सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

थायलंड यात्रेचा गमतीदार अनुभव – अतुल नंदा

बँकॉक एअरपोर्ट वर इमिग्रेशन फॉर्म भरताना महिला अधिकारी उद्धट स्वरात बोलली.

तिचा हा स्वर फक्त भारतीयांसाठी होता कि सगळ्या साठी हे काही समजत नव्हतं. पुन्हा रुपये बदलून थाई बहत(चलन) घेतानाही हाच अनुभव आला. पण त्याच एअरपोर्ट वर मला फोन करायला एका महिलेने मूठभर थाई नाणी हातात दिली. अशा दोन अनुभवातून लगेच कोणत्या निष्कर्षावर येणं घाईचं ठरेल. बाहेर मला गाडी न्यायला आली. त्या गाडीची ड्रायव्हर एक मुलगी होती. सुरुवातीला तिच्या पेहरावावरून हे लक्षातच आलं नाही की ती मुलगी आहे. मी ज्या संस्थेवर चाललो होतो त्या संस्थेच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना लक्षात आलं की ती मुस्लिम आहे आणि ड्रायव्हिंग हा तिचा उदरनिर्वाहासाठी एकमेव व्यवसाय आहे.

थायलंड हा स्त्रीप्रधान देश खेड्यात दिसला

सुदैवाने बँकॉक पासून ३० किमी अंतरावर नोंग चोक खेड्यात म्हणू शकता राहायची संधी मिळाली. स्थानिक बाजारात फिरताना ८०-९० टक्के महिला दुकानात दिसल्या. अगदी मोबाईल शॉपी असू दे किंवा सलून त्यात महिलाच दिसल्या. आपल्याकडे तुळशीबागेसारखे महिलांसाठी खास म्हणून प्रसिद्ध असतात त्यात देखील बहुतेक दुकानदार हे पुरुषचं असतात. बहुतेक घरातल्या स्त्रिया ह्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होत्या. बऱ्याच बायका बाहेर कामासाठी जात तर त्यांचे नवरे मुलांना घरी सांभाळत बसत. इथल्या स्त्रीच्या हातात आर्थिक शक्ती असल्याने कदाचित ती घराच्या आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल निर्णय घ्यायला स्वतंत्र असावी. बहुतेक स्त्री पुरुष हे साधारणतः तीन चार लग्न करत.

समलिंगी संबंधांना समाज मान्यता होती.

अनेक समलिंगी जोडपी त्यांच्या कटुंबासोबत राहत होती. शरीर संबंधावरून चारित्र्य ठरवणे आणि एखाद्याचा सामाजिक दर्जा नष्ट करणे या देशात जाणवलं नाही व विशेष म्हणजे हे फक्त बुद्धिस्ट लोक मानतात असं नाही, तर मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातले लोकही हेच जीवन मूल्य मानतात. थायलंडच्या सगळ्या मस्जिद मध्ये महिला, पुरुष, लहान मुलं, मुली हे एकत्र नमाज पढत होते. मस्जिद मध्ये कोणाला ही बंदी नव्हती, इतर धर्माच्या लोकांना सुद्धा ! यातून हा देश स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कर्ता आहे किंवा ही संस्कृती मातृसत्ताक आहे असा लगेच निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. कारण घरात किंवा समाजात स्त्रीला जरी अधिकार असले, तरी जेव्हा देशपातळीवर स्त्रीच्या सक्षमतेच्या अंगाने पाहिल्यास स्त्रीचं महत्त्व फार जाणवत नाही कारण या देशात राजेशाही ही सत्ताप्रणाली आहे. राजा देशाचं नियंत्रण करतो. राणीला मात्र नामधारी महत्त्व आहे. राजाला जनता नियंत्रित करायची असेल तर लष्कर लागणारच. त्यात महिलांना स्थान नाही. वयाच्या १८ वर्षानंतर प्रत्येक पुरुषाला लष्कराचं प्रशिक्षण हे अनिवार्य आहे. यातून ताकदीचा आणि पुरुषत्वाचा संबंध जोडलेला दिसतोय. पोलिस यंत्रणेत मात्र महिला बरोबरीने आहेत.

