सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

महाबळेश्वर पहिला असेल पण आसपासची खेडी कधी बघितली का?

जिथं जायचं त्या गावात आम्ही पोहचलो. आम्हाला ज्याच्या घरी जायचं होतं तो माणूस भेटेल अशा वाटत नव्हती. आतापर्यंत सगळा अंधार होता, वेळना गावात पोहचलो तेव्हा थोडा फार उजेड दिसला. ओंकार आणि मी थोडा पुढे येऊन थांबलो. पका मागे कोणाशीतरी बोलत होता.

आम्हाला अजिबात खात्री येत नव्हती. तेवढ्यात थ्री फोरथ मध्ये एक माणूस समोर आला. महाबळेश्वर किती लांब आहे म्हणून विचारलं. तो बोलायला लागलाच, तेवढ्यात पाठीमागून पका गाडीवर कोणत्या काय माहित पोराला घेऊन आला. “पाठीमागं चला, इथंच आहे” पकाचा हा डायलॉग कानावर पडला कि धास्ती वाढायची.

पण पकाच्या पाठीमागचं पोरगं बघून वाटायचं आता आलं असेल. गाडीच्या प्रकाशात दगड गोट्यातून रस्ता काढत पुढे जात राहिलो. चढाच्या पायथ्याशी चड्डीवर एक माणूस दिसला. खाणीत काम करणाऱ्या कामगारासारखी डोक्यावर बॅटरी बांधलेला तो माणूस पकाला लांबूनच बघून बोलला, “अरं किती उशीर परकाश, मी फोन लावतोय कवाच”

“रस्ता हुकलो काका, जवळच होतो.” पकाने एकदम खुशीत प्रतिसाद दिला.

सापडलं एकदाच. सगळ्यांना धीर आला. त्या माणसाच्या पाठीमागं गाडी घेऊन घराकडे निघालो. घर इतकं चढावर होतं कि डबल शीट गाडी वरच चढत नव्हती. एकजण खाली उतरून गाडी घरापर्यंत नेली. दारासमोर गाडी लावल्यावर सगळ्यांनी पोहचल्याचा श्वास सोडला. वाकून सगळे घरात गेलो. शेणाने सारवलेल्या ओट्यावर त्यांनी चटई टाकली बसायला. पका सोडून सगळे थकून गेले होते. चटई टाकल्याबरोबर सगळे कोपरे धरून बसले. आमच्या बाजूला टीव्ही चालूच होता.

जुन्या स्टाईलचा मोठं कुबड निघलेला टीव्ही होता. बॅटरीवाल्या काकांनी आम्हाला रिमोट आणून दिला. प्रभासचा भोजपुरीत डब केलेला ‘रिबल’ चालू होता. त्यातल्या सिरीयस डायलॉगला सगळे मस्त हसत होते. जेवण करून कधी झोपू असं सगळ्यांना झालं होतं. एकटा पका चुलीपाशी मावशीला मदत करत होता.

महाबळेश्वर आसपासच्या खेड्यातल्या लोकांचं आयुष्य असं असेल वाटलं नव्हतं.

मावशीनं चिकन बनवलं. पका मावशीला ताट वाढायला मदत करत होता. सोबत पुऱ्या आणि भात. पुरीला मावशी वडे म्हणायची. वडे खा म्हणून ती आग्रह धरायची. आमच्या चेहऱ्याकडे काहीतरी विशेष असल्यासारखं पाहत राहायची. काका तर बोलायचं थांबत नव्हता. माणसांच्या गर्दीपासून दूर डोंगरावर राहायची सवय झाल्याने चार पाच माणसं जरी सोबत दिसली तरी त्यांना आश्चर्य वाटत होतं. त्यांचा मोठा मुलगा आमच्यासोबतच जेवायला बसला होता. तो मुंबईला कामाला होता हे कौतुकाने तो सांगत होता. या लोकांशी बोलताना लक्षात येऊ लागलं, यांच्यासाठी शहरातली प्रत्येक गोष्ट नवीन होती. अजून घरात गॅस नव्हता. पकाने त्यांच्यासाठी ब्रेड आणि खाण्याच्या वस्तू घेतल्या होत्या. ब्रेडकडे मावशी आश्चर्याने बघतच राहिली. ब्रेड काय असतं हे पका तिला समजून सांगत होता.

सकाळी लवकर उठून मावशी चुलीसमोर शेकत बसली होती. पाणी लवकर तापावं म्हणून सरपण चुलीत सरकवत होती. अंघोळ करून आम्ही सगळे चुलीसमोर चहा प्यायला बसलो. चुलीतला हार (गरम कोळसा ) बाहेर काढून मावशीनं चहाच पातेलं हरावर (गरम कोळसा) ठेवलं होतं. सकाळी चहा बरोबर आम्ही क्रीम रोल खायला काढले तेव्हा सुद्धा ती क्रीम रोल खायला लाजत होती.

