घरातून बाहेर ४००-५०० मीटर बाहेर पडा एक तरी बोर्ड दिसेल जिथं मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं ‘शून्य % व्याजाने घरी घेऊन जा’. वस्तू कोणती पण घ्या शून्य टक्केचा पर्याय आहेच. गरीब आणि मध्यमवर्गाला ही ऑफर नाकारून कशी चालेल. यावर तर किती तरी संसार उभे आहेत. एकदम पैसे भरायला सगळ्यांना जमत नाही म्हणून हा पर्याय खरंच चांगला आहे. फक्त प्रश्न हा आहे कि शून्य टक्के व्याज सांगून खरंच शून्य टक्के असतं का ? बँक किंवा वित्तसंस्था शून्य टक्के सांगून दुसऱ्याच मार्गाने पैसे तर काढत नाही ना. हा विषय महत्वाचा आहे त्यामुळे बारकाईने बघू.
शून्य टक्के व्याजदर म्हणजे काय ? याचा सरळ सरळ अर्थ होतो तुम्हाला मिळत असलेल्या कर्जावर किंवा कर्जाने घेतलेल्या वस्तूंवर तुम्ही कोणतेही व्याज द्यायचे नाही. तुम्हाला जी कर्जाची रक्कम मंजूर केली जाते त्याच्यावर कोणतेही व्याज न आकारता त्याचे समान मासिक हफ्ते केले जातात. शक्यतो सहा महिने शून्य टक्के व्याज अशी जास्त जाहीरात केली जाते. खरोखरच असे घडते का ? तर अजिबात नाही. जगात कोणतीही गोष्ट मोफत नाही. फुकट असल्यासारखं हे कर्ज घेतोय खरं पण बँक किंवा वित्तसंस्था या खूप हुशार आहेत. अप्रत्यक्षरित्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने बँका पैसे वसूल करतात. 0% व्याजदर हे मूळ रकमेवर न आकारता प्रक्रिया शुल्क (Processing Charge) म्हणून घेतले जाते. म्हणजे व्याज आधीच काढून घेतल्यासारखं आहे. प्रक्रिया शुल्क कमी जास्त आहे हे आपण विचारच करत नाही.
समजा तुम्ही तुमच्या घरी मस्त टीव्ही घेणार आहात. त्या टीव्हीची किंमत ३५००० रुपये आहे. समजा तो टीव्ही तुम्ही रोखीने किंवा लगेचच विकत घेत असाल तर त्याची किंमत ३०००० रुपये अशी ऑफर आहे. टीव्हीची खरी किंमत किंवा जास्तीत जास्त किंमत तुम्हाला कधीच थेट कळू दिली जात नाही. वरचे ५००० रुपये प्रक्रिया शुल्क म्हणून तुमच्याकडून वसूल केले जातात. त्या टीव्हीची किंमत अगोदरच वाढवून त्यांनी त्यांचा व्याज दर वसूल केलेला असतो. तुमच्यासमोर दिमाखात आणि ठळक अक्षरात ठेवला जातो तो 0% व्याजदराचा बोर्ड. त्यामुळॆ इथून पुढं प्रक्रिया शुल्क किती असणार हे आधी तपासून बघा आणि नंतरच काय पाहिजे ते विकत घ्या.
प्रत्येक वेळेस असंच केलं जातं असं अजिबात नाही. शक्यतो इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर शून्य टक्के व्याजाची ऑफर असते. काही कंपन्या वस्तूंचा खप वाढावा म्हणून शून्य टक्के व्याजाने वस्तू देतात. ठराविक मासिक हप्त्यात शून्य टक्के व्याजाने वस्तू विकल्या गेल्या तरी कंपनीला खूप फायदा होतो. शून्य टक्के व्याज बघून खरेदी वाढते. बँकेला व्याजापोटी मिळणारं उत्पन्न कमी होतं असा काही लोकांचा समज असेल तर तो चूक आहे. बँक व्याजाची रक्कम वस्तू विकणाऱ्या कंपनी किंवा दुकानदारांकडून वसूल करतात. या सगळ्या प्रक्रियेतून बँकेला किंवा वित्तसंस्थेला काही तोटा होत नाही आणि वस्तू विकणाऱ्या कंपनीचा खप पण वाढतो.
कमी व्याजाच्या नावाखाली पॉलिसी गळ्यात मारतेत
फक्त वस्तू घेताना नाही तर एरव्ही जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा सगळेच जण बँकांचे खेटे मारतात. तुमची ही अवस्था बघून काही एजन्ट तुम्हाला कॉल करतील. हे एजन्ट तुमच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन एकदम कमी व्याजदरात कर्ज मिळवून देतो असं म्हणतील. अडचणीच्या काळात प्रत्येक माणसात संधी दिसते. मग पुढं हे एजन्ट लोक एक दोन पॉलिसी काढा म्हणजे कर्ज काढायला सोपं जाईल असं सांगतील. अशा पद्धतीने कितीतरी लोकांच्या गळ्यात पॉलिसी मारल्या आहेत. काही जणांनी तर कर्ज मिळणं तर दूरच पण चार पाच वर्षे पॉलिसीच भरत असतात. त्यामुळे कमी व्याजदराच्या नावाखाली कोणत्याही एजन्टवर लगेच विश्वास टाकू नका. कोणी काही प्रलोभन देतील अशा वेळेला शांततेत निर्णय घ्या.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?