राजाच्या कुत्र्यांवर विनोद केला तरी तीन वर्षांची शिक्षा आहे

राजाचं महत्त्व हे देवाच्या समपातळीवर आहे. राजाच्या भूमिकेचं विश्लेषण वा त्याच्याशी मतभेद होऊच शकत नाही असं मानलं जातं. हा देश जरी बुद्धाचा असला तरी बुद्ध हा फक्त पगोडात (मंदिरात) दिसतो. पण राजा मात्र प्रत्येक चौकात दिसतो. राजाप्रती निष्ठा सिद्ध करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या घरात, दुकानात, शाळेत आणि कॉलेजात राजाची मूर्ती किंवा प्रतिमा उभारतो. शालेय अभ्यासक्रमापासून राजाची महती शिकवली जाते. राजा सर्वेसर्वा आहे. कवी, लेखक, चित्रकार आणि इतर कलाकार यांची कला ही राजा आणि त्याच्या वैभवाच्या गप्पा गोष्टीच्या किंवा थापांच्या पुढे जातच नाही. राजाचं विश्लेषण अनैतिक आहे. हा दृढ समज लोकांना मान्य करायला लावला आहे. तशी कायदेशीर काळजी देखील घेतली आहे. राजा विरुद्ध बंड होऊ नये म्हणून त्याच्याविरुद्ध भाषण जरी केलं तरी जन्मठेप किंवा फाशी होऊ शकते. अगदी राजाच्या कुत्र्यांवर विनोद केला तरी तीन वर्षांची शिक्षा आहे. इतकंच काय पण कोणी राजा विरुद्ध आहे, या नुसत्या शंकेवर सुद्धा लष्कर कोणालाही ठार मारू शकत होते. किंग रामा IX हा नव्वदी पार केलेला. व त्याच्या शेवटच्या काळात सत्ता स्पर्धा सुरु होती. वंश परंपरेने मुलाकडेच सिंहासन जावं या हेतूनं त्यानं लष्करी शासन जाहीर केलं. आताचा राजा किंग रामा X हा कर्तृत्वहीन असूनही तो गादीवर बसला. पण हे सत्तांतर सहजासहजी झालं नाही. दरम्यान अनेक लोकांनी बंड करण्याचा प्रयत्न केला लष्करानं भर चौकात या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं. कित्येक लाख लोक गेल्या तीन वर्षात मारले गेली आहेत. शेवटची पंतप्रधान पळून गेली. गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक संस्था मध्ये सुद्धा निवडणूक झाल्या नाहीत. लष्कराने अजून तीन वर्षे मागून घेतली आहेत. पुढे काय होईल ते सांगता येत नाही.

थाई संस्कृतीवर भारताचा खूप प्रभाव आहे

सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जरी अशी असली तरी टूरिस्ट लोकांना हा देश पाहण्यासाठी अतिशय सुरक्षित आहे. दुर्दैवाने टूरिस्ट खेड्यात जात नाहीत; पण खऱ्या अर्थाने थाई संस्कृती खेड्यातच समजू शकते. कारण थायलंडमधील शहरांतील मॉल संस्कृती ही भारतात ही पाहायला मिळू शकते. वस्तूंच्या मार्केट बरोबर देह विक्रय मार्केट हे थायलंडचं वैशिष्ट्य टाळता येणार नाही. कारण बँकॉक शहरात काही ठिकाणी वेश्या व्यवसाय हा जगातला एक आघाडीचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात चालते. आसपासच्या देशातील मुलीही आणल्या जातात. शासनाचं ह्यावर विशेष लक्ष नाही किंवा शासनाला तिकडे लक्ष द्यायचं नाही. कारण बरीचशी आर्थिक गणितं यावर अवलंबून आहेत. पण यावरून थायलंडचं मर्यादित विश्लेषण करू नये. कारण नैसर्गिक आणि आधुनिक वैशिष्टयांनी हा देश समृद्ध आहे. खेडे गावात मोठी लाकडाची घर, घराभोवती बाग, त्या बागेत एखादं छोटसं तळ. अशी साधारण रचना दिसते. त्या तुलनेत शहरं मात्र गजबजलेली आहेत. शहर अतिशय नियोजनबद्ध आहे. रस्ते खेड्यापर्यंत चांगले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम आहे. स्वस्त जलवाहतूक आहे. म्हणजे बोटीनं जवळपास संपूर्ण बँकॉक शहर तुम्ही पाहू शकता.

हे संपूर्णतः भारतीय मार्केट आहे.