पकाने आग्रह करून तिच्या हातात ठेवला. तेव्हा मावशीने आमच्या पाहुण्याच्या दुकानात होता असला क्रीम रोल असं सांगितलं. आम्ही थांबलो ते कुटुंब गरीब होतं का माहित नाही. पण आपल्या साठी रोजच्या आणि सवयीच्या गोष्टी त्यांच्यासाठी विशेष होत्या हे नक्की. इथलं प्रत्येक कुटूंब माणसांच्या गर्दीपासून अलिप्त होतं.

चार पाच ओळखीच्या चेहऱ्याशिवाय महिनोंमहिने नवीन चेहरा दिसत नव्हता. ज्या लोकांना पुण्या मुंबईचा मार्ग सापडला. त्यांनी राहत्या घरांना स्वतःसाठी पिकनिक स्पॉट केलं आणि शहरात स्थयिक झाले. सणासुदीला येतात ते गावाला. पण मावशीसारख्या अनेक कुटुंबाना बाहेर जमणार नव्हतं. निसर्गाचा त्यांना सहवास जास्त लाभत होता खरं पण आजारपण आलं, जंगलात साप चावला तर कशी धावाधाव करायची असल्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं.

सकाळी अकरा वाजता त्यांच्या घरातून निघालो. काल रात्री ज्या रस्त्यानी जायला भीती वाटत होती त्याच रस्त्यावर आसपासची झाडी, खोलवर दऱ्या, रस्त्याच्या कडेला लहान मुलांसारखी कोपऱ्यात बसलेली घरे हे सगळं डोळ्यांना सुखावत होतं. महाबळेश्वर मध्ये दुपारी एकच्या आस पास पोहचलो.

उशीर झाल्याने प्रतापगडचा प्लॅन कॅन्सल केला. महाबळेश्वर मार्केट फिरायचं ठरलं. मार्केटच्या सुरवातीलाच स्ट्रॉबेरी घ्यायला गौरव थांबला आमच्या सगळ्यांना टेस्ट करायला लावली. “किती देऊ मग” असं स्ट्रॉबेरीवाला बोलला. “परत येताना घेतो” असं बोलून गौरव पुढे निघाला. स्ट्रॉबेरीनंतर सगळी दुकानं फुटाण्याची दिसत होती. चीज, मसाला, पुदिना अशी फुटाण्याची वर्गवारी होती. शेंगदाणे पण याच प्रकारात सजवले होते. एखाद्या नवीन भागात आलोय आणि तिथला उतारा घेऊन नाही गेलो तर अंगातलं भूत उतरत नाही म्हणून यांनी खास स्ट्रॉबेरी फ्लेवरची मदिरा पण घेतली. कोणी, कुठं, किती आणि कोणाबरोबर हे भूत उतरवायचं याचा हिशोब करूनच बाटल्या घेतल्या. ज्यांनी त्यांनी आपली नशा शोधली वेदांतीला मात्र तिची नशा बर्फ गोळा विथ काला खट्टा यातच सापडली. खास फोटोसाठी तिने सगळ्या रंगात गोळा सजवून घेतला.

महाबळेश्वर मधेच आम्ही जेवण करून आम्ही वाईकडे निघालो. गौरवच्या इच्छेनुसार वाईच्या गणपतीला थांबणार होतो. गाडी पार्क करून दर्शनासाठी सगळे निघाले. ओंकार आणि पका दर्शनासाठी आमच्या पुढे होते. ओंक्याने तिथल्या पोराला परत पाया पडायच्या आधीच प्रसाद मागितला. तो “नाही” बोलला. “असं कसं नाही इथं येईपर्यंत ३० रुपये खर्च झालाय आणि साधा प्रसाद नाही.” ओंक्या काही घेल्याशिवाय जात नाही असं त्यांच्या लक्षात आलं.

तो पोरगा जरा बिचकला त्यांनी तिळगुळाची पुडी शोधली आणि फोडून प्रसाद द्यायला लागला. “अरं या पुडीत आहेत सात तिळगुळ त्यात पण तू फोडून दे. आण इकडं” ओंक्या पुडी हिसकून बाहेर आला. त्यांच्या मागोमाग पक्याने पण एक पुडी त्या पोराकडून हिसकावून घेतली. देवाच्या भक्तीत लिन झालेले असे भक्त कमी पाहायला मिळतात म्हणून तो पोरगा यांच्याकडे हतबल होऊन बघतंच राहिला.

महाबळेश्वर आमच्या पासून दूर चाललंय. पुण्याची हवा कानापाशी बोलायला लागली होती. महाबळेश्वर स्वारीसाठी नेमलेला सेनापती, पका आता पुणेरी पगडी घालून चहाची वाट बघत होता. रस्ता सापडत नव्हता तेव्हा आम्ही पकाला घायाळ होईपर्यंत दोष दिला. पण रस्ता सापडल्यानंतर आमच्याकडे पकाने जो अनुभवाचा खजिना रिता केला होता त्याबद्दल आम्ही त्याच्या गळ्यात आभाराचा हार घातला नाही.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.