 25 फेब्रुवारीला 2022 ला ईडीने छापा मारला. त्यातून मिळालेल्या माहितीवरून जाधव यांच्याशी संबंधित असलेल्या स्वीय सहायक, कंत्राटदार अश्या 25 ठिकाणी ईडीने छापे मारले आहेत.

पत्नीमुळे आले अडचणीत

यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी यशवंत जाधव या शिवसेनेच्या आमदार आहे. एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांचा पराभव करत 2019 ला यामिनी जाधव या विधानसभेवर निवडून गेल्या. यामिनी जाधव मुंबई महापालिकेच्या नगरसेविका देखील राहील्या आहेत. शिक्षण समितीच्या सदस्य आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी काम पाहीलं आहे.
२०१९ च्या निवडणुकीसाठी द्याव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रात यामिनी जाधव यांनी त्यांच्या व्यवहाराची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती. कोलकात्याच्या प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये जाधव कुटुंबाचे शेयर्स होते. प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा भाग विकून त्यांनी मुंबईत रिअल इस्टेट मध्ये पैसे गुंतवला ही एवढी माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिली होती. पण ह्या सर्व व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. विमल अग्रवाल या व्यवसायिकला कंत्राट मिळवून देण्यसाठी यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नीने अग्रवाल यांच्याकडून ३० कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे.

यशवंत जाधव हे मुंबईच्या राजकारणात मोठं नाव आहे. उद्धव ठाकरे यांच्या जवळचे म्हणून यशवंत जाधव यांची ओळख आहे त्यामुळेच त्यांच्या घरावर धाड टाकल्याचा आरोप शिवसेना नेते ‘संजय राऊत’ यांनी केला आहे. भाजप आणि देवेंद्र फडवणीस यांच्या सांगण्यावर हे होत असल्याचं महाराष्ट्र सरकार मधील मंत्री म्हणत आहेत. तर यशवंत जाधव यांनी मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. वेगवेगळ्या व्यावसायिकांकडून पैसे उकळले आहेत. त्यांच्या डायरीत असलेली मातोश्रीची नोंद हे नक्कीच त्यांच्या राजकीय मातोश्रीची असली पाहिजे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
भाजप काय म्हणत कि शिवसेना काय आरोप करत आहे याला काही अर्थ नाही कारण ते त्यांचं काम आहे. पण यशवंत जाधव यांनी त्यांच्या मातोश्रीला २ कोटी दिले आहेत हे मात्र खरं ईडीच्या माहितीमुळे वाटतं आहे. २ कोटी रुपये त्यांच्या आईला दिले असू कि नाही तर त्यांच्या राजकीय मातोश्रीला दोन्ही मातोश्री यशवंत जाधव यांच्या वर प्रचंड खुश असतील.
एका बाजूला यशवंत जाधव सारखे लोक आहेत जे आईला दोन-दोन कोटी दान करण्यासाठी देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आम्ही अजून पण बनियान आणायला आईला पैसे मागतो. तुम्ही दिलीयेत का कधी आईला दान धर्म करायला पैसे? द्या म्हणजे पुण्य लागेल तुम्ही पण यशवंत जाधवांसारखे नगरसेवक व्हाल.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.