सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

नेपाळची एक विलक्षण सफर – अतुल नंदा

पुणे ते काठमांडू रेल्वे आणि बसने प्रवास

अंतरराष्ट्रीय युवा परिषद २०१८ नेपाळ, काठमांडू येथे होणार होती. दक्षिण आशियाई देशातील जास्तीत जास्त देश या परिषदेला येतील म्हणून परिषदेला सचिन पांडूळे आणि मी जायचं ठरवलं. तसं निमंत्रण आलं होतच. मुंबई ते पटना रेल्वेचा प्रवास. पटना ते काठमांडू बिहार परिवहन मंडळाने नुकतीच सुरु केलेली बस सेवा घेऊन आम्ही काठमांडू कडे निघालो. रक्सौल येथून सीमा पार करताना भारतीय चेक पॉईंट वर सगळ्यांची ओळखपत्र तपासणी चालू केली. सचिन आणि मी पुढेच बसलो होतो. पोलिसानी आम्हाला ओळखीचा पुरावा मागितला. आम्ही शोधात असताना आमच्या चर्चेवरून त्याच्या लक्षात आलं कि आम्ही भारतीय आहोत मग त्याने चौकशी न करता रेहने दो; म्हणून तो निघून गेला. भारतीयांना नेपाळ मध्ये विशेष स्थान असावं असं वाटलं मग काय थोडा अभिमान वाटणारच.

पहाडी रस्त्यावरून गाडी पुढे निघाली. गाडीच्या उजव्या हाताला डोंगरांची उंच कडा. डाव्या बाजूला खोलवर नदी. नदीच्या किनाऱ्यापासून पुन्हा डोंगरांच्या रांगा. डोंगरच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत लोकांची घरे. नदी ओलांडून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी प्रत्येक शंभर मीटर वरती चालत येण्या-जाण्या करिता छोटे-छोटे पूल अशी सर्वसाधारण रचना काठमांडू येईपर्यंत होती. रस्त्याच्या कडेला दारूची एकसलग दुकानं. बहुतेक किराणा पण दारूच्या दुकानातच मिळत असावा. सुरवातीला जे गाव लागलं ते संपलंच नाही असं वाटतं कारण दोन गावांमध्ये बिगर घरांचं जंगल किंवा निर्जन स्थळ अजिबात दिसत नाही.

काही ठिकाणी डोंगर फोडायचं काम जोरात चालू होत. काठमांडू येईपर्यंत रस्त्यात कोणत्याही पक्षाची किंवा संघटनेची जाहिरात दिसत नव्हती. बाकी बियर आणि शीतपेयांच्या जाहिरातीने एकही जागा मोकळी सोडली नव्हती. एकंदरीत काठमांडू येईपर्यंत प्रसन्न वाटतं होत. काठमांडूला पोहचलो आणि बसमधून उतरताना सगळी धूळ जणू स्वागत करायलाच उडत होती. काठमांडू शहरात म्हणजे नेपाळच्या राजधानीत पोहचलोय असं अजिबात वाटतं नव्हत. नेपाळी सिम कार्ड नसल्याने ड्राइवरच्या मोबाईल वरून आम्ही फोन केला.