इथल्या प्रत्येक मार्केटचं वेगळं वैशिष्ट्य सांगता येईल. त्यातल्या त्यात फाहुरात मार्केट याचा उल्लेख टाळता येण्यासारखं नाही. इथं भारतीय खाद्यपदार्थापासून सगळं काही मिळतं. इथं पंजाबी, हिंदी, भोजपुरी भाषा ऐकायला मिळतात. काही भारतीय लोकांशी चर्चा केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या. थायलंड मध्ये जवळपास १०-१२ लाख भारतीय असावेत. त्यापैकी बहुतेक उत्तर प्रदेश मधून आलेले आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील एकट्या गोरखपूर जिल्ह्यातील साधारणतः २-३ लाख लोकं आलेले असावेत. एकूण भारतीयांपैकी बरेच भारतीय हे अनाधिकृतरित्या थायलंड मध्ये वास्तव्य करतात. उत्तर प्रदेशच्या खालोखाल पंजाबी लोक इथं राहतात. व्यवहारात जरी हे थाई भाषा वापरत असतील तरी घरात मात्र हे लोक आपापली मातृभाषा वापरतात. इथले भारतीय जरी पैशाने श्रीमंत असले तरी सध्या थायलंड मध्ये भारतीयांबद्दल परकेपणाची भावना आहे. कारण अनधिकृतरित्या राहणाऱ्या भारतीयांची वाढत जाणारी संख्या. तसेच पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार इथून बरेच लोक स्थलांतरित झालेले आहेत. यावरून मला विमानतळावर जी महिला अधिकारी जी उद्धट आवाजात बोलली होती, त्याचं कारण आपोआप समजलं.

थायलंड मध्ये मराठी ऐकली

भारतीय लोकांचा आणि परिणामी त्या संस्कृतीचा प्रभाव थाई संस्कृतीवर दिसून येतो. कारण देव देवतांचा बुद्धिस्ट आणि इतर समाजावर चांगलाच प्रभाव दिसतो. अनेक ठिकाणी गणपतीच्या मूर्ति सहज दिसायच्या. कित्येक मंदिरात गणपती आणि बुद्धाची मूर्ती सोबत होती. एका ठिकाणी तर गणपतीची मूर्ती संपूर्ण भारतात सापडणार नाही इतकी मोठी होती. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही गणपतीची जगातली सर्वात मोठी मूर्ती आहे. असेलही कदाचित. गणपतीला वंदन करताना त्यात थाई वंदन समरस झाल्यासारखं वाटत होत. काही गोष्टी मात्र अगदी नमुनेदार भारतीय होत्या. उदाहरणार्थ गणपतीसमोरच्या उंदराच्या कानात भक्त आपल्या मनातील इच्छा सांगत होते. एका गणपती मंदिरात मराठीत गणपतीचं गाणं चालू होत. बाजारात बुद्धाच्या मुर्त्या इतक्याच गणपतीच्या मूर्त्या विकायला आलेल्या दिसल्या. एका संग्रहालयात तर बहुतेक हिंदू देवतांच्या मूर्त्या दिसल्या. श्रद्धेची प्रतिकं दोन्ही संस्कृतीत साधर्म्य दाखवत होती. बहुतेक घराबाहेर तुळशी वृंदावना सारखे स्पिरीट हॉऊस होते. त्यामुळे भुतांपासून घरचे संरक्षण होते अशी कल्पना आहे. स्त्री पुरुष संबंधांना, हक्कांना, न्याय देताना हा समाज आदर्श वाटतो. पण आई बाप वेगळे होताना मुलांची जबाबदारी घ्यायला तयार नसणारा हा व्यक्तिगत समाज आदर्श वाटत नाही. अतिथीला आपुलकीने पाणी आणि फळ देताना माणसा-माणसात जिव्हाळा निर्माण करणारा समाज वाटतो. तर धर्माच्या नावाने बुद्धिस्ट आणि मुस्लिम दक्षिण थायलंडमध्ये एकमेकांना रोज मारतायत. एका मुलीला भेटल्यावर ती अगदी सहज म्हणाली कि तिच्या भावाचा आणि चुलत्याचा खून झाला. इथे मरण सवयीचं झालं आहे.

तेव्हा हा बुद्धाचा देश कसा? हा प्रश्न फक्त उरतो.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.