सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

आयुष्यभर विसरणार नाही अशी महाबळेश्वरची सफर

“सकाळी लवकर पाच वाजता निघायचं कुणी उशीर करायचा नाही.” असा ओंक्याने आदेश काढला. सकाळी ओंक्या सोडून कुणीच उठलं नाही. बॅचलर जीवनातील महत्वाच्या नियमांना काटेकोर पाळत सगळेच उशिरा निघालो. यावेळेस गाईड म्हणून पकी मुख्य भूमिकेत होता. म्हणून पकीवर मुख्य जबाबदारी होती. आदल्या दिवशीच बिस्कीट आणि बरंच काही सामान घेऊन ठेवलं होतं. सातारा हायवेने निघालो. तीन गाड्यावर आम्ही सहा जन, प्रत्येकाच्या पाठीवर बॅग या अवतारात बुंगाट निघालो.

झाडाला खिळे ठोकून करणी करायला लोक इथं येतात

वाई कि मांढर देवी आधी जायचं म्हणून थोडं थांबलो. जाऊन देवाचं दर्शन घ्यावं अशी काय कोणाची श्रद्धा नव्हती. पण मांढर देवी हे महाराष्ट्रातील असं एक तीर्थस्थान आहे, जिथं येणाऱ्या काही भक्तांचा करणी, गोटे, वाटोळं करणं यावर जास्त श्रद्धा आहे. लहानपणासून इथल्या कथा ऐकत आलो होतो. पण कधी जायचा योग्य आला नाही. म्हणून खास हे सगळं पाहण्यासाठी मांढर देवी गडावर निघालो.

घाटाचा रास्ता, उजव्या हाताला गर्द झाडी, एकावेळेस एकच चार चाकी जाईल असा रस्ता. आणि डोंगराच्या पायथ्याशी राहणार लोकांचं पावसाळ्यात कसं होतं असलं असा विचार करत पुढे सरकत होतो. रस्ता चढाचा असल्याने गाडी घुरर घुरर करत पुढे जात होती. प्राचीन मंदिर असेल या अपेक्षेने काही तरी वेगळी मंदिराची रचना असेल असं वाटलं होतं. मांढर गडावर पोहचलो तर ऑइल पेंटने रंगवलेलं मंदिर दिसलं.

जुन्या मंदिरांना रंग देऊन काय सध्या करतायेत हेच कळत नाही. ही मंदिर अशी रंगवल्याने Tourist Point Value कमी होतं आहे हे स्थानिकांच्या लक्षात येत नाही. गेल्याबरोबर एका बाईच्या अंगात आलं होतं.तिच्या कपाळ भर हळद होती. मराठी सोडून कुठल्या तरी भाषेत बोलत बोलत घुमत होती. काय बोलत होती तिलाच माहित.

शरीराने जरा अवाढव्य असल्याने तिला फार हलता येत नव्हतं. तिच्या आस पास तीनचार जन बसले होते. त्यांच्या प्रश्नाचं ती समाधान करत होती. तिला पाहत आम्ही मंदिरात गेलो. रांगेत उभा राहिलो. रांगेच्या दोन्ही बाजूला लोकांच्या वैयक्तिक पूजा चालू होत्या. ओंक्या आणि पका पाया पडायच्या आधीच गुरवाला प्रसाद मागत होते. ओंक्या ने प्रसाद घेतला, बाहेर आल्यावर त्याच्या लक्षात आलं पाय पडायचं राहिलं म्हणून.

मुख्य मंदिराच्या बाजूलाच दोन म्हसोबा होते. इथे येणाऱ्या काही भक्तांचं या म्हसोबावार देवीपेक्षा जास्त श्रद्धा असते. या म्हसोबालच देवीचे रक्षक मानतात. या म्हसोबा व्यतिरिक्त झाडीतला म्हसोबा विशेष फेमस आहे. अखिल करणी करणारी गॅंग या म्हसोबाच्या आशीर्वादानेच जवळच्या माणसाचं काही वाटोळं व्हावं म्हणून धरपडत असतात. झाडाला खिळे ठोकून करणी करायचा प्रकार चालू असतो.

एका झाडाला तर आता जागाच शिल्लक राहिली नाही खिळे ठोकायला. मंदिरात फिरून झालं. मगाशीच ज्या बाईच्या अंगात आलं होतं, ती थांबली होती. चांगलं मराठीत बोलत होती. बाहेर पडताना लहान मुलगी ओंकारला पैसे मागत होती. ओंकार तिला समजून सांगत बसला ‘शाळेत जा’ म्हणून. गाडीवर बसल्यावर तिला पैसे देत परत बोलला “हे सोडून दे शाळेत जा.”

याच मंदिराबद्दल नुकतच अनिसच्या Nandini Jadhav ताई यांनी फेसबुक वर माहिती टाकली आहे.