त्याची आई नेपाळची माजी पर्यावरण मंत्री आहे

आम्हाला घ्यायला अभिनव चौधरी नावाचा तरुण येणार होता, आम्ही वाट पाहत थांबलो होतो. पण तिथला स्थानिक माणूस आमच्या मागच लागला कि त्याच्या हॉटेलवर चला म्हणून. आम्ही सांगून कंटाळलो कि, ‘आम्हाला घ्यायला कोणी तरी येणार आहे’. थांबावं लागणार म्हणून. आम्ही बाजूच्या चहाच्या टपरीवर चहा घ्यायला बसलो. चहा अपेक्षेपेक्षा जरा जास्तच मोठ्या कपात आला. तेव्हा लक्षात आलं कि आपला दिवसभराचा चहा इथं एका वेळेला पितात. चहा पिताना एक खाजगी सुरक्षा रक्षक आमच्या जवळ येऊन बसला. आम्ही त्याला फोन मागितला. त्याचा बॅलन्स संपला होता म्हणून त्याने बाजूच्या बाई कडून मोबाईल घेऊन आम्हाला दिला. हॉटेल साठी तो माणूस अधूनमधून आमच्या जवळ फिरकत होता. त्या सुरक्षा रक्षकाच्या पण हे लक्षात येत होत. आमचं त्याचाशी बोलणं चालूच होत.नेपाळी लोक तुम्हाला फसवतील जपून राहा असं तो सांगत होता. त्याच ऐकून जरा दडपणच आलं. एकंदर नेपाळ दौरा फार उत्साही राहील असं वाटतं नव्हतं. कोरियन भाषा शिका. असे नेपाळीत जाहिरातीचे फलक जागोजागी दिसत होते. नेपाळ मध्ये कोरियन भाषेचं आकर्षण का आहे कळत नव्हतं.

नेपाळी हिंदी सारखी असल्याने वाचायला आणि समजायला फार अडचण येत नव्हती. पण बोलताना मात्र लक्षात यायचं नाही ते काय बोलतात ते. हिंदी चित्रपट आणि गाणी यांचा प्रभाव असल्याने नेपाळी लोक हिंदी सहज बोलतात. त्यात भारत आणि नेपाळ यांचा रोजचा व्यवहार असल्याने परदेशात आल्याचा फार भास होत नाही. त्यात आपल्या चलनी नोटा इथे चालतात मग तर काय वेगळ्या देशात आहोत असं वाटायचा प्रश्नच येत नाही. तरीही नेपाळ देश म्हणून इथे वेगळी संस्कृती नांदते.

जनकपूर येथील रियाज नावाचा मित्र आम्हाला पोहचलो त्या दिवशी रात्री फिरायला घेऊन गेला. नेपाळी थंडी असं सांगून तो सिगरेट वरचे वर संपवत होता. सिगरेट नेपाळी राष्ट्रीय व्यसन जाहीर करून टाकावं की काय असं वाटत होत. कारण तसही नेपाळ मध्ये बहुतेक जण दिवसभर सिगरेट ओढतात. रियाज मधेशी होता. नेपाळी कॉम्युनिस्ट पार्टी चा तो सदस्य आहे. मग काय राजकारण विषय कसा सुटेल. गेलो त्याच दिवशी रियाजशी बोलताना लक्षात आलं कि भारताबद्दल इथल्या लोकांच मत काही खास नाही. याच स्पष्टीकरण तो जे देत होता ते पटण्यासारख होत.

२०१५ ला नेपाल मध्ये पहाडी आणि मधेशी हा वाद जास्त उफाळून आला.

तसा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न म्हणून भारताने त्यात लक्ष घातलं नसत तर काही बिघडलं नसत. पण या प्रश्नात भारताने भारतीय राजकीय दृष्टीकोन ठेवून तीन महिने नेपाल-भारत सीमा बंद केली. सकाळचा चहा सुद्धा भारतातून येतो अशा परिस्थितीत नेपाली लोकांची काय अवस्था झाली असेल जास्त सागायला नको. दैनदिन जीवन प्रचंड विस्कटून गेल. काठमांडू शहर या काळात जवळपास पूर्ण बंद होतं. व्यवहार ठप्प झाले होते. कालांतराने नेपाली जनता हे विसरून गेली असतीच पण तेवढ्यात नोटाबंदी झाली. आजपर्यंत भारतीय चलन इथे सहज चालायचे म्हणून दिवसाचा खूप सारा व्यवहार भारतीय नोटांमध्ये होतो. नेपाल सरकारकडे मोठी रक्कम जमा झाली होती. त्या नोटांची बदली अजून झाली नाही. हा मोठा आर्थिक तोटा नेपाळला सहन करावा लागला. याचा बदला म्हणून कि काय आम्ही गेलो त्याच दिवशी नेपाळने भारतीय २०० आणि ५०० च्या नोटा बंद केल्या.

आता नेपाळ मध्ये भारताबद्दल हेच मत झालं आहे कि नेपाळ च्या अधोगतीला भारतच जबाबदार आहे. राजकीय नेते मंडळीशी सुद्धा आम्ही बोललो ते मात्र नेपाळ आणि भारत यांचे संबंध कधीच बिघडू शकत नाही असं बोलायचे. त्यांची ही उत्तर राजकीय वाटत होती. कारण सामान्य माणूस त्याच्या एकदम विरुध्द बोलायचा. भारत आणि नेपाल भौगोलिक दृष्ट्या एकच सलग भूमी वाटते त्यामुळे साहजिकच नेपाल भारत संबंध जुने आणि रोजचे आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून नेपाल चीन-संबंध वाढतायेत हि बाब पण तितकीच खरी आहे. त्याला कारण आपली राजकीय आणि अंतरराष्ट्रीय धोरणे आहेत का हे तपासून घेतलं पाहिजे. नेपाल मध्ये भूकंप झाला तेव्हा भारताने त्यांना मदत केल्याच्या बातम्या आपल्याकडे खूप जास्त झळकल्या. भारताबरोबर अन्य देशांनीही नेपाळला मदत केली. पण जाहिरात मात्र भारताने सर्वात जास्त केली, असं नेपाळी लोक म्हणायचे.

ही गोष्ट सामान्य नेपाळी जनतेला खटकली

नेपाळ भारताच्या विरोधात जाहीर जाऊ शकत नाही तेवढी त्याची शक्ती नाही. पण परकीय शक्तींना जवळ करणं त्यांना फार अवघड नाही. चीन ने हाती घेतलेल्या उपक्रमाची माहिती काठमांडू फिरलास कि सहज सापडेल आणि विशेषतः हि सगळी कामे अलीकडच्या काही वर्षातील आहे. दरबार स्क्वेर ही नेपाळची राष्ट्रीय वास्तू भूकंपात सपाट झाली होती. ही वास्तू जशीच्या तशी बांधून देण्याची ग्वाही चीनने नेपाळला दिली, आणि त्याच काम पण सुरु केल आहे. रेल्वेचे रूळ टाकण्याच काम सुद्धा हाती घेतलं आहे. साहजिकच इथे चीन समर्थन करणारी मंडळी वाढत आहे कारण येता जाता चीनच्या कामांची चर्चा होईल अशा दर्शनी भागात चीनने बरीच कामे हाती घेतली आहेत.

नेपाळ नैसर्गिक दृष्ट्या सधन आहे पण नैसर्गिक सौंदर्याच्या ताकतीवर नेपाळ ज्या पद्धतीने सक्षम व्हायला पाहिजे तितका झाला नाही त्याची सामाजिक आणि राजकीय कारणे बरीच आहेत. त्यांच्या खोलात न जाता आताची परिस्थिती जी पहिली ते मांडण्याचा प्रयत्न करतो. नेपाळच्या राजधानीत अजूनही रस्ते नीट नाहीत. प्रत्येक चौकात पोलीस रहदारी Manually सांभाळतात. कुठल्याही चौकात सिग्नल नाही. रस्त्यांच्या कडेला धूळ पडलेली असते. एकाला विचारलं इतकी धूळ का असते तर म्हणाला, ‘आता कमी झाली आहे पहिली खूप होती.’ बेरोजगारी चा प्रश्न खूप मोठा आहे. दक्षिण कोरिया मध्ये नेपालीसाठी सवलती असल्याने काम धंद्यासाठी अनेक तरुण तिथे जातात. संपूर्ण शहरात ‘कोरियन भाषा शिका’ अशा जाहिराती का लावल्या होत्या हे तेव्हा लक्षात आलं.