पाच नद्यांचा संगम असणारं पंचगंगा मंदिर महाबळेश्वर मध्ये पाहायला विसरू नका

मांढर आईचं कुंकू लावून पुढं निघालो. अजून थोडे दिवस थांबलो असतो तर आमच्यापैकी दोन तरी देवऋषी झाले असते. आमच्या पकाकडे तर ती विद्या पण होती. पण या करिअरला लाथ मारून वाईच्या दिशेने महाबळेश्वरला निघालो. पाचगणीच्या अलीकडेच जेवलो. पाचगणीपासून मॅप्रो गार्डनची जाहिरात सुरु झाली. स्ट्रॉबेरी विकणाऱ्यांची संख्या पण दाट झाली. मॅप्रो गार्डनला थांबलो.

गार्डनच्या नावाखाली लोकांना आकर्षित करून कंपनीचे प्रॉडक्ट विकायची चांगली आयडिया वाटली. सगळ्या महाबळेश्वरात मॅप्रोने अशी जाहिरात केली आहे जणू हे नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळ आहे. तरी सुद्धा बघायला बिलकुल हरकत नाही. करणं एकदम रस्त्यावर असल्याने तेवढाच विसावा मिळतो. त्यानंतर पंचगंगा मंदिराकडे वळलो. या मंदिरात म्हणे पाच नद्यांचा संगम आहे. म्हणजे असं वाटतं पाच वेगवेगळ्या नद्या इथं एकत्र आल्या आहेत. पण तसं काही इथं दिसलं नाही. मंदिरात पाच मोरीतून पाणी येताना दाखवलं आहे. पण त्या पाची ठिकाणाचं पाणी एकच ठिकाणावरून येतं. त्याला पाच भागात विभागून, पाच नद्यांची नावं दिली आहेत. मला काही लॉजिक कळलं नाही. पण असो श्रद्धेचा भाग आहे, पुढे चला. मग आम्ही आसपासचे दोन तीन ठिकाणी फिरलो.

महाबळेश्वर पासून ४० किलोमीटर जंगलात आम्ही रात्री आम्ही रस्ता चुकलो

सकाळपासून गाडी चालवत असल्याने सगळे जन थकले होते. पकाच्या नियोजनानुसार आम्ही महाबळेश्वर पासून काही अंतरावर त्याच्या ओळखीच्या नातेवाईकांकडे थांबणार होतो. पका म्हणाला तापोळा जायचं आहे. पण रस्ता विचारण्यासाठी एका माणसाला “वेळना कुठे आहे?” म्हणून विचारलं. आयला म्हटलं, “पका तू तर म्हणाला तापोळा जायचं आहे, हे काय नवीन.”

“अरं तिथं जवळच आहे.” असं बोलून पका आम्हाला धीर द्यायचा. पकाचं नेतृत्व मान्य केल्याने आम्ही बिचारे गपच बसायचो. महाबळेश्वर मध्ये चिकन विकत घेतलं. रस्ता विचारात विचारात जायचो. तर सगळे एकच सांगायचे “इथंच आहे, पुढून लेफ्ट घ्या फक्त” चिडून मी एकाला विचारलं, “अरं इथं म्हणजे किती लांब ते सांग.”

“जास्त नाही २० किलोमीटर फक्त.” असं लोकं पण आधार द्यायला सुरवात करायला लागले होते. साडे सहा वाजून गेले होते. जवळपास तास भर फिरून पण अजून काही सापडलं नव्हतं. अंधार वाढत होता. समोरून दहा पंधरा मिनिटाला एखाद दुसरा माणूस जात होता. खाली खाली उतरतोय एवढंच फक्त कळत होतं. कुठं आलोय कोणाला काही समजत नव्हतं. हळू हळू सगळ्यांचा पारा चढत होता. पका मात्र ‘इथंच आहे’ असं सांगून दर अर्ध्या तासाला धीर देत होता. कुणी चिडून विचारलं तर “हे काय आता आलोच” असं त्याचं ठरलेलं उत्तर होतं. मोबाईलची रेंज चालली होती.

जिथं जायचं त्यांचा फोन लागत नव्हता. पूर्ण अंधार पडला. खराब रस्ता सुरु झाला होता. जीव मुठीत घेऊन गाडी चालवत होतो. समोरून कोणी माणूस, गाडी काहीच जात नव्हतं. नेमकी त्याचं दिवशी सगळ्या गावांची लाईट गेली होती. कुठल्या गावात आलोय, कितीही नजर फिरवली तरी फक्त अंधार दिसत होता. परत जायची पण सोय राहिली नव्हती. दोन अडीच तास फिरत होतो. सगळे पकावर चिडले होते. घाबरून गेलो होतो. सगळेजण जागीच थांबलो. पकावर ओरड सुरु झाली. तेवढ्यात गौरवने पाठीमागून बस येताना पहिली. आम्ही सहा जन बसच्या समोर उभा राहिलो. बस थांबवली. ड्राइवरने गाडी सोबत चला सांगितलं. वेळना गावात पोहचलो.

गावात आलो तरी सुद्धा मनातली शंका मिटत नव्हती. कारण अजून पकाने सांगितलेल्या घरी पोहचलो नव्हतो……

(भाग २ वाचा)

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.