भारतातून नेपाळला पशुपतीनाथ येथे दरवर्षी लाखो भाविक जातात

काठमांडूमध्ये पशुपतीनाथ हे शंकराचे मोठे मंदिर आहे. इथे येणारे बरेचसे भाविक भारतातून आणि बऱ्यापैकी महाराष्ट्रातून येतात. मंदिरांची रचना हि मन्गोलिअन पद्धतीची आहे. दर्शन घेताना पुजारी साधे कुंकू न लावता ओल्या कुंकवाचा चांगला थर कपाळावर लावतात. म्हणूनच मंदिरातून बाहेर पडणाऱ्या लोकांच्या फक्त कपाळाकडे लक्ष जातं. अशी अजून काही मंदिरे आहेत. त्यातील कुमारी मातेचं मंदिर हे एक अजून विशेष आहे. आसपासच्या परिसरातील धार्मिक संकेतानुसार लहान मुलीना शोधून त्यातल्या एका मुलीला कुमारी मातेचा दर्जा दिला जातो. ह्या कुमारी मातेच्या दर्शनासाठी विशिष्ट वेळेत लोक रांग लावून उभे असतात. वयाच्या तेरा वर्षानंतर कुमारी माता बदलली जाते आणि तिचा जन्म कुठेतरी झाला असेल म्हणून पुन्हा धार्मिक संकेतानुसार नवीन कुमारी माता निवडली जाते. जुन्या कुमारी मातेला आयुष्यभर लग्न करता येत नाही. अशा कुमारी मुलींचा सांभाळ करण्याची जबाबदारी मंदिर घेते.

नेपाळ फिरायचा असेल तर काठमांडू पेक्षा या ठिकाणी जा

नैसर्गिक कृपा असूनही काठमांडू नजरेला सुखावणार नाही म्हणूनच कदाचित विदेशी पर्यटक काठमांडू मध्ये फार दिसत नाही. तरीही नेपाळला येणाऱ्या पर्यटकांची संख्या बरी आहे कारण पोखरा सारख शहर इथला पर्यटन विषय जिवंत ठेवून आहे. काठमांडू ते पोखरा साधारण सहा तास लागतात. घाटाचा रस्ता, चौफेर हिरवळ आणि वाहते पाणी यांमुळे काठमांडूच्या धुळीतून निसर्गाच्या कुशीत शिरतानाचा अनुभव प्रसन्न करून टाकणारा असतो. त्यामुळे हा प्रवास थकवा देणारा नसतो. घाटातून गाडी कोसळण्याची शक्यता असते म्हणून रात्रीचा हा प्रवास धोकादायक होऊ शकतो. घाटाखाली गाडी कोसळल्याची उदाहरणे खूप आहेत. पोखरा शहरात पोहचलो आणि पर्यटनासाठी नेपाळ आल्याच दुःख कमी झालं. अतिशय स्वच्छ आणि शांत शहर. आपल्याच नादात खुश असणारं शहर दिसत होत. इथल्या काही स्थळांना आम्ही भेटी द्यायचं ठरवलं. ‘पीस पगोडा’ हे बुद्ध मंदिर पाहायला आम्ही गेलो. जापनीज लोकांनी हा पगोडा बांधला आहे. डोंगराच्या पायऱ्या चढत असताना पोखरा शहर पायाखाली येतंय असं वाटतं आणि समोर नजर फिरवली तर हिमालयीन डोंगररांगा बर्फ अंगावर ओढून बसलेल्या दिसतात. इथ फोटो काढण्याचा मोह आवरता येणार नाही. डोंगर चढून आल्यावर एक लांबवर सपाटी भाग आणि समोर पांढरा-शुभ्र पगोडा. लांबूनच बुद्धाची शांत डोळे मिटलेली मूर्ती दिसते. मूर्ती उंचीवर असल्याने काही पायऱ्या वर चढून गेल्यानंतर हीच मूर्ती आणखी भव्य वाटते. गोलाकार पगोड्याला ठराविक अंतरावर अशाच भव्य मुर्त्या आहेत. बर्फाळ डोंगरामध्ये हा पांढरा शूभ्र पगोडा हिमालयाचाच नैसर्गिक भाग वाटतो. पोखरा मध्ये गुफा किंवा लेणी पाहायला सुद्धा खूप पर्यटक येतात.

नेपाळ अंतर्गत राजकारण आणि भारत याचा काय संबंध आहे

२००७ नंतर राजेशाही संपली. राजेशाहीनंतर येणारी लोकशाही हि नेपाळच्या उद्धारासाठी आहे हा समज लोकांचा होता. पण २००८ पासून दर एक-दीड वर्षाला सरकारे बदलत राहिली. त्यामुळे राजकीय घडामोडी फक्त झाल्या, घडल काहीच नाही. परिणामी लोकांचा सुद्धा सरकारवरचा आणि पक्षांवरचा विश्वास उडत चालला आहे. ‘राजेशाही बरी होती’ असं म्हणणारे वाढत आहेत. कारण २००७ पर्यंत जितका विकास झाला किमान तो आहे तितका तरी ठेवण्यात कोणताही सरकार यशस्वी झालं नाही. त्यापेक्षा जास्त विकास होण्याचा तर प्रश्न निर्माण होतच नाही. आताचे साम्यवादी सरकार हे पहिले स्थिर सरकार आहे. यांच्याकडून अपेक्षा आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर भविष्य कठीण आहे. कारण नेपाली जनता रस्त्यावर यायला उतावीळ असतेच.

नेपाळ हा धार्मिक देश आहे. बहुसंख्य हिंदू आहेत. धर्मावरून राजकारण होत असेल पण तो राजकारणाचा मुख्य विषय वाटत नाही. त्यापेक्षा मुळचा नेपाली कोण ज्याला identity Crisis म्हणतात. यावरून सध्या जोरात राजकारण चालू आहे. पहाडी समाज हा मधेशीना नेपाळी मानतच नाही. पहाडी लोकांचा पोशाख हा राष्ट्रीय पोशाख म्हणून बघितला जातो. पण मधेशीना हा पोशाख आपला वाटत नाही त्यांचा पोशाख बऱ्यापैकी बिहार आणि उत्तर प्रदेश मधील लोकांसारखा आहे. अशा लहान सहान गोष्टींपासून दोन्ही गटांमध्ये स्वतःला .राष्ट्रवादी सिध्द करण्याची धरपड चालू असते. संख्यने मधेशी पहाडीच्या बरोबरीत आहे. पण संसदेत मधेशीना प्रतिनिधित्व मात्र बरोबरीत नाही. मतदारसंघाची रचना अशा प्रकारे केली आहे कि प्रत्येक मतदार संघात मधेशी अल्पसंख्याक राहतात. अशा परिस्थितीत मधेशी राजकीय प्रतिनिधित्वासाठी झगडण साहजिकच आहे. बाकी नेपाळ हिंदू राष्ट्रासाठी प्रयत्न करतोय किंवा आता नेपाळ हिंदू राष्ट्र होईल असं अजिबात नाही कारण यामुद्यांवर ज्या पक्षाने निवडणुका लढल्या त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. नेपाळ एकूण जास्त धार्मिक आणि अंधश्रद्धावादी आहे पण कट्टर वाटत नाही. कट्टरता मधेशी मध्ये जास्त आहे. पहाडी त्यामानाने उदार आहेत. मधेशीमध्ये प्रेम विवाह हा आश्चर्याचा विषय आहे तर पहाडी मध्ये प्रेम विवाह नसणं हा आश्चर्याचा विषय आहे.

नेपाळ आणि भारत हा दोन देशांमधल्या नागरिकांच्या संबंधाचा प्रश्न आहे तो केवळ सीमा प्रश्न नाही. हजारो वर्षांपासून जेव्हा देश हि कल्पना सुद्धा विकसित नव्हती तेव्हापासून दोन्ही देशातील लोक कौटुंबिक नात्यांपासून व्यवहारी नात्यांपर्यंत एकमेकांशी जोडलेले आहेत. देशांच्या अस्मिता या नात्यात अडथळा कधीच बनल्या नाहीत. पण गेल्या काही वर्षातील धोरणांनी नेपाळी जनतेच्या आक्रोशाला निमंत्रण दिल. दोन देशांच्या नात्याला नजर लागण्याची वेळ आली. वेळीच याकडे आपली नजर गेली नाही, तर आपले शेजारी अंगावर येणार नाहीत; पण दुसऱ्याला अंगावर येण्यासाठी वाट करून देतील.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.